कुटुंबियांची माहिती नसलेल्या अनाथांनाच मिळणार समांतर आरक्षणाचा लाभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |





मुंबई : आई वडिल किंवा घरातील अन्य कोणत्याही सदस्यांची अथवा नातेवाईकांची माहिती नसलेल्या मुलांनाच एक टक्का समांतर आरक्षणाच्या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामधून ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. १७ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गामधून एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी असलेल्या अटी शर्ती या शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आल्या आहेत.


आई-वडिल किंवा अन्य नातेवाईकांच्या ज्या मुलांच्या कागदपत्रांवर उल्लेख नसेल, अशाच मुलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या मुलांचे आई-वडिल हयात नाहीत, तसेच ज्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्रही उपलब्ध नसेल अशा मुलांना संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलांनी अर्ज केल्यानंतर सदर अर्ज बालकल्याण समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर सदर समिती पोलीस यंत्रणा आणि महसूल विभागाशी चर्चा केल्यानंतर संबंधित अर्जदाराची शिफारस महिला व बालविकास विभागाकडे करणार आहे. बालविकास विभागातर्फे अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल त्याच मुलांना शिक्षण आणि नोकरीसाठी खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. शासन निर्णय जारी केल्यानंतर शासनाच्या ‘अ’ ते ‘ड’ वर्गाच्या पदांवर या एक टक्का अनाथ आरक्षणाचा लाभ लागू होणार आहे. तसेच सरळ सेवा भरतीत अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार पद भरले जाणार असल्याचेही या निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती, वसतिगृह किंवा व्यवसायिक शिक्षणांतर्गत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनासाठी हे आरक्षण लागू राहणार आहे.

आयुक्तांमार्फत फेरतपासणी आवश्यक


ज्या मुलांना सदर आरक्षणाद्वारे नोकरीमध्ये नियुक्त करण्यात आल्यास सदर मुलांच्या अनाथ प्रमाणपत्रांची फेरतपासणी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@