न्यायासाठी नव्हे तर राजकीय स्वार्थासाठीचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018   
Total Views |

कठुआ प्रकरणाने शिकवलेला धडा ... भाग १

 
 
 
 
एखाद्या निष्पाप मुलीच्या मृत्यूला राजकीय स्ट्रॅटेजी बनवून वॉर रूममधल्या लोकांना कामाला लावलेले सर्व समाजाने पाहिले आहे. हत्येच्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला करण्याचे हे डावे कारस्थान भारताला नवे नाही. मात्र प्रत्येकवेळी तोंडावर पडूनही त्यांची खोड काही मोडत नाही हे विशेष.
 
 
जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात हीरानगर तालुक्यातील रासिना या गावात आठ वर्षांच्या एका लहानग्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला व तिने नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली. ज्याने बलात्काराचा प्रयत्न केला तो देखील अल्पवयीन मुलगा होता. या घटनेसंदर्भात राज्याचे महसूल व संसदीय कार्य मंत्री अब्दुल रहमान वीरी यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत याची सविस्तर माहिती देताना या अल्पवयीन मुलाने गुन्हा कबूल केल्याचे व आता परिसरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्याचे सांगितले होते. कठुआची घटना घडली १० ते १७ जानेवारी २०१८ दरम्यान. १७ जानेवारीला त्या मुलीचा मृतदेह जंगलात मिळाला व त्यानंतर पोलिस तपासाला सुरुवात झाली. जम्मू पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक देखील केली व त्यावर संबंधित न्यायालयाने पुढील आदेश दिले देखील. या प्रकरणातील संपूर्ण सत्य लवकरात लवकर बाहेर येऊन दोषींवर कठोर शासन व्हायला हवे ही देशातील सर्वांचीच इच्छा आहे.
 
 
वास्तविक देशभरातच नव्हे तर जगभरात बलात्कार व बालगुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. वाढती बालगुन्हेगारी, व्यसनाधीनता, चित्रपट व अन्य माध्यमांमधून दाखवण्यात येणारी नग्नता व लैंगिकता, पुरुषी वर्चस्ववादाची मानसिकता, कायद्याचा कमी झालेला धाक किंवा परधर्मीय स्त्रियांकडे पाहण्याचा दूषित दृष्टिकोन, सहज उपलब्ध होणारे मादक पदार्थ अशी त्याची निरनिराळी कारणे आहेत. या अत्याचारांचे विश्लेषण करताना शक्य तितक्या वेळा त्त्या त्या समाजाने व माध्यमांनी त्यात अन्य दृष्टिकोन येऊ न देता बलात्कार व गुन्हेगार यावरच भाष्य केलेले आहे. जे योग्यही आहे. क्वचित प्रसंगी ती स्त्री केवळ परधर्मातील आहे म्हणून तिच्यावर बलात्कार केला आहे अशाही घटना घडल्या आहेत. सामान्यपणे अशा प्रकारचे बलात्कार साम्यवादी, इस्लामी व ख्रिस्ती राजवटीत परधर्मीय स्त्रियांबाबत होताना अधिक दिसतात. मात्र त्याकडेही ‘उदारमतवादी व समजूतदार’ माध्यमांनी धर्माच्या व विचारांच्या पलिकडे जाऊन केवळ बलात्कार म्हणूनच आजवर पाहिले आहे. तसेच बालगुन्हेगारीकडेही धर्माच्या चष्म्यातून पाहिले गेल्याची उदाहरणे कमीच आहेत. कोणत्या देशात कोणत्या धर्माच्या बहुसंख्येमुळे बालगुन्हेगारी अधिक आहे हे माहिती असूनही त्याकडे केवळ बालगुन्हेगारी म्हणूनच पाहिले गेले आहे हे नमूद करण्यासारखे आहे.
 
 
 
जम्मूमधील कठुआ येथे मात्र वेगळा प्रकार घडला. एखाद्या निष्पाप मुलीवरील बलात्काराचा कधी नव्हे इतका बाजार माध्यमांनी मांडल्यामुळे सर्वांच्याच माना शरमेने खाली गेल्या. मृत बालिकेचा धर्म व बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या मुलाचा धर्म वेगवेगळा असल्याने त्यावरून एखाद्या धर्मालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. काही वर्षांपूर्वी दिल्लीतील निर्भया निर्घृण बलात्कारावरूनही माध्यमांनी व सामाजिक संस्थांनी आंदोलन केले पण त्या आरोपींमधील एका अल्पवयीन मुलाचा धर्म निर्भयाच्या धर्मापेक्षा वेगळा होता हे सोयिस्कररित्या दुर्लक्षिले गेले होते. कठुआ प्रकरणात अल्पवयीन मुलांमधील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, त्यावर उपाययोजना, वाढते बलात्कार याची चर्चा होण्यापेक्षा धर्माची चर्चा अधिक झाली हे दुर्दैव. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीचे प्रकरण उकरून काढले पण ते त्या मुलीला न्याय मिळावा यासाठी नसून आपली राजकीय व वैचारिक पोळी कशी भाजून घेता येईल यासाठी हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले आहे. जम्मू काश्मीरमधील एका जिल्ह्यातील एका लहान गावातील दुर्घटनेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले गेले तिथेच साऱ्या देशाला यातील सुप्त राजकीय व सामाजिक हेतू समजला. कायदा व सुव्यवस्था, पोलिस प्रशासन, सरकारी अनास्था यांना जबाबदार धरलेच पाहिजे, मग भलेही ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो. मात्र कठुआ घटनेला धार्मिक रंग देऊन त्यासाठी समस्त हिंदू धर्माला दोषी ठरवून, हिंदुत्त्ववादी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले या आपल्या भळाळत्या जखमेवर फुंकर मारण्यासाठी त्यांच्यावर आरोप करण्यात आला हे एखादे शेंबडे पोरंही सांगू शकेल.
 
 
 
कठुआ प्रकरणातील सत्य जसजसे बाहेर येत आहे तसतसे डाव्या विचारांच्या माध्यमांमधून होणारे आरोप कसे तथ्यहीन आहेत ते ही समोर येत आहे. त्या मुलीवर बलात्कार नव्हे तर बलात्काराचा प्रयत्न झाला होता, मुलीचा मृत्यू मंदिरात नव्हे तर जंगलात झाला होता, ज्या मंदिरात मुलीला लपवून ठेवल्याचा आरोप केला गेला त्या मंदिरात रोज ४०-५० जण पूजाअर्चा करण्यासाठी येत असतात, त्या मुलीच्या वडिलांचा कोणावरही आक्षेप नाही, या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये अशी त्यांची व गावकऱ्यांची इच्छा आहे ... असे एक ना अनेक खुलासे आता होत आहेत. तसेच या एकेका खुलाश्याने डावी माध्यमे व डाव्या विचारांनी प्रभावित राजकीय पक्षांचा बुरखा टराटरा फाटत आहे. जसजसे या प्रकरणाची न्यायलयीन प्रक्रिया पुढे सरकत जाईल तसतसे या प्रकरणातून ज्यांना राजकीय फायदा होणे अपेक्षित आहे त्यांचा तोटाच होत जाणार आहे हे स्पष्टच आहे. तो होऊ नये म्हणून आता नव्याने होणाऱ्या तपासात पूर्वीचे सर्व दाखले व अहवाल बदलले जातील, पंचनामा व त्यातील तपशीलात बदल केला जाईल, आपल्याला हवे तसे अहवाल येण्यासाठी पुन्हा नव्याने तपासण्या होतील हे नक्की. मात्र या संपूर्ण कठुआ हत्या प्रकरणातून एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे डाव्या माध्यमांच्या व काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या या प्रकरणातील हस्तक्षेपामुळे व तपासयंत्रणांसह संपूर्ण देशाची दिशाभूल करण्यामुळे त्या निष्पाप मुलीला न्याय मिळणार का हा तो प्रश्न. आजघडीला मात्र हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
 
 
ज्या मुलीला न्याय मिळावा म्हणून हे सगळे केले जात आहे असे सांगितले गेले आहे खंरतर तिच्याबद्दल या खोट्या आंदोलकांच्या कोणाच्याही मनात काडीमात्रही संवेदना नाहीत. कारण खरोखरच या घटनेबद्दल व त्या निष्पाप मुलीबद्दल या मेणबत्तीधारी आंदोलकांना काही वाटले असते तर त्यांनी केवळ त्या घटनेपुरते व तिला न्याय मिळण्यापुरतेच आंदोलन केले असते जसे ते निर्भया प्रकरणात केले होते. मात्र तसे न करता मूळ घटना बाजुला ठेवून, घडलेल्या घटनाक्रमापैकी केवळ आपल्याला हवा तेवढाच तपशील लोकांसमोर आणून, नसलेला धार्मिक रंग देऊन आंदोलन केले गेले. त्यातच हिंदी चित्रपटसृष्टीतील सोनम कपूर, स्वरा भास्कर, करीना कपूर यांसारख्या काही नायिकांना हाताशी धरले गेले त्यामुळे वातावरण अधिकच गढूळ झाले. अर्धवट माहिती झाल्यामुळे लोकांनाही नेमके काय करावे हे सुचले नाही व त्यांनीही डाव्या माध्यमांच्या प्रभावाखाली येत मुख्य विषय बाजूला सारून हिंदू धर्म, मंदिर, पुजारी यांनाच दोष दिला. या सर्वात ती बिचारी पीडित मुलगी मात्र बाजूलाच राहिली व त्याची कोणालाच काही चाड नव्हती आणि नाही.
 
 
 
हे सर्व सुरु झाल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांची एक मुलाखत बाहेर आली व त्यांनी चक्क हे जे सर्व सुरु आहे त्यावर तीव्र नापंसती व्यक्त केली. त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, गावकऱ्यांना व संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना कोणालाही या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यात काहीही स्वारस्य नाही. गावातील सामाजिक व धार्मिक सलोखा अद्याप शाबूत आहे. मात्र डाव्या माध्यमांच्या या आक्रस्ताळेपणामुळे व चुकीच्या वार्तांकनामुळे उर्वरित देशात मात्र दोन समाज एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. जम्मू जिल्ह्यातील, हीरानगर तालुक्यातील व रासिना गावातील सर्व हिंदू आमच्यासोबत आहेत अशी ग्वाही चक्क त्या मुलीच्या वडिलांनीच दिल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. डाव्या माध्यमांसमोर मग प्रश्न निर्माण झाला की आता भूमिका काय घ्यायची. म्हणून मग त्यांनी या सर्व मुलाखती, मुस्लिम मुल्ला-मौलवींनी केलेल्या बलात्कारांचे हिंदुत्त्ववाद्यांकडून होणारे उल्लेख, ख्रिश्चन पाद्री व पास्टरने केलेल्या बलात्कारांविषयीचे लिखाण याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. पण हे करताना कुठेही त्या मुलीला न्याय मिळावा अशी भूमिका डाव्या माध्यमांनी घेतली नाही. जेव्हा काही राष्ट्रीय विचारांची माध्यमे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी बातम्या दिल्या तेव्हा त्यातील सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाली. पण ते सत्य बाहेर आल्यावरही मोठ्या मनाने आपल्या वार्तांकनात झालेली चूक मान्य करून पण त्या निष्पाप मुलीच्या न्यायासाठी ते दाखवायची माणूसकीही या माध्यमांनी दाखवली नाही.
 
 
तीन महिन्यांपूर्वी आपल्या मुलीच्या झालेल्या हत्येच्या दुःखातून तिचे पालक अजून सावरलेही नसतील. मात्र त्यांच्या दुःखाची अजिबात फिकीर न करता मोदीद्वेषाची आपली पोळी भाजण्यासाठी त्या निष्पाप जीवाचा वापर निर्लज्जपणे केला गेला. चित्रपट अभिनेत्रींसह राजकीय पक्षांना त्यासाठी वेठीस धरले गेले. डिझायनर कँपेन केले गेले. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही घटनेचा फायदा उचलत आपल्याला हवा तसा रंग या प्रकरणाला दिला. त्यासाठी जम्मू भागातील नव्हे तर काश्मीर भागातील त्यांच्या नियंत्रणात राहतील अशा तपास यंत्रणांना कामाला लावले व केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे तपास सुपूर्द करण्याच्या मागणीला सोयिस्कर रित्या बाजूला सारले गेले. या एकूणच कठुआ प्रकरणामुळे अनेकांचे चेहरे उजेडात आले आहेत. कोणाच्या आडून कोण कोणावर हल्ला करत आहे हे देखील साऱ्या देशाला समजले आहे. एखाद्या चिमुरडीच्या मृत्यूला राजकीय स्ट्रॅटेजी बनवून वॉर रूममधल्या लोकांना कामाला लावलेले सर्व समाजाने पाहिले आहे. हत्येच्या आडून हिंदुत्त्वावर हल्ला करण्याचे हे डावे कारस्थान भारताला नवे नाही. मात्र प्रत्येकवेळी तोंडावर पडूनही त्यांची खोड काही मोडत नाही हे विशेष. हैद्राबाद बॉम्बस्फोट हल्ल्याप्रमाणे कठुआ हत्याकांडातील संपूर्ण सत्य बाहेर येईल त्यावेळी याच डाव्या माध्यमांना व काँग्रेसादी पक्षांना आपले तोंड लपवत फिरावे लागेल यात शंका नाही. म्हणूनच कठुआ प्रकरणाने देशाला शिकवलेला पहिला धडा हाच आहे की राजकीय स्वार्थासाठी डावी माध्यमे व काँग्रेसादी पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्यापासून संपूर्ण देशाने सावध राहायला हवे.
 
(क्रमशः)
@@AUTHORINFO_V1@@