पाण्यासाठी घाम गाळताना पाणिग्रहण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

 
 
 
- वधू- वरांनी केले श्रमदान अन्‌ लग्नाचा खर्चही दिला पाणी फाऊंडेशनला



डॉ. प्रवीण कावल
खानापूर (जि. अकोला),
पाण्याशी बेईमानीने वागल्याने अनेक गावांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशी धमक असलेल्या गावखेड्यातल्या तरुणांना लग्नापासून पारखे व्हावे लागण्याची वेळ आली. आपल्या मुलीला डोईवर पाण्याची कळशी घेऊन मैलोन्‌गणती तंगडतोड करावी लागेल, म्हणून कुणी आपली लेक अशा कोरड्या गावांत द्यायलाही तयार नाही. मात्र, गाव जलसमृद्ध करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या नेतृत्वात अवघे गाव घाम गाळायला भर उन्हांत ओसाड माळरानावर उतरले असताना घरचं मंगलकार्य वधू- वरासह श्रमदान करून श्रमदानाच्या ठिकाणीच पाणिग्रहण- म्हणजे लग्न करायचे, असे ठरवून तसे करण्यातही आले!
पातूर तालुक्यातील चतारी या गावांतील गावातील प्रतिष्ठित नागरिक सुभाषराव कीर्तने हे त्यांचा मुलगा अंकुश याचा विवाह थाटामाटात करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते, परंतु दुष्काळावर मात करण्यासाठी आपले गाव आणि गावकरी करीत असलेले पाणी फाऊंडेशनचे काम पाहून सुभाषराव कीर्तने यांनी त्यांच्या मुलाचे लग्न बांधावर करायचे, ठरविले. लग्नाला येणारा खर्च हा पाणी फाऊंडेशनला प्रदान करावा म्हणून त्यांनी खामगाव तालुक्यातील शहापूर येथील ़िशवदास भंबरे यांची सुकन्या पूनम हिच्या सोबत शुक्रवार, 19 एप्रिल रोजी पाणी फाऊंडेशनच्या श्रमदान करण्याच्या दिवशीच आदर्श पद्धतीने विवाह लावून दिला व लग्नाला येणारा संपूर्ण खर्च रुपये 51 हजार पाणी फाऊंडेशनला सुपूर्द केले. कळशी डोक्यावर घेऊन पाण्यासाठी वणवण करण्यापेक्षा आताच श्रमदान केले तर तर गावच पाणीदार होईल, या समजुतीने नव्या वधूनेही श्रमदान केले. घामाच्या अक्षता अन्‌ टिकास - फावड्याचीच वाजंत्री होती.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने पातूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असतानाच गेल्या 3 वर्षांपासून पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावकर्‍यांच्या मदतीतून जलसंधारणाचे काम सुरू आहे. चतारी येथे सत्यमेवजयेत वॉटरकप 3 च्या अंतर्गत रविवार, 8 एप्रिलच्या रात्री 12 वाजतापासून श्रमदानासाठी चतारी गाव सज्ज झालेे.
या गावातील महिला व पुरुष नियमितपणे सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 6 ते 8 पर्यंत श्रमदानाकरिता हजर होतात. काही तर कामाच्या ठिकाणीच रात्रीस मुक्काम करतात. पाण्याची टंचाई भविष्यात निर्माण होवू नये म्हणून पेटून उठलेले गाव म्हणजे चतारी.
या गावात पाण्याची भीषण समस्या आहे. गावाच्या आजूबाजूला असलेल्या विहिरी कोरड्या पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. पिण्याचे पाणी ग्रामस्थांना विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनमध्ये श्रमदान करण्यासाठी गावातील नागरिक जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येत आहे.
त्यात किर्तने कुटुंबातला विवाहच श्रमदानाने साजरा करण्यांत आल्याने एक नवाच उत्साह संचारला आहे. यावेळी नारायणराव गव्हाणकर, जिप अध्यक्ष संघ्या वाघोडे, जिप सदस्य अनिता आखरे, सरपंच काशिनाथ सदार, ग्रापं सदस्य, स्वच्छता समिती सदस्य व गावातील 500 च्यावर श्रमदान करणारी मंडळी तसेच पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक मंगेश निमकंडे यांची उपस्थिती होती.
@@AUTHORINFO_V1@@