मूल वाढवताना...

    02-Apr-2018
Total Views |

‘मुलांचा विकास’ या विषयी भारतीय तत्त्वज्ञानासह जगभरात मांडलेले प्रयोगसिद्ध विचार काय? 'Developmental disorders' म्हणजे काय? तज्ज्ञांचा सल्ला कधी, कसा उपयोगी आहे? या सर्व मुद्द्यांची चर्चा आपण ‘रुजवात’ या नवीन सदरातून दर रविवारी करणार आहोत.

’’आई, तन्मयचे आजोबा आले आहेत,’’ दोन वर्षांनंतर पाहूनही लेकीनं या गृहस्थांना ओळखलं, याचं मला आश्र्चर्य वाटलं. ’’अरे वा! तू ओळखलंस की गं त्यांना!’’ या माझ्या कौतुकावर तिनं गुगली टाकत मलाच क्लीनबोल्ड केलं. नुकतंच सातवं लागलेली लेक म्हणाली, ’’अगं मी कसं ओळखणार? उंची किती वाढलीये त्यांची!’’ फर्रकन येणार्‍या हास्याला मंद स्मिताकडे वळवण्याची कला इथे पुन्हा कामी आली. ’’खरंच गं!’’ असं म्हणून मी तिचं ‘विकसित होणं समरसून अनुभवायचं ठरवलं. ’विकासाचे मानसशास्त्र’ या विषयाचं गारुड अनेक वर्षांपासून माझ्या मनावर आहे. माणसाच्या शारीरिक, बौद्धिक, मनोसामाजिक विकासाचा अभ्यास करताना, त्या आधारे मुलांना व कुटुंबांना समुपदेशन करताना, या शास्त्राची खोली व व्याप्ती पुन्हा पुन्हा जाणवते.

मूल जन्मल्यापासून जगाची ओळख कशी करुन घेतं? सभोवतालचा अर्थ कसा लावतं? पंचेंद्रियांतून माहिती कशी गोळा करतं? माहितीचं ज्ञानात रूपांतर होताना काय कौशल्यं लागतात? ज्ञान व्यवहारात कसं व केव्हा वापरलं जातं? व्यक्तिसापेक्षतेचा भाग किती? आणि बौद्धिक, भावनिक व मनोसामाजिक वाढ सदृढ होण्यासाठी पोषक वातावरण कसं हवं? या प्रश्र्नांची उकल करता येणं अत्यंत आवश्यक आहे. 'Parenting is the easiest thing to have an opinion about, but the hardest thing to do' - Matt Walsh पालकत्व हा अत्यंत कौशल्यपूर्ण प्रवास आहे. परंतु अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा अभ्यासक्रमांच्या भाऊगर्दीत सगळ्यांनाच आवश्यक अशा पालकत्वाच्या अभ्यासक्रमासाठी मात्र ना शाळा, ना ट्युशन क्लासेस!

लंडनमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस बरोबर कामकरताना, दीड वर्षाच्या, डोळ्यांत मिश्कील हसू असणार्‍या एका गट्टूच्या आईला समुपदेशन करत होते. गर्भारपणात जवळच्या लोकांकडून जाणता-अजाणता मिळालेल्या धक्क्यांतून ही एकटी आई फारच हळवी झाली होती. ’माझं मूल रडलं तर आई म्हणून मी अगदी वाईट ठरते,’ अशी ठामसमजूत तिनं करून घेतली होती. तिच्या चिंता विकारावर उपचार चालू होतेच. त्याबरोबरच मानवी विकासाची माहिती तिला दिल्याचा खूप फायदा झाला. सहा महिन्यांच्या उपचारानंतर ती लाडक्या लेकाचं बालपण आत्मविश्र्वासानं, आनंदानं अनुभवायला शिकली. शेवटच्या सत्रात हे गट्टू महाराज खुर्चीला अडखळून पडले आणि भोकाड पसरून रडायला लागले. माझ्याशी बोलताना थांबून, त्याच्या आईने हसून शांतपणे त्याला हाक मारली व ‘उठून माझ्याकडे ये’ असं सुचवलं. गट्टू धावत येऊन तिच्या मिठीत विसावला. उपचार लागू पडल्याची व माहितीचं प्रयोगशील ज्ञानात रूपांतर झाल्याची अजून काय पावती हवी होती?

आजचे पालक सजग झालेले आहेत. ’कसलं आलंय बालमानसशास्त्र? दोन दणके द्यावे हेच खरं.’ अशा मतांच्या पिंका टाकणार्‍यांचं प्रमाण तुलनेनं खूप कमी झालंय. अर्थात पालकांच्या संवेदनशीलतेचा गैरफायदा घेणार्‍या संस्था मात्र बोकाळलेल्या आहेत. आठ दिवसांत मुलांचे व्यक्तिमत्व विकसित (?) करून देणारी उन्हाळी शिबिरे, बोटांचे ठसे घेऊन व्यक्तिमत्वाचा भलामोठा रंगीबेरंगी अहवाल देणारी सेंटर्स वा ध्वनिलहरींद्वारे प्रयोग (?) करून मेंदूची क्षमता वाढवण्याचा दावा करणारे महाभाग, ‘करून तर बघू’ असं म्हणून, अशा वाटेनं जाण्याआधी हा विचार जरूर करावा की आपण मुलांच्या मनावर ‘यशाला शॉर्टकट असतो’ अशी कल्पना तर बिंबवत नाही ना? आणि यशाला शॉर्टकट नाही हे तर सर्वच पालकांना मान्य असेल. मग हा अट्टहास नक्की कशासाठी? ठोस शास्त्राधार नसलेल्या, मेहनतीशिवाय विकासाची खात्री देणार्‍या मार्गाकडे न जाणेच श्रेयस्कर.

सजगतेबरोबरच सुजाणतेची कास धरली तर आपल्या पाल्यांच्या सुदृढ विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, कुठल्याही स्तरातल्या पालकांना शक्य आहे. मुलांना पालकांइतकं जवळून कोणीच ओळखू शकत नाही. सजग, सुजाण आणि समर्थ पालकांच्या हातातच जगाचं भवितव्य सुरक्षित आहे.



- गुंजन कुलकर्णी
(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.