नात्यांचं सौंदर्यही जपायला पाहिजे ना ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |
तामिळनाडूच्या राज्यपालांनी एका महिला पत्रकाराच्या गालावर प्रेमाने चापट मारण्याचे, काही लोकांनी पद्धतशीरपणे उभे केलेले ‘प्रकरण’ सध्या नको तेवढे गाजते आहे. नव्हे, ते गाजविण्याची व्यवस्था तितक्याच व्यवस्थितपणे केली जाते आहे. आपल्या देशात राष्ट्रपती, राज्यपाल ही पदं आणि त्या पदावरील व्यक्तींना आम्ही इतक्या वर नेऊन बसवलं आहे, की त्या पदावरील व्यक्तींनी जरासेही परिघाबाहेर येऊन वागलेले इथल्या जनतेलाच सहन होत नाही. त्यांनी राजासारखंच वागलं पाहिजे अन् उर्वरित जनतेने दरबारी अदब ध्यानात ठेवून आपल्या वर्तणुकीची रीत निर्धारित करावी, हेच सर्वांना अपेक्षित आहे. बहुधा म्हणूनच कुठल्याशा देशात तिथले पंतप्रधान सार्वजनिक ठिकाणी सायकलने फिरतात म्हटल्यावर आश्चर्याने बोटे तोंडात जातात आमची. पूर्णपणे इंग्रजांकडून उधार घेतलेली ही राजेशाही रीत मोडून एका राज्यपालांनी पत्रकारांच्या घोळक्यात सहभागी होणे, कुणाशी हात मिळवणे हेदेखील ‘दरबारी’ पद्धतीवर पूर्ण विश्वास असलेल्यांसाठी अप्रूपच! त्यात बनवारीलाल पुरोहित यांनी तर एका महिला पत्रकाराच्या गालावर चापट मारलेली... पत्रकारिता आणि समाजमनाचे भान हरपलेल्या माध्यमजगताने याची ‘ब्रेिंकग न्यूज’ केली नसती तरच नवल! ज्यांना बलात्काराच्या घटनेतील पीडितेची माहिती उघड करायची नसते, ही पत्रकारितेतील प्राथमिक नीतितत्त्वे पाळण्याचीही गरज वाटत नाही, बिनदिक्कतपणे त्या पोरीचा फोटो जगजाहीर करून ते मोकळे होतात, त्या भान सुटलेल्या माध्यमांनी, तामिळनाडूच्या राजभवनातील या वृत्ताचे रसभरीत वर्णन असलेल्या बातम्या प्रसृत केल्या नसत्या तरच त्यांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उभे झाले असते! पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. या घटनेच्या ‘बातम्या’ झाल्याच. कथित बड्या मंडळींच्या सहभागातून तद्दन फालतू स्तरावरच्या तकलादू चर्चाही या विषयावरून रंगल्या. सध्या केंद्रात सरकार भाजपाचे. बहुतांश राज्यपालही त्याच राजकीय पक्षाचे. शिवाय लोकसभा निवडणुकीचा मुहूर्तही एव्हाना नजरेच्या टप्प्यात आलेला. अशात, त्या पक्षाच्या वाइटावर टपलेली जमात भाजपाच्या बदनामीचे मुद्दे शोधतच फिरताहे. त्यामुळे चेन्नईच्या राजभवनात ही घटना घडताच जणू घबाड हाती लागल्याच्या थाटात अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. इथे तर ‘सबसे तेज’ दौडण्याची शर्यत लागली आहे. त्यामुळे, असे करणे योग्य की अयोग्य, ते पत्रकारितेच्या नीतितत्त्वात बसते की नाही वगैरे बाबींवर विचार करायला फुरसत होईलच कशी कुणाला? मग काय, सुरू झाला िंधगाणा. राज्यपालांनी त्या मुलीच्या गालावर थापटा मारण्याचा तो प्रसंग ‘फोकस’ करून करून, िंभगाने मोठा करून करून दाखवताना जणू ‘वॉटरगेट’ प्रकरण उघडकीस आणल्याचा आनंद होत असावा संबंधित माध्यमांना! ऊर अभिमानाने भरून येत असावा कदाचित त्यांचा अशा बातम्या प्रसृत करण्याची ‘कर्तबगारी’ पार पाडताना.
हे खरेच की, राज्यपाल हे वैधानिक पद आहे. आपण लोकशाही स्वीकारली असली, तरी वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीतून राजेशाहीचा जो प्रभाव आपल्या डोक्यात आणि मनातही भिनला आहे, त्यातून राज्यपालांनी ‘राजा’च्या मर्यादित चौकटीत जगणे-वागणे आपल्याला अपेक्षित असते. तामिळनाडूच्या राज्यपालांनी परवा ती चौकट मोडली. आपले पद विसरून ते पत्रकारांच्या जवळ गेले. एका पत्रकाराच्या गालावर त्यांनी अगदी सहजतेने चापट मारली. कदाचित ते राज्यपालाच्या पदावर नसते अन् कुठल्याशा कौटुंबिक कार्यक्रमात हा प्रसंग घडला असता तर कुणी त्याकडे लक्षही दिले नसते. पण, पुरोहित ठरले राज्यपाल. त्यातही राजकीय पक्ष म्हणून भाजपाचा स्वीकार करून आधीच त्यांनी घोडचूक केलेली! त्यामुळे त्यांच्या त्या वागण्यातून चुकीचे अर्थ काढणे हा त्यांच्या राजकीय विरोधकांचा आणि एकूणच माध्यमजगताचा ‘नैतिक’ अधिकार ठरतो! गेले तीन दिवस त्या अधिकाराचाच दुरुपयोग करून यथेच्छ धुमाकूळ घातला जातोय् सर्वदूर. पुरोहितांकडून ‘तसे’ वागणे अपेक्षित नसलेल्या तमाम जनांनी चालवलेल्या चर्चेचा दर्जा बघितला, तरी हे प्रकरण ओढूनताणून मोठे करण्याची धडपड किती केविलवाणी आणि ती किती खालच्या पातळीवर उतरून चालली आहे, हे ध्यानात येते.
तिच्या आजोबाच्या वयाचे असलेल्या राज्यपालांनी त्याच नात्याच्या हक्कानेदेखील त्या महिला पत्रकाराच्या गालावर चापट मारायला नको होती, त्यांनी तसं करणं आवश्यक तर नव्हतंच नव्हतं, हे मान्य केलं तरी संपूर्ण सामाजाच्या त्यानंतरच्या एकूणच वागण्यातून जो थयथयाट अनुभवास येतोय्, त्याचंतरी समर्थन कसं करायचं? विशेषत: नागपूर, विदर्भातले लोक, ज्यांना बनवारीलाल जवळून माहीत आहेत, राजकारण आणि समाजकारणातले पुरोहित ज्यांनी वर्षानुवर्षे अनुभवले आहेत, खाजगी दूरचित्रवाणीच्या ‘धंद्यातील’ हुशार लोकांनी जाणीवपूर्वक वारंवार दाखवलेले ते दृश्य बघूनही त्यांचा पुरोहितांवरचा विश्वास तसूभरही ढळत नाही. पण, तरीही त्या महिला पत्रकाराच्या भावनांचाही आदर केलाच पाहिजे. आजोबांनी, त्या नात्याच्या ओघाने लाभलेल्या हक्कातून या रीतीने प्रेम व्यक्त करणे तिला आवडले नसेल, तर तिचा तो नकाराधिकारही मान्य केला पाहिजे. पण, ज्या तर्हेने ती या घटनेबाबतच्या संतापाचे सार्वजनिक रीत्या प्रदर्शन मांडतेय्, नंतर आपण चार वेळा आपला चेहरा धुतल्याचे सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतेय्, तो मात्र सरळसरळ अतिरेक आहे. दुर्दैवाने ‘पश्चातबुद्धी’ आणि राजकारणाचाही गंध त्यातून झळकतो.
राज्यपालांनी ‘तसे’ केले नसते तरी चालले असते हे खरेच. अगदीच सहजपणे, वडीलकीच्या हक्काने त्यांनी ते केले, हे मान्य करूनही त्याचे समर्थन कुणीच करीत नाहीय्. त्यांनी स्वत:देखील झाल्या प्रकरणी अगदी क्षणात माफी मागून वाद मिटविण्याची भूमिका घेतली आहे. सार्या जगाला माहीत व्हावे म्हणून माध्यमजगताने गेल्या दोन दिवसांत नको तितक्यांदा दाखवली, ती क्लिप बघितल्यानंतर पुरोहितांचा हेतू वाईट नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यातून वासनेचा दर्प काही स्वयंघोषित शहाण्यांना जाणवत असेलही, पण सर्वसामान्यजनांना तरी तसे मुळीच जाणवत नाही आणि तरीही या प्रकरणावरची चर्चा नेमकी ‘त्याच’ वळणावर नेऊन सोडण्याचा जो संतापजनक प्रकार काही लोक मोठ्या शिताफीनं करताहेत, तो तरी कुठे समर्थनीय ठरतो?
राज्यपालांनी माफी मागितल्यानंतरही हे प्रकरण तापवत ठेवून त्याआडून राजकारणाचे डाव खेळण्याचे काही लोकांचे छुपे षडयंत्र तर काही केल्या लपून राहू शकलेले नाही. पण, काही स्वनामधन्य लोक विविध वाहिन्यांवरील चर्चेतून जे अकलेचे तारे तोडताना दिसताहेत, तो सारा प्रकार कीव करण्याच्याच लायकीचा आहे.
खरंच, माणसं इतकी कोत्या मनाची झाली आहेत आताशा? स्त्री-पुरुषांमधील संबंधांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन इतका दर्जाहीन झाला आहे? या दोन घटकांमधली सेक्सच्या चौकटीपलीकडची नाती, भावनेची गुंतागुंत नजरेत येत नाहीच कुणाच्या इथे? की, नर आणि मादीच्या पलीकडेही स्त्री-पुरुषांमधली नाती आकार घेऊ शकतात, हे वास्तव स्वीकारण्याची मानसिकताही हरवून बसलो आहोत आपण सारेच? चार वर्षांच्याच कशाला, अगदी तान्हुल्या बाळालाही वासनेची शिकार बनविणार्या राक्षसी वृत्तीचा, रस्त्याने जाता-येतानाही मुलींकडे वखवखलेल्या नजरेने बघणार्या गर्दीच्या बेताल वागण्याचाही परिणाम असेल तो कदाचित, पण म्हणून स्त्री-पुरुषांमधली निरागस, निखळ नात्यांची कल्पनाही इथल्या जनसमुदायाला मानवणार नसेल, तर संपलंच सारं! परवा चेन्नईच्या राजभवनात जे घडलं त्याचे करायचे त्यांनी जरूर राजकारण करावे. ‘त्या’ मुलीलाही घडल्या प्रकरणाचे निमित्त करून जे साधायचेय् ते तिने जरूर साधावे. पण, म्हणून उर्वरित जनसमुदायानेही स्त्री-पुरुषांमधील इतर सार्या नात्यांची वीण कल्पनातीत ठरवून केवळ एका मार्यादेत ते नाते बंदिस्त करण्याचा प्रयत्न करावा, हे मात्र अयोग्यच. आधीच आधुनिकतेच्या नावाखाली ‘लिव्ह इन रीलेशनशिप’पासून तर समलैंगिक संबंधांपर्यंतच्या कित्येक बाबी सहजपणे स्वीकारून बसलेल्या सामाजाची घडी अधिक विसकटू द्यायची नसेल, तर स्त्री-पुरुषांमधील काही निरागस, निरलस नात्यांचं सौंदर्य जपायलाही शिकलं पाहिजे ना आपण...?
@@AUTHORINFO_V1@@