बचत गटामुळे महिलांनी साधली आर्थिक प्रगती : केंद्रीय मंत्री अहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

महिला बचत गटांना चारचाकी मालवाहू वाहनाचे वाटप 



यवतमाळ : महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी ग्रामीण भागांमध्ये बचत गट सुरु करण्यात आले होते. याचा महिलांनी अत्यंत चांगला फायदा घेतला असून बचत गटांमुळे महिलांना अत्यंत उत्तम आर्थिक प्रगती साधली आहे, असे कौतुक केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने पांढरकवडा येथील जिड्डेवार भवनात आयोजित ग्राम संघांना वाहन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. त्यामुळे कधीकाळी पुरुष प्रधान असलेला देश आता महिला प्रधान झाला आहे. ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या संसाराला व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या आजिविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेंतर्गत अहीर यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध महिला गटांना चारचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण पाच बचत गटांना दोन प्रवासी सुप्रो आणि तीन बोलेरो पिकअप अशा एकूण पाच वाहनांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वाहने उपलब्ध करीत स्वत:च वाहनाचे चालकत्व स्वीकारले आहे, असे म्हणत, आजची ग्रामीण महिला जिद्द, परिश्रम आणि असामान्य कर्तृत्वाच्या माध्यमातून पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करण्यात यशस्वी ठरली आहे, असे कौतुक देखील त्यांनी यावेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@