‘मला काय त्याचे’ ही प्रवृत्ती सोडायला हवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018   
Total Views |

कठुआ प्रकरणाने शिकवलेला धडा ... भाग ३


 
 
येत्या वर्षभरात अशा अनेक घटना घडतील ज्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला केला जाईल. विरोधक एकत्र येतील व आपल्याच धार्मिक मान्यतांवर आघात करतील. मात्र त्यावेळी ते विशिष्ट एका पक्षाच्या किंवा संस्था-संघटनेच्या विरोधात आहे असे म्हणून गप्प बसण्यात शहाणपण नाही हे लक्षात घ्यायला हवे. मला काय त्याचे या वृत्तीनेच आजवर भारताचा घात केला आहे. 
 
 
एखाद्या बलात्कार, दंगल, खून अथवा जाळपोळीच्या घटनेआडून हिंदू समाजाला लक्ष्य करणे हे काही भारतात नवीन नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशातील हिंदू समाज हे पाहात आलेला आहे. ब्रिटिश शासनकाळापासूनच हिंदू धर्मीयांना त्यांच्या धर्माबाबत तडजोडी कराव्या लागल्या आहेत. तेव्हाही व स्वातंत्र्यानंतरही जवळपास सहा दशके मुस्लिम लांगुलचालनाची परंपरा सत्ताधाऱ्यांनी चालूच ठेवली होती. त्यामुळे हिंदूंनी वारंवार अन्याय सहन केल्याच्या कितीतरी दाखल्यांनी इतिहासाची पाने भरलेली आहेत. हिंदुत्त्वासाठी काम करणाऱ्या संघटनाही त्यावेळी अशा सुलतानी संकटासमोर दुबळ्या ठरत असत. परंतु त्यांचे प्रयत्न कायमच तोकडे पडत राहिले. मात्र आता तसे राहिले नाही. हिंदुत्त्वासाठी काम करतो असे सांगणाऱ्या डझनभर संघटना आज देशात अस्तित्वात आहेत. त्यांचा विस्तारही सध्या चांगलाच फोफावला आहे. असे असतानाही यातील एकाही संघटनेने याविषयी अधिकृत भूमिका घेतलेली दिसत नाही. रासिनामधील निष्पाप मुलीला न्याय मिळावा ही तर देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा होती आणि आहे. अनेक संघटनांनी तिला न्याय मिळावा ही भूमिका तातडीने घेतली आणि ते आवश्यकही होते. मात्र या घटनेचे भांडवल करून निष्कारण थेट हिंदू समाजावर आरोप होत आहे हे दिसत असूनही यातील एकाही संघटनेने ठाम भूमिका घेतली नाही हे दुर्दैव.
 
 
कठुआ प्रकरण मोठे करण्यामागेच कारणच मुळी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करणे हे होते. कारण तसे नसते तर देशभरात कितीतरी बलात्कारांच्या घटनांच्यावेळीही अशीच आंदोलने दिसली असती. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्ये झालेले अल्पवयीन मुलींवर दिवसाढवळ्या झालेले बलात्कार हे जणू त्यांच्यावर संस्कार करण्यासाठीच केलेले असतात अशा थाटात पुरोगामी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करतात. डाव्यांची ही बेगडी मानवता आता साऱ्या जगाला माहिती आहे त्यामुळे त्यांच्याकडून सद्वर्तनाची अपेक्षा नाहीच. पण जेव्हा हे लक्षात आले की हे सर्व या पद्धतीने रंगवण्यामागे भाजपला बदनाम करण्याचा डाव होता तेव्हा भाजपने त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. पण तो राजकीय विरोध होता. म्हणजे भाजपने पोलीस योग्य ती कारवाई करतील यासाठी प्रयत्न केले, त्या गावात सीबीआयच्या तपासाची मागणी करणाऱ्या मोर्च्यात सहभागी झालेल्या भाजप मंत्र्यांचे राजीनामे घेतले, आपल्यावरील टीकाकारांना उत्तरेही दिली. अशाप्रकारे राजकीय आरोप करणाऱ्यांना भाजपने आपल्या पद्धतीने विरोध केला. मात्र हाच विरोध जेव्हा भाजपच्या आडून हिंदुत्त्वावर गेला तेव्हा मात्र भाजपने त्यावर मौन बाळगणेच पसंत केले.
 
 
मुळात या सर्व प्रकाराला हिदू विरुद्ध मुस्लिम असा रंग केव्हा दिला गेला हे समजून घेतले पाहिजे. १७ जानेवारी २०१८ या दिवशी त्या मुलीचा मृतदेह जंगलात सापडल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास सुरु झाला व प्राथमिक संशयित म्हणून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. १९ जानेवारी २०१८ या दिवशी जम्मू काश्मीर सरकारने विधानसभेत याविषयी निवेदनही दिले. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी याविषयी आपल्या सोशल मिडियावर खेदही व्यक्त केला. यानंतर दहाच दिवसांत म्हणजे २९ जानेवारी २०१८ या दिवशी पिडित मुलीच्या कुटुंबियांनी वकिल व आपल्या समाजातील काही जणांसमवेत मुख्यमंत्री मुफ्ती यांची भेट घेतली. २९ जानेवारी ते १ एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये हे सगळे प्रकरण आकार घेत गेले. दुसरीकडे आपल्याला हिंदू असल्यामुळे पोलिसांनी त्रास दिला असे आरोपीच्या कुटुंबियांना वाटत होते. जम्मू भागातील रोहिंग्या मुस्लिमांचे वाढते प्रस्थ कोणाच्या नजरेस येऊ नये त्यामुळे हे प्रकरण मुद्दाम असे रंगवले जात आहे असा संशय येऊन गावकऱ्यांना ही सरकारची चाल वाटली. दुर्दैवाने यालाच विरोध करण्यासाठी त्यांनी हिंदू एकता मंचाची स्थापना केली आणि तिथेच विरोधकांच्या हातात मुद्दा मिळाला. मग पुढची वाटचाल सोपी होती. आधी भाजपला विरोध करायचा, मग मंदिरांचा मुद्दा काढायचा, मग बॉलिवूड अभिनेत्रींना गाठायचे आणि मग हिंदूंना ठोकून काढायचे असा आराखडा तयार केला गेला.
 
 
जोपर्यंत भाजपला विरोध सुरु होता तोपर्यंत त्याला भाजपने उत्तर देणे हेच योग्य होते. मात्र जेव्हा या प्रकरणाचा संबंध थेट मंदिर, देवीस्थान, हिंदू धर्म याच्याशी जोडला गेला तेव्हा मात्र त्याला देशभरातून विरोध होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. स्वतःला प्रखर हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनाही यात नेमकी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट झाले नाही. एकीकडे बलात्कार व खून याचा तीव्र शब्दांत निषेध करून निष्पक्ष तपासाची मागणी करणे व दुसरीकडे तितक्याच तीव्र शब्दांत या प्रकरणाचा हिंदुत्त्वाशी संबंध लावण्याला विरोध करणे अशी भूमिका खरंतर या संघटनांनी घ्यायला हवी होती. मात्र दुर्दैवाने स्वतःच्याच प्रचाराची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे हिंदुत्त्वासमोर निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी उसंत मिळाली नसावी. देशात खरंतर राष्ट्रीय स्तरावर हिंदुत्त्वासाठी काम करणाऱ्या अशा अनेक संघटना आहेत. त्या एकमेकांशी संबंधित आहेत. त्या सर्व संघटनांचे जम्मू काश्मीरमधील किमान जम्मू परिसरात तरी काम आहे. त्यांनी वेळीच घटनेतील सत्य जगासमोर मांडून होणारे नुकसान टाळायला हवे होते. मात्र तसे झाले नाही कारण संस्थागत अभिनिवेश व हित यापेक्षा हे महत्त्वाचे वाटले नाही. वास्तविक व्यापक हिंदू हिताच्या कितीतरी मोठ्या आंदोलनांचा इतिहास अशा संघटनांच्या पाठीशी आहे. मात्र तरीही यावेळी गाफिल राहिल्यामुळे बलात्काराच्या आडून थेट हिंदुत्त्वावर हल्ला केला गेला आणि कोणीच काहीच करू शकले नाही.
 
 
केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही तर निरनिराळ्या राज्यांतही विविध हिंदुत्त्ववादी पक्ष अस्तित्वात आहेत. आपापल्या राजकीय उद्देशासाठी ते हिंदुत्त्वाचा डंका वाजवत असतात. मात्र जेव्हा कठुआ प्रकरणात थेट हिंदू धर्मावर हल्ला झाला तेव्हा मात्र यातील एकही राजकीय पक्ष काहीही बोलला नाही. हे भाजपविरोधात आहे ते पाहून घेतील अशी भूमिका बहुतांश पक्ष व संघटनांनी घेतली. बॉलिवूड सिनेतारकांनी हातात बॅनर घेऊन काढलेल्या फोटोंमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख नव्हता. त्यावर सरळ सरळ हिंदुस्थान, देवीस्थान, मंदिर असे उल्लेख होते ज्यातून उघडपणे हिंदू धर्म, संस्कृती यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र देशभरात एकाही हिंदुत्त्ववादी पक्षाने याबाबत भूमिका घेतली नाही हे दुर्दैव. आपापल्या प्रादेशिक अस्मिता जपण्यातच धन्यता मानणाऱ्या या संघटनांनी उगी राहून जे जे होईल ते ते पाहण्यातच धन्यता मानली. नाही म्हणायला सोशल मिडियातून वेळोवेळी हिंदुत्त्ववादी मंडळींनी या प्रकाराचा विरोध केला. मात्र ते प्रयत्न विखुरलेले होते त्यामुळे अपुरे पडले. विशेष म्हणजे निदान या पक्ष-संघटनांनी त्या मुलीला न्याय मिळावा अशी भूमिका तरी घ्यायला हवी होती मात्र ती ही न घेतल्यामुळे विरोधकांचे चांगलेच फावले.
 
 
कठुआ प्रकरणाने शिकवलेला तिसरा धडा म्हणजे किमान आतातरी मला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडायला हवी. येत्या वर्षभरात अशा अनेक घटना घडतील ज्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला केला जाईल. विरोधक एकत्र येतील व आपल्याच धार्मिक मान्यतांवर आघात करतील. मात्र त्यावेळी ते विशिष्ट एका पक्षाच्या किंवा संस्था-संघटनेच्या विरोधात आहे असे म्हणून गप्प बसण्यात शहाणपण नाही हे लक्षात घ्यायला हवे. मला काय त्याचे या वृत्तीनेच आजवर भारताचा घात केला आहे. त्यामुळे किमान आता तरी त्यातून शहाणपण शिकून व्यापक हिंदुत्त्वाचा विचार करत वेळोवेळी समोर उद्भवलेल्या प्रश्नांना एकत्रितपणे सामोरे जायला हवे. त्याच वेळी किमान राष्ट्रीय विचारांची सरकारे असलेल्या राज्यांत तरी कठुआ सारख्या घटना मुळात घडणारच नाहीत याची दक्षता त्या सरकारने घ्यावी यासाठी दबावगट निर्माण करायला हवा. कठुआ प्रकरण मुळात घडायलाच नको होते व ही त्या सरकारमध्ये बसलेल्या सर्वच पक्षांची जबाबदारी होती. मात्र दुर्दैवाने असे घडले जरी तरी त्यावर तातडीने उपाय करून त्यातून पुढे निर्माण होणारा अनर्थ टाळायला हवा. बलात्कारांकडे पाहण्याची आपली दृष्टी ही पिडितेला न्याय मिळायला हवा व आरोपीला कठोर शिक्षा मिळायला हवी तसेच बलात्कार पूर्णपणे थांबले पाहिजेत अशी असते मात्र त्याचे राजकीय भांडवलही केले जाते हा धडा नवीन आहे. त्यामुळे त्यापासूनही सावध राहायला हवे.
 
(समाप्त)
@@AUTHORINFO_V1@@