...तरीसुद्धा हे सुधारणार नाहीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे लोया प्रकरणात निर्माण झालेल्या प्रकरणावर आता पडदा पडेल, अशी आशा कुणीही मुळीच बाळगू नये. कारण, गांधीहत्येचे ताबूत नाचवूनच ज्यांच्या हयाती टिकल्या त्यांना आता लोयांच्या मृत्यूचा नवा ताबूत सापडला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत असे अनेक ताबूत नाचविले जातील, यात शंका नाही.
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूबाबत तो नैसर्गिक असल्याचा निर्वाळा यापूर्वीच निरनिराळ्या तपास यंत्रणांनी दिला होता. तपास यंत्रणाच नव्हे, तर खुद्द त्यांच्या मुलानेही आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते. मात्र, मढ्याच्या टाळूवरचे लोणी खरवडून खाणार्‍यांची एक जमात आपल्याकडे पहिल्यापासून आहे. आपल्या गलिच्छ कारस्थानासाठी ही मंडळी वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात. लोयांच्या मृत्यूनंतर ही टोळी अधिकच सक्रिय झाली आणि लोयांच्या मृत्यूचे खापर अमित शाह यांच्या माथी फोडून मोकळी झाली. सावरकरांच्या निमित्ताने गाजलेले पत्रकार निरंजन टकले यांनी यापूर्वीच आपले नाव वाजवून घेतले होते. ’कारवान’ नावाच्या साप्ताहिकात लोया मृत्यूप्रकरणी त्यांनी ‘कथा’ लिहून सुरुवात केली. पत्रकारितेच्या भाषेत लेखांना ‘स्टोरी’ म्हणतात. टकलेंनीही ‘स्टोरी’च लिहिली होती. मात्र, ही ‘स्टोरी’ इतकी बेमालूमपणे लिहिली होती की, ती अनेकांना खरीच वाटायला लागली होती. खरं तर ‘कारवान’ ही अत्यंत इमानी, चपळ आणि बुद्धिमान कुत्र्याची जात. कुणाच्याही मागे लागण्याचा त्यांचा खाक्या नाही. इथे मात्र सगळे उलटेच. खर्‍याखोट्याची शहानिशा न करताच आपल्याकडच्या अनेकांना या ‘स्टोरी’त आपल्याला हवा तसा मालमसाला मिळाला. मग देशभरात यानिमित्त अमित शाहंविरोधात मळभ निर्माण करण्याचा एककलमी कार्यक्रमराबविण्यात आला. आज न्यायालयाने या विषयावर परखड भूमिका घेतल्याने तारतम्य बाळगणार्‍या मंडळींसमोरचे मळभ दूर झाले असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे या कांगावखोरांच्या बाबतीत कोणताही बदल घडण्याची सुतरामशक्यता नाही. मोदी सरकार व अमित शाह यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसताना केवळ आणि केवळ अमित शाह यांच्या बदनामीच्या हेतूनेच हे प्रकरण राबविले गेले होते. निरंजन टकलेंचा लेख म्हणजे अनेक बुडत्या फुरोगाम्यांना आधार वाटला होता. तहसीन पूनावाला, पत्रकार बीएस लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशन व अन्य काही रिकामटेकड्या लोकांनी सर्वोच्च न्यायलयात याविषयी खटला दाखल केला होता. वृत्तपत्रातील लेख संदर्भासाठी ठीक असतो, मात्र लेखाला न्यायालयात सबळ पुरावा म्हणून मान्यता मिळत नाही. याची या वकील मंडळींना कल्पना नव्हती, असे मुळीच नाही. मात्र, मोदीद्वेषाचा कंडू इतका कडक आहे की, काही केल्या तो शमत नाही. स्वत:ला ‘कायदेभूषण’ म्हणविणार्‍या प्रशांत भूषण यांनी हा दिवस न्यायव्यवस्थेसाठी ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले आहे. जनहितार्थ याचिका फेटाळताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने जे म्हटले ते यापैकी कुणालाही ऐकून घ्यायचे नाही. आपण म्हणतो ते आणि तेच सत्य आहे, असा हा प्रकार. न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू म्हणजे देशातील न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा कांगावा या मंडळींनी केला होता. कोळसे पाटलांसारख्या नादान आणि जातीयवादी माणसाने तर खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावरच आक्षेप नोंदविला आहे. कोळसे पाटलांना सगळ्याच विषयात काही काही कारस्थाने दिसत असतात. आता त्यांना यातही कारस्थान दिसते. मुळात माणूस जसा असतो तसेच त्याला जग भासते. निरनिराळ्या कॉंग्रेसी कारस्थानांची पात्रे असलेल्या या मंडळींना खरेतर आता काही कामनाही. लोकशाहीतला त्यांचा हक्क मानला तरीही या मंडळींचे उद्योग इतके एकांगी आहेत की, यांच्या सत्यतेबाबतही प्रश्न उपस्थित व्हावेत. लोयांना १०० कोटी रुपये लाच व एक फ्लॅट देण्यात आला होता, असा आरोप कॉंग्रेसच्या सूरजेवाला यांनी केला आहे.
 
कॉंग्रेसचे सरकार असताना या देशातले कितीतरी प्रमुख नेते संशयास्पदरित्या मृत्युमुखी पडले होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी ही त्यातली प्रमुख नावे. पण, आज पोपटपंची करणार्‍या कुणालाही या मंडळींच्या संशयास्पद मृत्यूविषयी कुठल्याही चौकशीची मागणी करावी, असे वाटले नाही. त्यासाठी कुणी कंठशोष केला नाही की, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले नाही. आज जे काही सुरू आहे ते आपल्या देशातल्या बेगडी विचारवंतांचे टिनपाट उद्योग म्हणावे असेच आहेत. खुद्द लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूवर पडदा टाकण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयावर कॉंग्रेस असंतुष्ट असल्याची प्रतिक्रिया सूरजेवालांनी दिली आहे. निरंजन टकले वगैरेंची वृत्ती आणि कॉंग्रेसची आजची प्रतिक्रिया यात फारसा फरक नाही. आपण सांगतोय हे सत्य नसले तरी त्याचा कांगावा मात्र जोरात करीत राहायचा, ही या मंडळींची कामाची पद्धत. कॉंग्रेस कुठल्या प्रकारच्या निर्णयांवर संतुष्ट होते किंवा असंतुष्ट होते, यावर कुणाचे काहीही अवलंबून नाही. सूरजेवालांना अद्याप हे सत्य पचलेले नसावे. धड विरोधी पक्षातही नसलेला हा पक्ष जेव्हा अशा गोष्टी मांडायला लागतो, तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. या सगळ्या प्रकारातला ताजा कलमचक्क महाराष्ट्रातून आहे. महाराष्ट्रात आपल्या चमच्यामुळे ‘विचारवंत’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुमार केतकरांनी खाल्ल्या मिठाला आता उघड उघड जागायला सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता मुळात लोकांच्या मनात जे नाहीच ते चालविण्याचे उद्योग ही मंडळी करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे लोया प्रकारणात निर्माण झालेल्या प्रकरणावर आता पडदा पडेल, अशी आशा कुणीही मुळीच बाळगू नये. कारण, गांधीहत्येचे ताबूत नाचवूनच ज्यांच्या हयाती टिकल्या, त्यांना आता लोयांच्या मृत्यूचा नवा ताबूत सापडला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत असे अनेक ताबूत नाचविले जातील, यात शंका नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@