महापालिका ठेवणार धरणातील प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा हिशोब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |
 

 
 
 
नाशिक : धरणातील पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रवासात प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवण्यासाठी महापालिका ’स्काडा’ या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करणार आहे तर स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील सुमारे दोन लाख जोडण्यांना स्वयंचलित नोंदणीची सुविधा असणारी जलमापन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
 
यासाठी २४९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर, दारणा नदीवरील चेहेडी बंधार्‍यातून जितके पाणी घेतले जाते, त्यातील ४४ टक्के पाण्याचे उत्पन्न पालिकेला मिळत नाही. पाणी परीक्षणात ४४ टक्के पाणी हिशेबबाह्य असल्याचे आधीच स्पष्ट झाले. शहरात पसरलेल्या १८०० किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. काही जलवाहिन्या जुनाट असल्याने गळती होते, तर अनधिकृत नळजोडण्यांद्वारे पाणीचोरीची दाट शक्यता आहे. मध्यंतरी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत असे प्रकार उघड झाले आहेत.
 
पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वितरणव्यवस्था सुधारण्याच्या योजना आगामी वर्षांत राबविल्या जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार उगमस्रोत, वितरणप्रणाली, प्रत्यक्ष वापरणारा ग्राहक या तिन्ही भागांसाठी पाणीपुरवठ्याचा उगम स्रोत अर्थात धरण ते रहिवासी या संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी स्काडा प्रणाली बसविण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धरण ते प्रत्येक घरात होणारा पाणीपुरवठा इथपर्यंतचा पाण्याचा प्रवास, त्याचा संपूर्ण हिशोब ठेवणे शक्य होणार असल्याचे मुंढे यांनी सूचित केले.
 
तोट्यातील व्यवस्था
 
महापालिका गंगापूर धरण, दारणा नदीवरील चेहेडी बंधारा येथून दररोज सर्वसाधारणपणे ४३० दशलक्ष लिटर पाणी उचलते. सहा जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून १०३ जलकुंभाद्वारे सुमारे १८०० किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांमधून पाण्याचा घरोघरी पुरवठा केला जातो. सहा विभागांत दररोज ३५१.८२ दशलक्ष लिटर पाणी वितरित केले जाते. त्यातील केवळ २०० दशलक्ष लिटर पाण्याची आकारणी होते. पाणीपुरवठा व्यवस्था चालविण्यासाठी होणारा खर्च आणि पाणीपुरवठ्यातून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने महापालिकेची पाणीपुरवठा योजना तोट्यात आहे. पाणी लेखा परीक्षणात बहुसंख्य नळ जोडण्यांना असलेले पाणी मीटर नादुरुस्त तर काही ठिकाणी मीटर काढून टाकल्याचे आढळले होते. अनधिकृत नळजोडण्या मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिशेबबाह्य पाणी ४३ टक्क्यांहून अधिक आहे.
 
आता वापरलेल्या पाण्याचेच देयक
 
महानगरपालिकेच्या नोंदीनुसार शहरात एक लाख ८९ हजार ५३ नळजोडण्या आहेत. सध्या ग्राहकांनी बसविलेले पाण्याचे मीटर ब गटातील असून ते लवकर नादुरुस्त होतात. त्यामुळे पाण्याचे देयक तयार करताना अडचणी येतात. नागरिकांना चुकीच्या देयकांची आकारणी होते. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील सर्व नळजोडण्यांना आधुनिक स्वयंचलित जलमापन यंत्र बसविण्यात येणार आहे.
 
गावठाण भागात अविरत पाणी
गावठाण भागात असमान पाणीपुरवठा होत आहे. या परिसरातील जीर्ण वाहिन्यांमुळे गळती, दूषित पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसरात २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यात जुन्या, खराब झालेल्या जलवाहिन्या बदलणे, नवीन तीन जलकुंभांची उभारणी याद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. पुढील काळात संपूर्ण शहरात अविरत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@