देवेंद्रजी, मी दिल्लीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

नितीन गडकरी यांचे उद्गार, मुख्यमंत्र्यांच्या कामाचे केले कौतुक
'मॅन ऑन मिशन महाराष्ट्र' पुस्तकाचे गडकरींच्या हस्ते प्रकाशन
 


 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बदलतो आहे. त्यामुळे देवेंद्रजी, तुम्ही असेच काम करा, मी दिल्लीत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस व महाराष्ट्र राज्य सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांतील कामगिरीवर आधारित 'मॅन ऑन मिशन महाराष्ट्र' या पत्रकार आशिष चांदोरकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. सदानंद मोरे, केंद्रीय मंत्री शाहनवाझ हुसेन, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, प.दु.म. मंत्री महादेव जानकर, पुस्तकाचे लेखक आशिष चांदोरकर, साकेत प्रकाशनचे संस्थापक बाबा भांड आदी उपस्थित होते. नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. यावेळी गडकरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूरमध्ये नगरसेवक असल्यापासून ते मुख्यमंत्री होईपर्यंतचा त्यांचा व पक्षाचा प्रवास तसेच त्यावेळी घडलेले काही भावनिक प्रसंग यावेळी विशद केले. ते म्हणाले की, गोपीनाथ मुंडे मला नेहमी सांगायचे, देवेंद्रची भाषणे अत्यंत प्रभावी आहेत. त्याप्रमाणेच फडणवीस यांनी विधानसभेत आमदार म्हणून जबरदस्त कामगिरी केली, असे गडकरी यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि मी भाग्यवान आहोत कारण आमच्या विदर्भात राजकारणात जात-पात फार प्रभावी नाही. देवेंद्र फडणवीस गोड बोलणारे आहेत तर मी कडक बोलणारा आहे, मी सरळ सांगतो, मत द्यायचे असेल तर दे नाहीतर देऊ नको, पण जात वगैरे मला काही कळत नाही, अशीही मिश्कील टीप्पणी गडकरी यांनी केली. आमच्या पक्षाने कधीही जातपात मानली नाही, असे सांगतानाच, सुरूवातीला नागपुरात आम्हाला एक नगरसेवक निवडून आणताना कष्ट पडत होते, आता नागपुरात प्रत्येक गल्लीत भाजप दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
पाण्याच्या क्षेत्रात फडणवीस सरकारचे काम अत्यंत महत्वाचे असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. राज्यात गेल्या वीस वर्षांत सिंचन प्रकल्प उभे राहू शकले नाहीत, अनेक योजना बंद पडल्या. या 'डेड अॅसेट्स'ची किंमत दीड लाख कोटी रूपये आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सातत्याने या अपूर्ण प्रकल्पांवर काम केले, दिल्लीत पाठपुरावा केला. केंद्रात मी जलसंपदा खात्याचा मंत्री झाल्यावर मी म्हणालो की काही काळजी करू नको, मी पाठीशी उभा आहे. आता या १०८ प्रकल्पांपैकी ६० टक्के प्रकल्प येत्या मे-जूनमध्ये पूर्ण होतील व ४१ हजार कोटींची सिंचन प्रकल्पांची कामे राज्यात पूर्ण होतील, असा दावा गडकरी यांनी केला. राज्यात असेच काम पुढील वर्षभरात झाल्यास राज्यातील सिंचन ४० टक्क्यांपर्यंत नेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांची प्रशंसा करताना ते म्हणाले की, जेव्हा विकासाच्या राजकारणाला प्रत्युत्तर देता येत नाही, तेव्हा लोक जात पुढे करतात. पण, आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बदलतो आहे. एक निष्कलंक, इमानदार अशी प्रतिमा मुख्यमंत्र्यांनी जोपासली आहे. वेडी माणसेच चमत्कार घडवत असतात, असे सांगतानाच, देवेंद्रजी तुम्ही असेच काम करा, मी दिल्लीत तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहे, अशा शब्दांत गडकरी यांनी फडणवीस यांना आश्वस्त केले.
 
 
 
 
 
पुस्तकावर फोटो माझा असला तरी हे यश आमच्या 'टीम'चे !
हे पुस्तक म्हणजे माझे आत्मचरित्र नाही, गौरवगान नाही. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य सरकारच्या तीन वर्षांतील कामगिरीचे, महत्वपूर्ण निर्णय व त्यांच्या परिणामांचे संकलन आहे. त्यामुळे या पुस्तकावर राज्य सरकारचा प्रमुख म्हणून फोटो जरी माझा असला तरी, हे यश राज्य सरकारच्या 'टीम'चे असल्याचे प्रांजळ मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फडणवीस म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे गेल्या तीन-साडेतीन वर्षांचा धावता आढावा आहे. रोज सकाळ झाली की एक नवीन अडचण उभी राहते. मात्र, ती दूरही होते याचे कारण आम्ही त्या समस्यांना सकारात्मक दृष्टीकोनातून सामोरे जातो. मोर्चे येतात, शिष्टमंडळे येतात, त्यांच्या शक्य तितक्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि त्याचे श्रेयही त्यांना देतो, कारण आम्ही जनतेच्या समस्या सोडवण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवलेला असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मी निर्णयक्षमता हा गुण शिकलो असे सांगत गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वाधिक निर्णय घेणारे मंत्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
 
पूर्वी भाषणात आपण म्हणायचो की, गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले वगैरे. पण आज महाराष्ट्राने सगळ्या राज्यांना मागे टाकले असल्याचे फडणवीस म्हणाले. 'जलयुक्त शिवार' योजना आता एक लोकचळवळ बनली असल्याचे नमूद करताना मराठवाड्यातील भूजल पातळी गेल्या तीन वर्षांत तीन मीटरने वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. असेच काम केल्यास येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रात दुष्काळ हा शब्दच इतिहासजमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला मुख्यमंत्रीपद दिले तेव्हा ते म्हणाले होते की, हे पद तुझ्यासाठी नाही तर समाजासाठी आहे. महाराष्ट्र हे दलालांचे राज्य बनले असून ही परिस्थिती तुला बदलायची आहे. हा बदल आपण नक्कीच घडवू, महाराष्ट्रात ती क्षमता नक्कीच आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
 
महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य मुख्यमंत्री मिळाला : डॉ. मोरे
महाराष्ट्र राज्याला योग्य वेळी योग्य मुख्यमंत्री मिळाला असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, स्वच्छ प्रतिमेचा माणूस बऱ्याचदा प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी काहीच करत नाही. 'टू बी ऑर नॉट टू बी' प्रमाणे 'टू साईन ऑर नॉट साईन' असा विचार तो करतो. मात्र, फडणवीस यांच्याबाबतीत तसे नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा १९६० नंतरचा इतिहास पाहिला असता ब्राह्मणांनी राजकारण करूच नये, अशी मानसिकता होती. मात्र, अशातही फडणवीस यशस्वीपणे मुख्यमंत्री झाल्याचे मोरे म्हणाले. त्यांच्या कार्यकाळात निघालेल्या मोर्चांइतके मोर्चे कुणाच्याच काळात निघाले नाहीत. पण फडणवीस यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांचे समाधान केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला योग्य वेळी मिळालेले योग्य मुख्यमंत्री असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
 
राज्यातील जनतेचे मुख्यमंत्र्यांवरील प्रेम जाणवले
सरकारचे दावे खरे की विरोधकांचे दावे खरे, हे पाहण्यासाठी मी राज्यभर फिरलो. सुमारे २५ जिल्हे एसटीने फिरलो. यातून या पुस्तकाची संकल्पना साकार झाल्याचे या पुस्तकाचे लेखक आशिष चांदोरकर यांनी सांगितले. राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडत असून राज्यभर फिरताना त्या मला जाणवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सोशल मीडियावर जे दिसते आहे, ते खरे नाही, हेही नमूद करतानाच, फडणवीस यांच्यावर राज्यातील जनतेचे असलेले प्रेम आपल्याला या प्रवासात जाणवल्याचे आशिष चांदोरकर यांनी यावेळी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@