समितीची सावली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
 
स्त्री शिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांनी केली. आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे, सावित्रीबाई अशा अनेकांनी केलेल्या प्रयत्नांनी मुली शिकू लागल्या. महिलांच्या शिक्षणातील अडचणी काही कमी नव्हत्या. समाजाची पुरुषप्रधान मानसिकता, कमी वयात होणारी मुलींची लग्ने, शिक्षणाच्या अपुर्‍या सुविधा अशा अनेक अडचणींना तोंड देत हळूहळू मुली शिकू लागल्या. शिक्षणाच्या सोयी पोहोचल्या नव्हत्या असा तो काळ. स्वातंत्र्यानंतर स्त्री शिक्षणाला उत्तेजन मिळाल्याने नोकरी करणार्‍या स्त्रियांचे प्रमाण वाढू लागले. घराबाहेर राहून नोकरी करायची तर मुख्य अडचण होती ती सुरक्षित रहाण्याच्या ठिकाणाची. ही गरज नेमकी ओळखून नाशिकमध्ये राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीच्या वतीने १९६४ मध्ये अहिल्यादेवी वसतिगृहाची निर्मिती करण्यात आली. या वसतिगृहाला आज पन्नासपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली. संस्थेचा इतिहास, वाटचाल व २४ एप्रिलला वसतिगृहाच्या नवीन वास्तूची पायाभरणी हे सर्वच महिला सबलीकरणाच्या वाटचालीतील मैलाचे दगड आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
राष्ट्रसेविका समितीची स्थापना वं. मावशी केळकरांनी १९३६ साली केली. चारित्र्यसंपन्न, राष्ट्रभक्त महिलांचे संघटन समितीच्या रूपाने उभे राहिले. पुरुषांप्रमाणेच महिलांचेही योगदान असावे व त्यांच्या माध्यमातून संस्कारांचे रोपण भावी पिढीवर व पर्यायाने समाजावर करता यावेत यासाठी महिला सक्षम, समर्थ व संघटित व्हाव्या, असा प्रयत्न समितीच्या कार्यक्रम, प्रकल्प व उपक्रमांच्या माध्यमातून केला जातो. वं. मावशी ज्या संस्कारात वाढल्या आणि ज्या संस्थेच्या प्रमुख संस्थापिका राहिल्या त्यात लौकिक मालमत्ता करावी, वाढवावी याला प्राधान्य नव्हतं. समितीच्या सेविकांची संपत्ती म्हणजे राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिष्ठा. ही मूल्यं सेविकांमध्ये झिरपावी म्हणून समितीने आदर्श मानले तेही जिजाबाई, लक्ष्मीबाई व अहिल्याबाई यांना. कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांची ही मूर्तिमंत प्रतिके. या आदर्शांना मूर्तरूप देण्यासाठी गोदावरीच्या रम्य परिसरात, श्रीरामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत राणी लक्ष्मीबाईचे स्मारक उभारण्याचे ठरले आणि वं. मावशींच्या प्रेरणेने राणी लक्ष्मीबाईंच्या बलिदान शताब्दी वर्षात राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती ही संस्था नाशिकमध्ये स्थापन झाली. महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेली ही संस्था. संघटन उभे करायचे तर त्याची पहिली पायरी म्हणजे महिला संपर्क. घर, घरातील जबाबदार्‍या व मातृत्वाच्या अनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या यात जर स्त्रीला भक्कम संस्थात्मक आधार मिळाला तर ती समाजकार्यासाठी वेळ देऊ शकते, याची जाणीव समितीच्या नेतृत्वाला होतीच. या उद्देशाने तसेच समाजाची गरज भागावी म्हणून राणी लक्ष्मीबाई स्मारक समितीतर्फे वाटचालीतील वेगवेगळ्या टप्प्यांवर उद्योग मंदिर, पाळणाघर, बालमंदिर, वसतिगृह, पौरोहित्य वर्ग, भजनवर्ग इ. अनेक उपक्रम सुरू झाले. सर्वच उपक्रमांनी महिला सक्षमतेला वेगवेगळे आयाम दिले. यापैकी एक महत्त्वाचा आयाम म्हणजे नोकरदार महिला व विद्यार्थिनींसाठीचे वसतिगृह.
 
२ मे १९५८ या दिवशी राणीसाहेबांची तिथीनुसार १०१ वी पुण्यतिथी होती. या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई स्मारकाचे उद्घाटन झाले.नाशिकच्या दृष्टीने अतिशय मध्यवर्ती असलेल्या अशोकस्तंभाजवळ इमारत तर झाली. या वास्तूत सतत महिलांचं, सेविकांचं येणंजाणं राहावं, यातून त्यांचे वास्तूसोबतचे स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत, स्थायी कार्याच्या बहरण्यातून समाजाचा समिती कार्यावरील विश्वास अधिक वाढावा, यासाठी करता येण्यासारखी गोष्ट होती ती म्हणजे महिलांसाठी सुरक्षित निवास. प्रथम तीन मुलींपासून सुरू झालेलं वसतिगृह पुढे कामकाजी महिलांसाठी झालं. १९७५ मध्ये महिला वर्षाच्या निमित्ताने वसतिगृहाला केंद्रीय समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळालं, पण हा सर्व झाला वसतिगृहाच्या तांत्रिक विकासाचा भाग. राष्ट्रसेविका समितीसारखी संस्कारांसाठी जागरूक असणारी संस्था जेव्हा वसतिगृह चालवते तेव्हा ते इतरांपेक्षा वेगळं असणार हे ओघाने आलंच. रात्रीचे बाहेर जावे लागू नये म्हणून मेस व सुरक्षित निवारा एवढ्यावरच न थांबता खास वसतिगृहातील मुलींसाठी महिना दोन महिन्यातून एकदा आरोग्य, मनोरंजन, संगीत, वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रोज रात्री वसतिगृहातील मुलींची प्रार्थना असते.
 
नाशिक हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. आजूबाजूच्या अनेक तालुक्यांमध्ये आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणांहून शिक्षणासाठी मुली नाशिकमध्ये येतात. प्रथमच घर सोडल्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत असतात. सुरक्षित व मायेचा निवारा ही त्यांची मोठीच गरज असते. त्यामुळे समितीने गेल्या चार पाच वर्षांपासून नोकरी करणार्‍या महिलांबरोबरच या मुलींची सोय संस्थेत विनाशुल्क केली होती. विविध प्रकारच्या परीक्षा देणार्‍या मुलीही परीक्षा काळात येथे राहाण्यासाठी येतात. शिक्षणाच्या प्रसारामुळे व नाशिक हे शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या वाढणारं शहर असल्याने वसतिगृहाची मागणी सातत्याने वाढते आहे. वसतिगृहाची संख्यात्मक वाढ व्हायची असेल तर संख्यात्मक वाढीला पर्याय नाही. जागेअभावी संस्था आज ही मागणी पुरवू शकत नाही. म्हणूनच वसतिगृहाच्या नवीन वास्तूचा संकल्प समितीने सोडला आहे. त्याच्या सिद्धीसाठी समाजाच्या पाठिंब्याची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. वसतिगृहाची आजवरची परंपरा व समितीच्या आजवरच्या कार्याचा ठसा यातून हे नक्कीच घडेल यात शंका नाही.
 
आज दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राणी भूवन येथे अहिल्यादेवी वसतीगृहाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका आणि संस्थेच्या अध्यक्षा शांताक्का, चांडक, हेमंत राठी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 
 
 
 
 
- शोभना भिडे  
@@AUTHORINFO_V1@@