राहुल गांधी, फक्त माफी नाही प्रायश्चित्त घ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
हिंदू दहशतवाद या शब्दावरून कॉंग्रेस सध्या अडचणीत आली आहे. या शब्दावरून माजी कॉंग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि विद्यमान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी भाजपाची मागणी आहे, जी न्याय आणि स्वाभाविक आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द वापरून कॉंग्रेसने देशातील कोट्यवधी हिंदूंचा अपमान केला आहे.
हैदराबाद येथील मक्का मस्जिद येथील स्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाने स्वामी असिमानंद यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आणि हिंदू दहशतवाद हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. मक्का मस्जिद येथील स्फोटात काही मुस्लिम दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. मात्र हा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर त्यांनी आधीच्या तपासाच्या निष्कर्षापासून घूमजाव करत स्वामी असिमानंद आणि अन्य चौघांना आरोपी केले. त्यानंतर हा हिंदू दहशतवादाचा प्रकार असल्याचा आरोप तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्‌ आणि सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता.
 
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयिंसह आणि सलमान खुर्शीद यांनीही याच आरोपांचा पुनरुच्चार केला होता. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे तत्कालीन महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी या नेत्यांची मते म्हणजे पक्षाची भूमिका नसल्याचे तेव्हा स्पष्ट केले होते. मात्र राहुल गांधींच्या भूमिकेबाबत जनार्दन द्विवेदी यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यामुळे राहुल गांधींची हिंदू दहशतवाद या शब्दासंदर्भातील प्रतिक्रिया ही कॉंग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मानायला हरकत नाही. त्यामुळेच या शब्दाबद्दल श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माफी मागण्याची मागणी भाजपाने केली आहे.
 
 
 
मक्का मस्जिद येथील स्फोटाच्या घटनेपर्यंत देशात ज्या दहशतवादी घटना झाल्या, त्यात मुस्लिम अतिरेक्यांचा हात होता. त्यामुळे देशातील मुस्लिम समाज अडचणीत आला होता. देशातील सगळेच मुस्लिम हे अतिरेकी नाही, पण सगळेच अतिरेकी हे मुस्लिम होते, याकडे कोणालाच डोळेझाक करता येत नव्हती. मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी तसेच मतांच्या राजकारणावर डोळा ठेवत कॉंग्रेस नेत्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणला होता. यातून फक्त तुमच्यातच नाही तर हिंदूंमध्येही दहशतवादी आहे, असे कॉंग्रेस नेत्यांना सांगायचे होते.
यातून मुस्लिम समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न कॉंग्रेस नेत्यांनी केला होता. पण, हे करताना आपण या देशातील कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतो, त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत दहशतवादी ठरवतो, याचे भान कॉंग्रेसच्या नेत्यांना राहिले नाही. त्यानंतर कॉंग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही हिंदूंना दहशतवादी ठरवायला मागेपुढे पाहिले नाही. लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांपेक्षाही हिंदू दहशतवादी देशासाठी धोकादायक असल्याचे विधान राहुल गांधी यांनी त्या वेळी केले.
 
असे करताना आपण अप्रत्यक्षपणे लष्कर ए तोयबाची पाठराखण करत आहोत, याचे भान राहुल गांधी यांना राहिले नाही. कारण हिंदूंना दहशतवादी ठरवणार्‍या राहुल गांधींना त्या वेळी हिंदू मतांची किंमत समजत नव्हती, पण आता मात्र हिंदू मतांची किंमत त्यांना समजली आहे. त्यामुळे आधी गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेणार्‍या आणि स्वत:ला जानवेधारी हिंदू सिद्ध करणारे राहुल गांधी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतही मठ आणि मंदिरांची प्रदक्षिणा घालत आहेत.
भाजपाने केलेल्या मागणीवर, माफी मागण्यास नकार देत कॉंग्रेसने राहुल गांधी यांनी कधी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरलाच नाही, अशी मुजोरी सुरू केली. त्यावर भाजपाने अमेरिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत तिमोथी यांनी आपल्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या विकिलिक्सच्या केबलचा हवाला देत कॉंग्रेसचे पुरते वस्त्रहरण केले आहे. तिमोथी यांनी भारतातील लष्करच्या कारवायांबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी लष्करचे भारतात काही पाठीराखे असल्याचे मान्य केले होते, मात्र त्याच वेळी लष्करच्या अतिरेक्यांपेक्षा हिंदू अतिरेकी देशासाठी धोकादायक असल्याचे तारे राहुल गांधी यांनी तोडले होते.
 
भाजपाने हे पुराव्यानिशी समोर आणल्यावर कॉंग्रेस नेत्यांची बोलती बंद झाली. राहुल गांधी कधी काय बोलून पक्षाला अडचणीत आणतील याचा भरोसा नाही. राहुल गांधी यांच्या गुणांमुळेच (की अवगुण) कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यास विरोध केला होता. राहुल गांधी यांनी पक्षाला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या बालिश विधानांनी राहुल गांधी यांनी याआधीही अनेक वेळा पक्षाला अडचणीत आणले आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे उपाध्यक्ष असताना अमेरिकेतील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर आपल्या काही चुकांची कबुली देत आपल्या पक्षाला घरचा अहेरही केला. हे करताना गेल्या जवळपास दोन दशकापासून कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व आपल्या आईकडेच आहे, याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही.
 
आताही संसदेत 15 मिनिटे बोलण्याची संधी मला मिळाली तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बोलती बंद करू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले. कागद न पाहता राहुल गांधी धड पाच मिनिटेही बोलू शकता नाही. उत्स्फूर्तपणा आणि हजरजबाबीपणा याचा राहुल गांधी यांच्या भाषणात पूर्ण अभाव असतो. घरून पाठ करून आलेले भाषण राहुल गांधी संसदेत धडाधड म्हणून मोकळे होतात. आणि वक्तृत्वाचा आदर्श असलेल्या नरेंद्र मोदी यांची बोलती बंद करण्याचा दावा करतात, हे अतिशय हास्यास्पद आहे. असे म्हणणे म्हणजे गल्लीत फळकुटाच्या साह्याने क्रिकेट खेळणार्‍याने मी सचिन तेंडुलकरपेक्षा किती श्रेष्ठ क्रिकेटपटू आहे, हे सांगण्यासारखे आहे.
मुळात राजकारणात यशस्वी होण्यासाठी वक्तृत्वकला तर आवश्यक आहे, पण त्यापेक्षाही काय बोलण्यापेक्षा काय बोलू नये, याचे भान आवश्यक असते. याचे भान ज्याच्याजवळ आहे, तो एखादवेळी वक्तृत्व कला नसतानाही पंतप्रधान म्हणून यशस्वी होऊ शकतो. असे भान असते तर राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूतासोबत चर्चा करताना हिंदूंना दहशतवादी ठरवले नसते. मुळात दुसर्‍या देशाच्या राजदूतासोबत बोलताना, चर्चा करताना अनेक गोष्टींचे व्यवधान ठेवणे आवश्यक असते.
 
 
तुम्ही संसदेत आपल्या सरकारवर कितीही टीका करा, त्यात गैर काही नाही, पण दुसर्‍या देशाच्या राजदूतासोबत चर्चा करताना आपल्या देशावर वा देशातील सरकारवर टीका करणे औचित्याला सोडून असते. बाहेरच्या देशांतील लोकांसोबत चर्चा करताना पांडवासारखी आम्ही एकशे पाच असल्याची भूमिका घ्यायची असते. मात्र दिल्लीत नुकत्याच झालेल्या कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनात स्वत:ला पांडव ठरवणार्‍या कॉंग्रेसला याचे भान राहिले नाही, त्यांनी आपल्या कृतीतून स्वत:ला कौरव मात्र सिद्ध केले आहे.
काहीच समजत नसताना आपल्याला सर्व काही समजते, या राहुल गांधी यांच्या आविर्भावामुळे कॉंग्रेसचे नेते त्रस्त आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे फायदा नाही पण कॉंग्रेसचे नुकसानच जास्त होत आहे. तरीही राहुल गांधी यांना अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहे. स्वप्ने पाहण्यापासून कोणीच कोणाला रोखू शकत नाही. मात्र राहुल गांधी यांची भूमिका ही नेहमीच शेखचिल्लीची राहिली आहे. म्हणजे झाडाच्या ज्या फांदीवर बसायचे तीच फांदी कुर्‍हाडीने तोडायची, असा प्रकार राहुल गांधी नेहमीच करत असतात. ज्या हिंदूच्या मतांच्या आधारावर कॉंग्रेसने आतापर्यंत सत्ता उपभोगली, त्याच हिंदूंना त्यांनी मूठभर मुस्लिम मतांसाठी दहशतवादी ठरवायला मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे आपल्या विधानासाठी राहुल गांधी यांनी फक्त माफी मागून चालणार नाही, तर त्यांनी प्रायश्चित्त घेण्याची गरज आहे. कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांनी स्वत:हून प्रायश्चित्त घेतले नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@