अभ्यासपूर्ण जगण्याची कला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |
 
 
आजचा काळ शैक्षणिकदृष्ट्या अटीतटीचा आहे. जो शिक्षणात व परीक्षांत टिकला, तो पुढे गेला, तोच आयुष्यात पुढे जाईल, या पालकांच्या सर्वसाधारण मताला आव्हान देणे तसे कठीणच आहे. तरीही पालकांनी आपल्या मनावर दबाव आणून, त्यांच्या अभ्यासात किंवा परीक्षेच्या तयारीत सुधारणा होईलच, याची ग्वाही देता येत नाही. अभ्यासात रस नसणार्‍या मुलांवर दबावतंत्र वापरल्याने अभ्यासामुळे आपण आपल्या घरातल्यांना आवडत नाही, अभ्यासामुळेच आपल्याला चार शब्द वेळोवेळी ऐकून घ्यावे लागतात, याचा संताप येतो. अभ्यासाला ज्या ज्या गोष्टी जोडल्या आहेत, जसे की शाळा, पुस्तके, शिक्षक या सगळ्याचाच मुलं रागराग करता. विशेषतः त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल नावड व चिडचिड व्यक्त करायची असते.
 
यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट पालकांनी करायची आहे, ती म्हणजे सकारात्मक भूमिकेतून मुलांनी शिक्षण व अभ्यास या विषयावर सुसंवाद स्पष्टपणे साधायचा. पालकांनी मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून त्यांच्यावर राग व्यक्त केला, तर मुलं पालकांचाच विरोध करतात. मुलं जेव्हा शाळेत जायला सुरुवात करतात, त्याचवेळी त्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण करायला हवी. शिक्षणाचे माणसाच्या आयुष्यात किती महत्त्व आहे, आयुष्यात पुढे जायला त्याची कशी मदत होईल, याबाबत चर्चा करायची. शाळा आणि गृहपाठ या गोष्टींचे अवडंबर न माजवता सहजपणे हळूहळू त्यांच्या मनात अभ्यासाचे महत्त्व निर्माण केल्यास, मुलं ‘अभ्यास’ या संकल्पनेत रुळतात. आजकाल अभ्यासापेक्षा इतर अवडंबरेच फार असतात. या इतर अवडंबरांमुळेच मूल आणि पालक सदैव तणावाखाली दिसून येतात. हा तणाव जितक्या लवकर हलका करता येईल, तितका बरा. काही नियमआणि नियमितपणा मुलांना लहानपणापासूनच शिकवलेला बरा. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट मुलांना होमवर्क आणि अभ्यासाची सर्वसाधारण संकल्पना कळू दिली पाहिजे.
 
अभ्यास हा होमवर्कपेक्षा जरा वेगळा अशासाठी की, होमवर्क शाळेतून शिक्षकांनी मुलांचे एखाद्या विषयांतील ज्ञान वाढविण्यासाठी दिलेला सराव आहे, तर अभ्यास करणे म्हणजे एखाद्या विषयाला समजून घेण्यासाठी किंवा त्या विषयाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण त्यात वेळ व्यतीत करतो. त्या अभ्यासाची प्रक्रिया असते. पालकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. होमवर्क केले, आता आणखी अभ्यात कसला? तर अभ्यासात आपण एखादा विषय शिकतो त्याची व उजळणी करतो. आपल्याला तो विषय नीट समजला की नाही, याची जाणीव म्हणजेच अभ्यास आपला आपण कसा करावयाचा हे मुलांना समजावले की त्यांची शिक्षणाविषयीची जबाबदारी वाढायला लागते. आपण अभ्यासातल्या कुठल्या गोष्टींना अग्रक्रमद्यायला पाहिजे, हे त्यांना समजायला लागते. अभ्यास कसा करायचा, याची सवय लहान वयातच मुलांना लागते. मुलांना रोज थोडा थोडा अभ्यास करायला प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. मुलांचे होमवर्क बर्‍याचवेळा पालक स्वतःच करतात, पण इतर गोष्टींबरोबर मुलांनी अभ्यासात स्वावलंबी होणं व रमणं भविष्याच्या दृष्टीने केव्हाही उत्तमच होय.
 
मुलांना बहुतेक वेळा स्वतःची अशी जागा घरात द्यावी, अर्थात याचा अर्थ जिथे इतर गोष्टी न करता फक्त अभ्यासच करावा. ती जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना थोडी मोकळीक द्यावी. मुक्तपणे वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरुन मुलांचे आधी अभ्यासाशी व नंतर शिक्षणाशी एक खास नाते निर्माण होईल. आपण स्वतः आयुष्यात अभ्यासासारखी गोष्ट करु शकतो, ही जाणीव त्याविषयी आपलेपणा व विशेष जबाबदारीची जाणीव निर्माण करते. मुलांना अभ्यासात दिरंगाई करु न देता वेळच्या वेळी अभ्यास वा होमवर्क करायची सवय तर लावावीच, पण त्यांचे पूर्ण झाले की पालकांनी स्वतः त्याबद्दल समाधान व्यक्त करायला हवे. मुलांनाही त्याबद्दल संतुष्ट व्हायला शिकवावे. हातचे कुठलेही कामव्यवस्थित पूर्ण केल्यावर येणारा समाधानाचा अनुभव नेहमी प्रेरित करणारा असतो. मुलांना त्याबद्दल शाबासकीही द्यावी. आजचे पालक मुलांच्या अभ्यासाच्या मागे इतके असतात की, ती मुलं आहेत आणि त्यांच्या इतर आवडीनिवडी असू शकतात याची दखलच घेत नाहीत. मुलांच्या मूलभूत भावना व आवडीनिवडींची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या आईवडिलांना आपली सर्व बाबतीत काळजी आहे वा आपल्या सगळ्या गरजांची ते उत्तमआणि तितक्याच निगुतीने काळजी घेतात, हे लक्षात आले की, मुले पालकांच्या शिस्त लावण्याच्या व अभ्यास करण्याच्या कृतीचा तितकासा विरोध करत नाहीत. या शिवाय अभ्यास आणि होमवर्कच्या व्यतिरिक्त पालक मुलांबरोबर किती वेळ देतात, त्यांच्या इतर गरजा कशा समजून घेतात, त्यांना इतर अवघड प्रसंगी भावनिक आधार कसा देतात, अभ्यासाशिवाय इतर प्रसंगी त्यांना प्रोत्साहन कसे देतात, या गोष्टींवर मुलांचा पालकांवर किती विश्र्वास आहे, हे अवलंबून असते.
 
आपलं मूल अभ्यासाच्या ओझ्याखाली त्रस्त तर होत नाही ना याची खात्री पालकांनी वेळोवेळी केली पाहिजे. त्यांच्या अभ्यास करण्याच्या सवयीवर वेळोवेळी लक्ष ठेवून, अभ्यासाच्या सक्षमसवयी त्यांना कशा लागतील याचा प्रयत्न पालकांनी नक्की केला पाहिजे. काही कठीण विषय हाताळताना पालकांनी आपल्या मुलांबरोबर ते विषय शिकण्याचा व हाताळण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मुलांना एकटेपणा वाटत नाही. शाळा, होमवर्क, अभ्यास वा शिक्षक याबाबत मुलांचा स्वत:चा असा एक सकारात्मक वा नकारात्मक अनुभव असतो. दोन्हीही अनुभवी जाणून घेणं शहाणपणाचं आहे. एखादा अपमानास्पद अनुभव, शिक्षकांबद्दलची अढी इतर मुलांबरोबरची समस्या व स्वतःच्या अपयशाबद्दल वाटणारा भावनिक उद्रेक सगळेच जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही गोष्टी प्रौढांप्रमाणे मुलांना व्यक्त करता येत नाहीत. तो ताण मुलांच्या मनावर असतो. त्या ताणातून स्पष्ट संवाद साधण्याचे कौशल्य पालकांनी निर्माण केले तर बर्‍याच गोष्टी मुलांसाठी सोप्या करता येतील. शेवटी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, अभ्यास व शिक्षण या एखाद्या कॅपस्यूलमध्ये बंद असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या पूर्ण जगण्याचाच एक भाग आहे.
 
 
 
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@