नेचर की नर्चर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |



“माझ्या कपाटातल्या उजव्या भागात, वरून दुसर्‍या कप्प्यात एका छोट्या काळ्या पर्समध्ये आहे ती क्लिप.’’ लेकीने असे सविस्तर मार्गदर्शन करून, मला तिची क्लिप आणायला सांगितली. मी अवाक आणि तितकीच आनंदात. आनंदाच्या भरात मी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली, “मुली, आज तू पुन्हा एकदा माझ्या पोटची पोर असल्याचा पुरावा दिलास. वा! घरातल्या बारीक-सारीक गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत ते नेमके सांगण्याचे खाते माझ्याकडे आहे.’’ लेकीने या बाबतीत माझ्या पावलावर पाऊल ठेवले याचा माझ्यातल्या आईला कोण आनंद झाला. आपल्या मुलांमध्ये आपण आपल्या स्वभावाच्या खुणा शोधत असतो आणि त्या सापडल्या की आपले बालपण त्यांच्या माध्यमातून पुन्हा जगत असतो. बाल्यावस्थेत बुद्धिमत्तेचा विकास कसा होतो, हे पाहण्याच्या आधी त्यातील अनुवंशिकतेच्या व परिस्थितीच्या सहभागाविषयी बोलणे मला जास्त आवश्यक वाटते. वैद्यकशास्त्र असो, शिक्षण क्षेत्र वा मानवी विकासाचे शास्त्र असो; चिकित्सा व निदान करताना, शिक्षणप्रक्रिया आखताना, स्वभावाचे आराखडे बांधताना, अनुवंशिकता महत्त्वाची ठरते.

नेचर की नर्चर, निसर्ग की संगोपन, कशाची भूमिका मानवी विकासात जास्त महत्त्वाची आहे? हा फार सनातन प्रश्न आहे. विकासाचे मानसशास्त्र याचा दोन अंगांनी विचार करते.

१. निसर्ग व संगोपन या दोन्हीचा मानवी विकासात सहभाग किती?

२. या दोहोंची सांगड कशी घालता येईल?

मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा याबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडतात. जैविक मानसशास्त्र म्हणते की, विकासामध्ये अनुवंशिक गुणांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा; तर वर्तनाचे मानसशास्त्र याला छेद देत म्हणते की, माणूस परिस्थितीने घडतो. जसा जसा मानवी विकासाचा सखोल अभ्यास होत गेला आहे, तसा या वादाबाबतचा दृष्टिकोन व्यापक होत गेला आहे. आज अभ्यासक हे मान्य करतात की, निसर्ग व संगोपन या दोहोंची भूमिका मानवी विकासात महत्त्वाची आहे. इतकेच नव्हे तर मानवाच्या संपूर्ण आयुष्यात या दोन्ही गोष्टी सातत्याने हातात हात घालून चालत राहतात.
शाळेत असताना माझ्यामध्ये अजिबात आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे माझं खूप नुकसान झालं. बरोबरच्या मुलांनी खूप त्रास दिला; शिक्षकांची बोलणी बसली; आई-वडीलही सारखं बोलायचे. माझ्या मुलाला हे भोगायला लागता कामा नये. मी त्याला सतत रागावत असते, त्याने खंबीरपणे उभं राहावं म्हणून, पण हाही भिडस्तच राहतो माझ्यासारखा. फार भीती वाटते हो. जग काय चांगलं आहे का बाहेर? आपल्या स्वभावामुळे, बालपण खूप अस्थिर अवस्थेत घालवलेल्या या आईला जेव्हा आपलेच रूप मुलाच्या वागण्यातून दिसत होते तेव्हा तिचे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. तिची भावना कितीही प्रामाणिक असली तरी तिचे हे विचार मात्र सदोष होते. मुलाचा स्वभाव माझ्यासारखा आहे म्हणजे मला जे भोगायला लागले ते त्याच्याही वाट्याला येणार अशी तिची ठाम समजूत होती आणि त्यासाठी ती त्याचे नैसर्गिक स्वभावगुणच दूर सारू पाहत होती. तिला स्वतःबद्दल वाटणारी नावड मुलाकडे संक्रमित करत होती, पण समस्येचे निराकरण वेगळेच होते. या मुलाला त्याच्या स्वभावाची बलस्थाने लक्षात घेऊन, व्यक्त व्हायला शिकवणे गरजेचे होते. मूल जन्माला आले की, डोळे अगदी आईचे घेतलेत, कपाळाची ठेवण बाबासारखी आहे. असे कौतुकमिश्रित उद्‍गार अनेक पाहुण्यांकडून ऐकायला मिळतात. मुलांच्या अशा निसर्गदत्त देणग्या आई-बाबाला व कुटुंबियांना सुखावणार्‍या असतात. पण, आमच्या घरात सगळे पिढीजात तापट आहेत. याचे रागरंगही त्याच वळणावर जाणार असं दिसतंय. असे तीन महिन्यांच्या इवल्याशा बाळाबद्दल ओढलेले ताशेरे मात्र अगदीच अनावश्यक आणि बिनबुडाचे असतात. पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, आपली मुले ही आपलेच ‘एक्स्टेन्शन’ नसून, स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांचा स्वतंत्र स्वीकार झाला तरच ती समर्थ होऊ शकतील. आपल्या मुलांचे जन्मजात गुण जाणून, स्वीकारून ते हाताळण्याचे व त्यातील योग्य गुण फुलवण्याचे काम पालक, इतर कुटुंबीय व भोवतालचा समाज चांगल्या प्रकारे करू शकतो हा विश्वास महत्त्वाचा.

- गुंजन कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@