जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : जिल्हा ‘कुपोषणमुक्त’ करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे आरोग्य विभागाने पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी दिली. नवजात बालकांवर कुपोषण किंवा अन्य आजारांसंदर्भात तातडीने उपचार व्हावेत यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता केंद्र तर नाशिक, दिंडोरी, कळवण आणि सुरगाणा येथे पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, मालेगाव येथे बाल उपचार केंद्रे आहेत. ग्रामविकास आरोग्य केंद्र (व्हीसीडीसी) सोबत गरज पडल्यास १०६ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाल उपचार केंद्र सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 
बाळ झाल्यानंतर त्याचे बर्‍याचदा अपुरे वजन, न्यूमोनिया, जंतुसंसर्ग यामुळे त्यांना त्रास होतो. याबाबत वेळीच उपचार न झाल्यास काही वेळा बाळ दगावण्याची शक्यता असते. आशा सेविकांना याबाबत प्राथमिक प्रशिक्षण देत त्यांच्याजवळ या तीनही आजारांबाबत औषधांचे संच देण्यात आले आहेत. जेणेकरून बाळाला प्राथमिक उपचार मिळतील. या उपचाराने बाळाला आराम न पडल्यास त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. यामुळे बालमृत्यू दर नियंत्रणात येण्यास मदत झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
 
कुपोषण, माता-बालमृत्यू यांचा अभ्यास करताना गरोदरपणात मातेला सकस पोषण आहार न मिळाल्याने, कधी बाळात जन्मत: असणारे व्यंग, जोखमीची बाळंतपणे अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यात माता बालमृत्यू दर बर्‍यापैकी राहिला आहे. यामध्ये आदिवासीबहुल असलेल्या त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ येथे बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१६-१७ च्या आकडेवारीनुसार पेठमध्ये सर्वाधिक म्हणजे १८ टक्के, सुरगाणा येथे १५, तर त्र्यंबकेश्वर येथे १६ टक्के अर्भकमृत्यूचा दर राहिला. या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मे-जूनमध्ये मातृत्व अॅपच्या मदतीने गरोदर मातांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला. मातृत्व अॅपच्या मदतीने या तीनही तालुक्यातील गरोदर मातांना शोधायचे, त्या ज्या ठिकाणी राहतात तेथील अंगणवाडी सेविका, आशा यांच्याकडून त्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठी प्रवृत्त करायचे, त्यांच्या गरोदरपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात वेळोवेळी तपासणी करणे, रक्ताची पातळी तपासणे, बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही, हे पाहण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीसाठी आणणे, विशेष उपचाराची गरज असल्यास जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करणे, तिला जननी-शिशू सुरक्षा, जननी सुरक्षा, मानव विकास अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@