पाऊस, पिके साधारण पृथ्वीवर संकट नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |

 
 

 
 
 
 
 
 
भेंडवळची भविष्यवाणी
* राजा कायम
* आर्थिक परिस्थिती चांगली
* कोणताही मोठा प्रकोप नाही



राजेंद्र गांधी
 
जळगाव जामोद, 
 
संपूर्ण विदर्भातील शेतकर्‍यांमध्ये मान्यताप्राप्त अशी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील भविष्यवाणी गुरुवार, 19 एप्रिल रोजी पहाटे 6.15 वाजता सुमारे तीनशे वर्षांपूर्वी निळावंती विद्याप्राप्त (पक्ष्यांची भाषा) चंदभान महाराजांचे वंशज रामदास महाराज वाघ यांनी घोषित केली.
यात प्रामुख्याने देशाचा राजा कायम, सर्वसाधारण पाऊस, देशाची आर्थिक व संरक्षण व्यवस्था मजबूत व पिके ठिकठिकाणच्या पर्जन्यमानानुसार थोडी कमी-जास्त येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्यामुळे सर्वांना समाधानकारक असे येणारे वर्ष राहणार आहे.
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी येथील बसस्टँडसमोरील शेतामध्ये घटमांडणी करण्यात येऊन दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवार, 19 एप्रिल रोजी पहाटे 6.15 वाजता मांडणी केलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याचे बारीक निरीक्षण करून वेगवेगळ्या विषयीचे अंदाज व्यक्त केले जातात.
 
 
 
यात मुख्यत्वेकरून अंबाडी (कुलदैवताचे प्रतीक) मोघम म्हणजे कोणतेही फेरबदल नाही, अशा स्थितीत आढळून आले. याचा अर्थ नुकसान, रोगराई, अरिष्ट कमीच राहणार आहे. सरकी-कापूस हे पीक साधारण येईल. ज्वारी व मूग सर्वसाधारण येऊन किंचित तेजी राहील. तूर, उडीद, तीळ आदी खरिपातील पिके सर्वसाधारण राहतील. भादली (रोगराईचे प्रतीक) मोघम असल्यामुळे पिकांवर तसेच सर्व जिवांवर रोगराई कमी राहील. मठ, बाजरी, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा आदी रब्बीची पिके सुद्धा सर्वसाधारण राहतील.
करडी (संरक्षण व्यवस्था) मजबूत राहून, मसूर (परकीय शक्ती) मोघम असल्यामुळे घुसखोरी कमी राहून शांतता नांदण्याचे संकेत आहेत. देशावर दुष्काळी परिस्थिती ओढवणार नाही.
पावसाळा जून महिन्यात सर्वसाधारण, जुलैमध्ये चांगला, ऑगस्टमध्ये चांगला (उत्तरार्धात जास्त पाऊस), सप्टेंबर महिन्यात साधारण राहील. अवकाळी पाऊससुद्धा भरपूर राहणार असल्याचे भाकीत आहे.
 
 
पानविडा (सिंहासन) कायम असून, थोडीशी माती पडलेली असल्यामुळे कारभारात तणाव राहील. पैसा (सिंहासन) सुद्धा कायम आहे. सुपारी (राजा) कायम असून, मजबूत आहे.
याच घटमांडणीप्रमाणे येथील मारोती पारावर गुढीपाडव्याच्या दिवशीपासून तर रामनवमीपर्यंत घटमांडणी असते. पण, ती मातीच्या मोठ्या भांड्याने झाकून ठेवली जाते व रामनवमीच्या दिवशी उघडून त्याचे अवलोकन केले जाते. त्यात सुद्धा राजा कायम तथा सर्वत्र सारखी पिके येतील. यात म्हैस, गाढव, गांडूळ हे पाऊसमानाचे द्योतक असल्याचे आढळून आल्यामुळे सार्वत्रिक पर्जन्यमानाचे द्योतक आहे. त्याचबरोबर मुंग्या आढळून आल्या. यावरून खाणारे आहेत. म्हणजेच पिकल्याशिवाय खायला मिळत नसते. यावरून समाधानकारक पिके राहतील.
 
 
 
घटातील पुरी (पृथ्वी) कायम असून, कोणतेही मोठे अरिष्ट ओढवणार नाही. करंजी (कानोला) खजिना कायम असल्यामुळे देशास व नागरिकांनासुद्धा आर्थिक चणचण (गेल्या वर्षीसारखी) राहणार नाही. वडा, भजा, पापड, सांडोई, कुरडई आदी सर्व वस्तू करव्यावर कायम जशाच्या तशाच आढळून आल्यामुळे जनावरांचे चारा-पाणी भरपूर राहील. परंतु, थोडा नाश (खराबी) संभवत आहे. करवासुद्धा अर्धाअधिक भरलेला आहे. त्यामुळे समुद्रात, भूगर्भात पाण्याची पातळी साधारणच राहणार आहे.
भेंडवड येथील बसस्टँडजवळील एका शेतामध्ये 20 फूट त्रिज्येचे गोलाकार खळे करून त्याच्या मध्यभागी दीड बाय दीड फुटाचा खड्डा खोदून त्यातच निघालेल्या चार ढेकळांवर नवाकोरा करवा (घागर) पाण्याने भरून ठेवतात. त्याच्या बाजूलाच विड्याच्या पानावर एक रुपयाचे कलदार नाणे ठेवून त्यावर सुपारी ठेवली जाते व या करव्यावर पुरी, पापड, सांडोई, कुरडई, करंजी, वडा, भजा आदी वस्तू ठेवतात.
 
 
 
या खड्डापासून सुमारे 4 फूट अंतरावर उपरोल्लेखित 18 प्रकारच्या धान्यांचा मूठ-मूठ भरून राशी ठेवल्या जातात व पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर वाघ आपल्या सर्व अनुयायांसोबत येऊन बारीक निरीक्षण करून भविष्य वर्तवितात.
खड्ड्यामधील चार ढेकळे ज्यावर पाण्याने भरलेली घागर असते हे प्रत्येक ढेकूळ म्हणजे पावसाचे चार महिने असून, डावीकडून पहिले म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर अशाप्रमाणे त्याचे भिजण्याचे प्रमाण पाहून पाऊस कमी-जास्त असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
सुमारे 350 वर्षांपासून येथील भविष्यवाणीवर विदर्भ, खानदेशामधील शेतकर्‍यांची श्रद्धा आहे व याचे अंदाज जवळपास 80 टक्के खरे ठरण्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळेच याच भविष्यवाणीनुसार आपल्या पिकांचे नियोजन शेतकरी करत असतात. आजही हजारो शेतकरी, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@