महसूल मंत्र्यांच्या आश्‍वासनांनंतर तलाठी संघटनेचा बहिष्कार मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या, रिक्त पदांची भरती, ऑनलाईन सातबारा कामासंदर्भात दिलेल्या नोटिसा मागे घेणे आदी तलाठी संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना दिले. या चर्चेनंतर तलाठी संघटनेने सातबारामधील डिजिटल सिग्नेचरच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर केले.
 
राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात संघटना प्रतिनिधींची महसूलमंत्री पाटील यांच्यासोबत काल मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऑनलाईन सातबारा प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप, तलाठी संघटनेचे अध्यक्ष एस. एम. जोशी, महासंघाचे सरचिटणीस बाळकृष्ण गाढवे, विदर्भ पटवारी संघटनेचे संजय उनव्हणे, एम. बी. सावंत, कार्याध्यक्ष हरिश्‍चंद्र जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
 
राज्यातील सर्व सातबारा उतारे ऑनलाईन करण्याच्या कामासाठी राज्य शासनामार्फत तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले होते. ज्या ठिकाणी लॅपटॉप दिले नाहीत, तेथे लवकरच अद्ययावत लॅपटॉप देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पाटील म्हणाले. तलाठ्यांच्या सर्वसाधारण बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. आता ३१ मेपर्यंत या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवावा, डिजिटल सातबारा प्रकल्प राबविताना तलाठ्यांवर केलेली कार्यवाही मागे घेण्यासंबंधीही सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.
 
राज्यातील ऑनलाईन सातबारा प्रकल्प राबविताना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आदींनी अहोरात्र मेहनत केली. त्यामुळे राज्यातील सर्वच गावातील सातबारा उतारे डिजिटल झाले आहेत. या कामाची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठ्यांचे अभिनंदन केले. गेल्या दोन वर्षांत महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व जिल्ह्यातील यंत्रणेने केलेल्या कामामुळेच डिजिटल सातबाराचे एवढे मोठे काम पूर्ण होत आहे. देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात असे काम होत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे पाटील म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@