राजकीय द्वेषासाठी कॉंग्रेस करते न्यायालयीन प्रक्रियेचा दुरूपयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

 
 
राजकीय द्वेषासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करत आहे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी आलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.
 
 
 
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचा संबंध राजकीय फायद्यासाठी लावून, त्यांच्या मृत्यूवर काँग्रेसतर्फे संशय घेतला गेला होता. तशी याचिका देखील काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत, न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाले असल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
यावरून भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. संबित पात्रा या प्रकरणी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून काही लोक ज्याप्रकारे न्यायालयीन प्रक्रियेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचे पितळ आज उघडे पडले आहे. राहुल गांधी यांना ज्याप्रकारे एकामागून एक, असे निवडणुकीत अपयश येत आहे, त्याचा बदला म्हणून ते न्यायालयीन प्रक्रियेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असा आरोप त्यांनी यावेळी लावला.
 
 
"ना खाता, ना बही, बस राहुल गांधी बोले वही सही..?" असा उपरोधात्मक प्रश्न त्यांनी यावेळी पत्रकारांसमोर उपस्थित केला. राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला आता सर्वोच्च न्यायालयापेक्षा देखील मोठे मानायचे का? हे देखील पात्रा यांनी विचारले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@