महाभियोगाच्या विरोधात ५० वकिलांनी उठवला आवाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

 

 
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे दिले निवेदन

मुंबई: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर निरनिराळे आरोप करत काँग्रेससह सात पक्षांनी महाभियोगाचा प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर या प्रकरणावरुन देशभरात गदारोळ उडाला. दरम्यान, व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी हा प्रस्ताव फेटाळून लावला. काँग्रेसने राजकारण करत सरन्यायाधीशांविरोधात दाखल केलेल्या या महाभियोग प्रस्तावाविरोधात आता मुंबईतील वकीलांनी आवाज उठवला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करण्याच्या लाजिरवाण्या प्रसंगानंतर आज मुंबईतील ५० प्रतिष्ठित वकिलांच्या गटाने ऍड. प्रशांत मग्गू यांच्या पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान मुख्य न्यायमूर्तींना एक निवेदन सादर केले.

वरिष्ठ वकील प्रशांत मग्गू यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मुख्य न्यायमूर्तींना देण्यात आले. या निवेदनात वकिलांनी म्हटले आहे की, “सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्तावामुळे आम्ही दुखावले गेलो असून हा राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या नियम आणि अधिकाराला आव्हान देण्याचा प्रकार आहे. यामुळे फक्त सरन्यायाधीशच नव्हे तर संपूर्ण न्यायपालिकेचीच प्रतिमा मलिन झाली आहे. हा प्रकार घटनेच्या अवमानासारखाच आहे,’’ असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्तावावर चोहोबाजुंनी टीका होत आहे, तर काँग्रेसने प्रस्ताव फेटाळल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.

ही तर राजकीय चाल...

भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव ही राजकीय चाल आहे. सरन्यायाधीशांच्या विरोधात सुरू असलेला हा प्रकार लवकरात लवकर बंद झाला पाहिजे, अशी मागणी येथे आम्ही करत आहोत.

- प्रशांत मग्गू, वरिष्ठ वकील

@@AUTHORINFO_V1@@