‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा पुनर्वापर शक्य !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांकडून
पुनर्वापराच्या पद्धतीचा शोध
 
 

 
पुणे : ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (पीओपी) पुनर्वापराचे तंत्रज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या प्रचंड प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवणे नजिकच्या काळात शक्य होणार आहे.
 
 
पीओपीचा वापर करून घडविण्यात येणाऱ्या विविध कलाकृती व सजावट हा सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय असतो. मात्र, पीओपी पुन्हा वापरता येत नसल्याने त्याचा कचरा आणि त्यामुळे होणारे प्रदूषणही प्रचंड आहे. या समस्येवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील सायन्स पार्क विभागाने तोडगा काढला आहे. सायन्स पार्कने शोधून काढलेल्या या प्रणालीनुसार पीओपी भाजणे, दळणे, चाळणे अशा सोप्या प्रक्रिया विशिष्ट प्रकारे केल्या तर त्यापासून पुन्हा एकदा पीओपीच्या मूर्ती वा अन्य कलाकृती बनवता येणे शक्य आहे, अशी माहिती या प्रयोगाचे संचालक व विद्यापीठामधील प्राध्यापक डॉ. जयंत गाडगीळ यांनी दिली. गाडगीळ यांच्या समवेत या प्रकल्पामध्ये त्यांच्या सहकारी सोनाली म्हस्के या देखील कार्यरत आहेत. सायन्स पार्क विभागाकडून या संदर्भात गेल्या वर्षी (२०१७) प्रयोगा दाखल एक टन पीओपीवर प्रक्रिया करण्यात आली. त्यापासून ८०० किलो पीओपी पुन्हा मिळविण्यात यश आले.
 
 
पीओपीचा एकूण घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करणे यांच्याशी अगदी जवळचाच संबंध आहे. सजावटीसाठी दररोज हजारो टन पीओपी वापरला जातो. याशिवाय केवळ पुण्यातच पीओपीपासून बनविण्यात आलेल्या किमान सहा लाख मूर्तींचे गेल्या वर्षी विसर्जन झाले. महाराष्ट्रात तर ही संख्या त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहे. यामुळेच गणपती उत्सवाचे वेध लागले की, त्या बरोबरच पीओपीमुळे होणाऱ्या प्रदुषणाचे काय करायचे, असा काळजीचा सूरही उमटतो. पीओपीच्या या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर त्यांचे काय व कसे व्यवस्थापन करायचे, ही समस्या दरवर्षी अधिकाधिक जटिल होते. कारण पीओपी किंवा त्याच्या भुकटीचा पुन्हा वापर करता येत नाही, असे आत्तापर्यंत मानण्यात आले होते. हीच बाब घरात व समारंभांमध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या पीओपीलाही लागू पडते. या पार्श्वभूमीवर, सायन्स पार्ककडून करण्यात आलेले हे संशोधन अत्यंत उल्लेखनीय आहे.
 
 
या उपायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत -
  
१. पीओपीचा पुनर्वापर शक्य असल्यामुळे त्याचा पर्यावरणावर पडणारा ताण कमी होतो.
२. मूर्ती विसर्जनामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण टळते.
३. मिळणाऱ्या पीओपीचा नक्षीकाम, खोलीला रंगकाम करण्यापूर्वी भिंती लिंपणे, तसेच इतर सजावटीसाठी वापर करता येतो.
प्रत्यक्षातील समस्या सोडविण्यासाठीचा प्रकल्प : डॉ. गाडगीळ
हा प्रकल्प केवळ प्रायोगिक पातळीवर न राहता प्रत्यक्षातील समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात यावा, अशी अपेक्षा डॉ. गाडगीळ यांनी व्यक्त केली. "या प्रकल्पासाठी आता आम्हाला पाठबळ देऊ शकणाऱ्या संस्था, गणेशमंडळे, स्वयंसेवी संस्थांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे तसेच या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत,'' असे गाडगीळ म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@