शिक्षकांच्या वाचनामुळे अध्यापन सोपे,आनंददायी व्हावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

आमदार संजय सावकारे : भुसावळला उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या ‘रीड’ ग्रंथालयाचे उद्घाटन

 
भुसावळ :
तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान वापरामुळे बुध्दीचा वापर कमी होत आहे. पाहिजे ती गोष्ट एका क्लीकवर उपलब्ध होते. मात्र यावर मिळवलेले ज्ञान हे चिरकाल टिकणारे नाही. उत्तर महाराष्ट्रातील पहिले भुसावळ गटसाधन केंद्राने शिक्षकांसाठी चालवलेले शिक्षकांचे रीड ग्रंथालय शिक्षकांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यास हातभार लावणार आहे. पुस्तकातून केलेले वाचन हे कायमस्वरूपी लक्षात राहते. तसेच या वाचनामुळे अध्यापनात विविध उदाहरणे देत आनंददायी अध्यापन होण्यास मदत होणार असल्याचे मत आ. संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले.
 
 
भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात पंचायत समिती शिक्षण विभाग गटसाधन केंद्र यांच्या वतीने शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या शिक्षकांसाठीच्या रीड ग्रंथालयाचे उद्घाटन जि.प शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे यांच्या हस्ते झाले.
 
 
अध्यक्षस्थानी आ. संजय सावकारे होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की, अवांतर वाचनाच्या अभावामुळे कंटाळवाणे अध्यापनात विद्यार्थ्यांना आनंद मिळत नाही. ती संकल्पना समजून घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. मात्र तीच संकल्पना आनंददायी व विविध दाखले देवून पटवून दिल्यास विद्यार्थ्याना देखील समजून घेणे सोपे होते आणि घेण्यात आनंद मिळतो. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण मोबाईलच्या आजुबाजुलाच वावरताना दिसतो. यामुळे एकमेकांमधील संवाद देखील दुरावले आहेत. शेजारी कोण आहे याचे भान देखील नसते. हे वाचन हे जास्त कालावधी साठी लक्षात राहत नाही. मात्र तेच वाचन पुस्तकातून केल्यास त्यातील शब्द अन् शब्द लक्षात राहतो. सुसंस्कृत पिढी घडविण्यात शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. यामुळे वाचनाद्वारे हे महत्कार्य पार पाडण्यास मदत होणार आहे. भविष्यात या ग्रंथालयाचा विस्तार वाढणार असल्याचे सावकारे यांनी सांगीतले. प्रास्ताविकात विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी सांगीतले की, गटसाधन केंद्राच्या वतीेने रक्तदान शिबीर, कर्करोगग्रस्ताला मदत, शिवजयंती अशी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षकांना एकत्र केले आहे.शिक्षकांमधे वाचन संस्कृती रूजली पाहिजे. त्या माध्यमातून वाचनाची आवड विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. या उदात्त हेतुने शिक्षकांना प्रोत्साहीत करण्याासाठी गटसाधन केंद्रात रीड ग्रंथालयाची निर्मीती करण्यात आली आहे.
 
नवीन पुस्तक विकत घ्या...
प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे पाटील म्हणाले की, प्रत्येक महिन्याला प्रत्येक शिक्षकाने एक नवीन पुस्तक विकत घ्यायचे. ते पूर्ण वाचायचे व रीड ग्रंथालयाला भेट द्यायचे यामुळे ग्रंथालयातील ज्ञानाचा संग्रह वाढणार आहे. विविध पुस्तके शिक्षकांना वाचायला मिळणार आहे. हा आदर्श उपक्रम इतर तालुक्याला राबविण्याासाठी देखील प्रयत्न करणार आहे. ग्रंथालयाला पुस्तकांची भरघोस मदत करणारे श्री. शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर, महेंद्र मेढे, रीड ग्रंथालयाची संकल्पना ज्यांच्या मुळे सुचली त्या भिलार दौर्‍यातील १६ शिक्षक, गटसाधन केद्र सजविणार्‍या महिला व गटशिक्षणाधिकारी महेंद्र धिमते, विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, रागीणी चव्हाण यांच्यासह केंद्रप्रमुखांचा स्मृती चिन्ह व पुस्तक देवून गौरव करण्यात आला. बियाणी इंग्ली मिडीअम स्कूलने रीड ग्रंथालयाच्या लोगोची तर जि.प.शिक्षक ज्योती बेलसरे यांनी संविधान प्रास्ताविकाची प्रतिमा रीड ग्रंथालयाला भेट दिली. प्रारंभी गटसाधन केंद्रात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जि.प.शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, आ. संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रीड ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. सजवण्यात आलेल्या गटसाधन केंद्राची पहाणी करून मान्यवरांनी शिक्षकांचे कौतुक केले.
प्रगल्भता वाढवा...
प्रमुख वक्ते डॉ. मदन ससाणे म्हणाले की, शंका निर्माण झाल्या शिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही. वाचनालयातील पुस्तके ही साधने तर अध्यापनातील संकल्पना विद्यार्थ्यांना शंभर टक्के समजणे हे उद्दिष्ट आहे. विविध पुस्तकात दडलेले ज्ञान शिक्षकांनी मिळवून स्वत:मधील प्रगल्भता वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
वाचनामुळे जीवनाला वळण
उद्घाटक पोपट तात्या भोळे म्हणाले की, गुणवंत, चारीत्र्यवान, आदर्श नागरिक हे वाचनातून घडली आहेत. थोर पुरूषांची चरित्राचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की, वाचनामुळे त्याच्या जीवनाला वळण मिळाले आहे. याकरीता शिक्षकांनी वाचन केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांमधे देखील वाचन संस्कृती रूजवली पाहिजे.
यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी तर आभार संजय भटकर यांनी मानले. प्रकल्प अधिकारी आर.बी. हिवाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, सभापती सुनिल महाजन, मनिषा पाटील, जि.प.सदस्या पल्लवी सावकारे,सदस्य रविंद्र पाटील, पं.स.सदस्य विजय सुरवाडे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, महेंद्र धिमते, प्रशासन अधिकारी डी.टी.ठाकुर आदि उपस्थित होते.
 
  
@@AUTHORINFO_V1@@