दुःखाची किंमत कळणे हाच मोठा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
कोसळत्या दु:खांना
मी नाही म्हणाले नाही...
वाटेवरच्या काट्यांवर
मी कधीच रूसले नाही...
झिजणे असेल कमीच माझे
चंदन होण्यास मी
नाही म्हणले नाही...
 
माणसाचं आयुष्य सुख-दुःखाचं गाठोडं असतं. त्या अजब गाठोड्यातून कुणाच्या वाट्याला किती टक्के दुःख आणि किती टक्के सुख येईल, याचा हिशोब करता येऊच शकत नाही. ऊन-पावसाच्या सरींसारखा सुखदुःखाचा खेळ सुरूच असतो, पण काही आयुष्यांना ‘दुःख माझा सांगाती’ म्हणत जीवन व्यतीत करावे लागते. ‘सुख म्हणजे काय रे दादा?’ असे प्रश्‍न पडतील असे आयुष्य जगावे लागते. पण, असे असतानाही सगळ्या वैयक्तिक दुःखांवर मात करत, सार्वजनिक आयुष्यात सुख पेरण्याचा प्रयत्न करणारेही काही असतात. त्यापैकी एक नूतन भोईर. पूर्वाश्रमीच्या नूतन किणी. पालघरच्या शेतकरी कुटुंबातली नूतन, लहानपणी त्यांच्या वाडीत काम करण्यासाठी वनवासी पाड्यातले बांधव यायचे. त्यांची ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ची जीवनपद्धती, समाजाच्या मूळ प्रवाहापासून फटकून राहण्याची वृत्ती, त्यामुळे त्यांचे झालेले सामाजिक आणि वैयक्तिक नुकसान, हे नूतनने लहानपणापासून अनुभवले. नूतन यांच्या वाडीत शेतमजुरीसाठी वनवासी मुली यायच्या, काम संपेपर्यत तिथेच राहायच्या. पाड्यातून गावात आल्यावर कसे वागले पाहिजे, बोलले पाहिजे याचा धडाच नूतन त्यांना द्यायच्या. या काळात त्यांनी पाहिले की, कितीतरी मुली, बायका अचानक यायच्या बंद झाल्या. कधी त्यांना भूत लागलेले असे, तर कधी म्हणे त्यांच्यावर देवीचा प्रकोप झालेला असायचा.
 
पुढे वयाच्या १६ व्या वर्षी नूतनचा विवाह पांडुरंग भोईर यांच्याशी झाला. त्या मुंबईत कुलाब्याला आल्या. १७ व्या वर्षी त्यांना बाळ झाले. नूतन यांच्या लग्नाला उणीपुरी पाच ते सहा वर्षे झाली आणि पांडुरंग किणी यांना कर्करोग झाला असे निदान झाले. दुर्दैवाने त्यावेळी नूतन यांचे वय अवघे २३ होते आणि त्यांना दुसरे बाळ होणार होते. कुणाच्याही पायाखालची वाळू सरकण्यासारखी परिस्थिती. पांडुरंग सेल्स टॅक्समध्ये कारकून म्हणून नोकरी करत होते. कधीही घराबाहेर न पडलेल्या नूतन यांनी कंबर कसली. पतीच्या उपचारासाठी, घर, कुटुंब, दोन मुलांना जगवण्यासाठी हिंमतीने उभ्या त्या राहिल्या. चांगली नोकरी मिळवण्यासाठी चांगले शिक्षण पाहिजे, म्हणून त्यांनी पहिल्यांदा पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. स्वतःच्या क्षमता वाढवण्यासाठी नागरी संरक्षण दलाचे सर्वच अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. नोकरी व्यतिरिक्त शेतकरी, कोळी बांधव कोणत्या जोडधंद्याद्वारे उत्पन्न मिळवू शकतो, याचा विचार करून ते प्रशिक्षण पूर्ण केले. घरची ओढाताण तर होतीच. पतीला झालेला कर्करोग कणाकणाने त्यांना मृत्यूच्या जवळ नेत होता. त्यांच्या मृत्यूनंतर काय? काहीही झाले तरी अनिश्‍चितता नसावी हा विचार करून, नूतन यांनी मुंबई विद्यापीठामध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी पत्करली.
 
याचवेळी नूतन यांच्या मनात प्रचंड उलथापालथ होत होती. पतीच्या कर्करोगाने त्यांच्या भावविश्‍वात खळबळ माजवली होतीच. दुसरीकडे माहेरी पालघरला जाणे झाले की तिथल्या ओळखीच्या वनवासी बंधू-भगिनींचे आयुष्यही काळजाला घर पाडे. त्यांचे जीवन अजूनही तसेच होते. त्यांचे दुःख पाहून, प्रश्‍न पाहून, नूतन यांना आपल्या दुखाची तीव्रता कमी वाटू लागली. पतीच्या उपचारार्थ कर्करोग दवाखाना औषधे, रूग्ण यांची सखोल माहिती झाली होती. पालघर, डहाणूच्या पट्ट्यात त्यांना कितीतरी महिला भेटत होत्या ज्या कर्करोग, क्षयरोग, कुपोषणग्रस्त होत्या, पण आपल्याला कोणता आजार नसून, आपल्यावर कोणी तरी मूठ मारली आहे, सैतानाने पकडलं आहे किंवा देव कोपला आहे असेच त्यांना वाटे. त्यामुळे उपचार न करता त्या हकनाक मरून जात. किड्यामुंग्यांसारख्या. नूतन आपले कुटुंब सांभाळत, नोकरी करत त्यांच्या प्रश्‍नावर लिहू लागली, काम करू लागली, प्रशासनाकडे दाद मागू लागली. त्यांच्यासाठी जागृती शिबीर, आरोग्य शिबीर घेऊ लागल्या.
 
बघता बघता नूतनच्या कामाचा व्याप वाढला. आता ती फक्त सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारी स्त्री नव्हती, की कुटुंबासाठी राबणारी कुटुंबवत्सल स्त्री नव्हती, तर पालघर, डहाणू पट्ट्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज न घेता, पाड्या पाड्यात घुसून, वनवासी बांधवांचे अश्रू पुसणारी निस्वार्थी समाजसेविका होती. दरम्यान दहा वर्षे कर्करोगाशी झुंज देऊन, नूतनच्या पतींचे निधन झाले. मनातून कितीही दुःख झाले तरी नूतन यांना थांबणे शक्यच नव्हते. सुरक्षा रक्षकाचे काम करणे ही आर्थिक गरज होती आणि समाजाची सेवा करणे ही मानसिक गरज होती. नूतन यांनी दोन्ही गरजांना प्राधान्य दिले.
 
जागतिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे वनवासी समाजात नवे प्रश्‍न उभे राहत आहेत. त्या सर्वांचा वेध घेत, नूतन काम करत आहेत. शेतकर्‍याची, दर्याच्या राजाची लेक असलेली नूतन वनवासी बांधवाच्या हक्कासाठी कार्यरत आहे. या कामासाठी त्यांना कित्येक पुरस्कार मिळाले आहेत. नूतन म्हणतात, ’’दुःखांची किंमत कळणे आणि सुख वाटणे सारखा दुसरा कोणताच पुरस्कार नाही आणि देवाने तो मला भरभरून दिला आहे,’’ गुडघे न टेकता परिस्थितीशी सामना करणार्‍यांचेही माणूसपण असते. नूतन भोईर यांच्यावर कोसळून पडण्याचे प्रसंग आले, पण त्या ठामपणे उभ्या राहिल्या, स्वतःसाठी आणि समाजासाठीही.
 
@@AUTHORINFO_V1@@