रंगराजन्‌ यांची मुनी वाहन सेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
हिंदू समाज भेदभावरहित व्हावा, या समाजातील सर्व घटक गुण्यागोविंदाने, परस्परांशी आत्मीयतेने राहावेत, वाईट चालीरीती, कुप्रथा यांचे निर्मूलन होऊन हा समाज पुन्हा एकदा स्वाभाविक समरसतेने तळपून उठावा, अशी कळकळ आणि प्रामाणिक इच्छा असणार्‍यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. परंतु, ज्यांना या समाजाचे तुकडे-तुकडे व्हावेत, या समाजातील प्रत्येक घटक परस्परांशी सतत संघर्ष करीत राहावा, अशी ज्यांची सतत मनापासून धडपड सुरू असते, त्यांना मात्र ही बातमी आवडणार नाही.
हैदराबादच्या प्रसिद्ध चिल्कुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी सी. एस. रंगराजन्‌ यांनी, नादस्वरम्‌, मृदंगम्‌ व वेदमंत्रांच्या घोषात, जुआगुडा येथील रहिवासी आदित्य पराश्री यांना आपल्या स्वत:च्या खांद्यावर बसवून रंगनाथस्वामी मंदिराची प्रदक्षिणा घातली व त्यांना गर्भगृहात घेऊन आले. आदित्य यांना पगडी घातली आणि गळ्यात फुलांचा हार घातला गेला होता. देवीचे निस्सीम भक्त असलेले आदित्य पराश्री हे दलित समाजाचे आहेत, हे विशेष! ही घटना सोमवार म्हणजे 16 एप्रिलची आहे.
हे आगळेवेगळे आणि क्रांतिकारी दृश्य बघण्यासाठी मंदिराच्या बाहेर प्रचंड गर्दी जमा झाली होती. या सर्वांनीच रंगराजन्‌ यांच्या या अभूतपूर्व कृतीचे मनापासून स्वागत केले. हे धाडसी पाऊल उचलणार्‍या रंगराजन्‌ यांनी सांगितले की, सर्वांना समानतेने वागविणार्‍या सनातन धर्माला पुन:प्रतिष्ठापित करण्यासाठी मी ही ‘मुनी वाहन’ सेवा करण्याचा निर्णय घेतला. मला कृतीतून समानतेचा संदेश सर्वांना द्यायचा होता. सर्व मानव समान आहेत, असा संदेश देणार्‍या प्रसिद्ध वैष्णव रामानुजाचार्य यांची यंदा एक हजारावी जयंती आहे. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. त्यामुळे आम्ही एखाद्या उत्सवाप्रमाणे आदित्य यांचा वाजतगाजत मंदिरप्रवेश केला. 2700 वर्षांपूर्वीच्या एका घटनेची ही पुनरुक्ती आहे, असेही रंगराजन्‌ यांनी सांगितले.
 
ब्रह्मचारी व देवीचे भक्त असलेले आदित्य यावेळी अत्यंत भारावले होते. ते म्हणाले की, असे हे अभूतपूर्व उत्सवी स्वागत, मी माझा सन्मान समजतो. या देशाला तोडणार्‍या अस्पृश्यतेसारख्या दुष्ट सामाजिक कुप्रथेला नष्ट करण्याची सुरवात या घटनेने झाली आहे.
आदित्य म्हणाले- दलित असल्यामुळे आमच्या कुटुंबाला समाजात सन्मान नव्हता. माझे मूळ गाव मेहबूबनगर येथील हनुमानमंदिरात आम्हाला दलित म्हणून प्रवेश नाकारण्यात येत असे. ही कुप्रथा आजही अनेक मंदिरात अजूनही सुरू आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांना आपल्या संविधानाने संरक्षण दिले असतानाही त्यांच्याशी हीनतेचा व्यवहार करण्यात येत आहे, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. आजची ही घटना सकारात्मक बदलाचा शुभारंभ ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
वैष्णवांमधील मुनी वाहन सेवा ही श्री रंगनाथ देवतेशीच जुळली आहे. तिरुपन्ना नामक एक दलित, रंगनाथ यांचा भक्त होता. तरीही त्याला एका पुजार्‍याने भेदभावाची वागणूक देत, मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. मंदिराचे दार आतून बंद करून घेतले. तेवढ्यात खुद्द रंगनाथ स्वामी यांचा आवाज मंदिरात घुमला. पुजार्‍याच्या या कृत्यामुळे स्वत: भगवान अत्यंत नाराज झाले आहेत. जोपर्यंत तो पुजारी त्या तिरुपन्ना नामक भक्ताला खांद्यावर बसवून मंदिराच्या प्रदक्षिणा मारणार नाही, तोपर्यंत त्या पुजार्‍यासाठी मंदिराची दारे बंद राहतील. आजही अनेक वैष्णव तिरुपन्ना यांची ‘मुनी वाहन’ म्हणून पूजा करतात. कारण, ज्या पुजार्‍याने तिरुपन्ना यांना खांद्यावर बसवून प्रदक्षिणा घातली त्याचे नाव मुनी होते. मुनी हे तिरुपन्ना यांचे वाहन बनले. म्हणून याला ‘मुनी वाहन’ असे नाव पडले. बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी रंगराजन्‌, ज्यांनी सोमवारी ही मुनी वाहन सेवा केली, सांगतात की, तिरुपन्ना यांची घटना 2700 वर्षे पूर्वीची होती आणि सनातन धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी मी ही प्राचीन परंपरा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 
तेलंगणा राज्यातील मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याची जी चळवळ सुरू आहे, त्या तेलंगणा मंदिर-संरक्षण समितीचे रंगराजन्‌ अध्यक्षही आहेत.
किती विलक्षण दृश्य असेल ते, नाही! बातमी वाचतानाच डोळे पाणावले. रंगराजन्‌ यांनी समस्त हिंदू समाजाच्या वतीने घेतलेले हे एक प्रकारे प्रायश्चित्तच आहे. असे गावागावांत, वस्तीवस्तीत झाले पाहिजे. कायद्याने समानता आली; पण मनाने? आजही उच्चवर्णीयांच्या मनात दलितांबद्दल अढी आहे. ती अढी कायदा काढू शकत नाही. समरसतेचा भाव प्रखर झाला तरच ती अढी निघेल. रा. स्व. संघाला ही समरसता अपेक्षित आहे. त्यासाठी या संघटनेची स्थापनेपासून धडपड सुरू आहे. परंतु, अजूनही हिंदू समाजाचा फार मोठा भाग या समरसतेच्या संस्कारापासून दूर आहे. ज्यांना हा समाज, हा देश तुकड्या तुकड्यात विभागावा असे वाटते, ते या समरसतेच्या संकल्पनेला विरोध करतात. त्यांना फक्त कायद्याने प्रस्थापित होणारी समताच हवी आहे. कारण त्यात समता न पाळणार्‍याला कायद्याने शिक्षा होणे, त्यांना अभिप्रेत आहे. यात सूड घेतल्याचे समाधान आहे. समरसतेत सूडाचे समाधान नाही. तिथे प्रायश्चित्त आहे. त्यामुळेच या लोकांना समरसता नकोशी आहे.
 
थोर विचारवंत, ऋषितुल्य दत्तोपंत ठेंगडी त्यांच्या ‘सामाजिक समरसता’ या पुस्तिकेत लिहितात- 20 जुलै 1924 या दिवशी बहिष्कृत हितकारिणी सभेची मुंबई येथे स्थापना करताना पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष या नात्याने श्री. चिमणलाल सेटलवाड, रँगलर परांजपे, श्री. बाबासाहेब खेर आदी तथाकथित उच्चवर्णीयांना ठेवले होते. त्यासंबंधी पू. बाबासाहेबांनी असे स्पष्टीकरण दिले होते की, ‘‘ज्या वर्गाच्या सुधारणेसाठी संस्था स्थापन करावयाच्या त्या वर्गाचे किंवा तशाच परिस्थितीने गांजलेल्या लोकांचे कार्यकर्ते संस्थेत असल्याखेरीज संस्थेचे ध्येय व हेतू फलित होणे शक्य नाही. हे मान्य असले तरी ज्यांनी ही संस्था स्थापन केली आहे, त्यांना हे पक्के माहीत आहे की, वरिष्ठ वर्गातील सधन आणि सहानुभूती असलेल्या लोकांचे साह्य असल्याखेरीज अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीच्या अवाढव्य कार्यक्रमाची सिद्धी होणे केव्हाही शक्य नाही. तसे केले नाही तर स्वजनोद्धाराच्या महान कार्याचे आपण नुकसान केल्यासारखे होईल.’’ हीच बाबासाहेबांची मूळ भूमिका होती. परंतु स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणार्‍या काही दुराग्रही लोकांच्या हठधर्मामुळे त्यांना पुढे दुसरी भूमिका घ्यावी लागली.
 
 
दत्तोपंत म्हणतात- पूज्य डॉक्टरांची विशेषता समरसता, पू. बाबासाहेबांची विशेषता समता, ही दोघांनाही पाहिजेच आहे. पण, समता ही समरसतेशिवाय राहू शकत नाही. मनुष्याची जी सायकॉलॉजी आहे, त्यामध्ये जर संपूर्ण समाजाविषयी समरसता नसेल तर समरसतेच्या अभावी विषमता निर्माण होणे हे अपरिहार्य आहे. संपूर्ण समाजाविषयी समरसता नसेल तर बुद्धिमान लोकांनी निर्बुद्धांचे, बलवान लोकांनी निर्बलांचे, धनिक लोकांनी निर्धनांचे शोषण का करू नये, याला काही समर्थन-जस्टिफिकेशन नाही. तेव्हा इतरांचे शोषण करण्याची माझी क्षमता असतानासुद्धा मी शोषण न करता, माझ्या कर्तृत्वाचा उपयोग इतरांच्या हिताकरिता करतो आहे, हे केवळ समरसतेमुळेच उत्पन्न होऊ शकते. तेव्हा खरी हमी, खरी गॅरंटी, जर कोणती असेल तर समरसता, कौटुंबिक भावना, संपूर्ण समाज एक कुटुंब आहे ही भावना. अशा प्रकारे संपूर्ण समाजाविषयी समरसता असेल तर त्यातून मग समता ही स्वाभाविकपणे उत्पन्न होऊ शकते. तेव्हा विषमता सोडून समता व्हायला पाहिजे, ही गोष्ट खरीच आहे. परंतु, समता हे अंतिम टर्मिनस असू शकत नाही. हे एक मधले स्टेशन आहे. जर शेवटचे टर्मिनस समरसता नसेल, समतेपाशीच जर आमची गाडी थांबली तर समता टिकणे हे अशक्यच आहे. पूज्य बाबासाहेबांच्या एकूणच चिंतनात हाच भाव प्रकट होत आहे. दत्तोपंतांच्या या प्रतिपादनाशी जर आपण सहमत असू तर आमचे तसे आचरण आहे का, याचाही उच्चवर्णीयांनी विचार केला पाहिजे. हैदराबाद येथील ‘मुनी वाहन सेवा’ घटनेचा, मला वाटते हाच बोध आहे.
@@AUTHORINFO_V1@@