फक्त स्वप्न दाखवणारे ‘हात’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |




 

राहुल गांधींनी आता खरे तर अशी आश्वासने देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. आपल्याला मते का मिळत नाहीत, याचा विचार करावा. शिवाय एखाद्या शहराचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट राहुल गांधी करतात, तर मग त्यांना संपूर्ण देशाच्या विकासाची भूमिका का मांडावीशी वाटत नाही? राहुल गांधी फक्त स्वतःच्या शहरापुरताच का विचार करतात?

अमेठीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून आणखी १०-१५ वर्षांनी अमेठीचे कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इथल्या लोकांना दाखवले. अशी स्वप्नं राहुल गांधींनीच नाही तर त्यांच्या संपूर्ण घराण्यानेही केवळ अमेठीलाच नव्हे तर देशालाही दाखवली. स्वातंत्र्यापासूनच्या ७० वर्षांत हीच स्वप्ने विकून काँग्रेसींनी निवडणुका लढवल्या आणि सत्ता राबवली. सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पुण्याईवर काँग्रेसच्या मागे इथली जनता जात राहिली. स्वातंत्र्य केवळ आमच्यामुळेच मिळाल्याची कवने गाऊन काँग्रेसने जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षांकडे मात्र दुर्लक्ष केले. काँग्रेसने हे अमेठीतच नव्हे तर देशभर केले.

 
अमेठीवर तर १९६७ सालापासून एखाद-दोन अपवाद वगळता सलग काँग्रेसी नेते आणि गांधी घराण्यानेच राज्य केले. जवळपास ४५ वर्षे काँग्रेसने अमेठीला एखाद्या राखीव कुरणासारखे आपल्या हाती ठेवले. या प्रदीर्घ कालावधीत काँग्रेसला अमेठीचे कॅलिफोर्निया सोडा, देशातलेच अन्य प्रगत आणि विकसित शहर करण्याची बुद्धी झाली नाही. देशावर एकहाती केंद्रीय सत्ता गाजवणार्‍या काँग्रेसला त्यावेळी अमेठीचे कॅलिफोर्निया करण्यापासून कोणी अडवले होते? राज्याराज्यांमध्ये निरनिराळ्या पक्षांची सरकारे असतील, उत्तर प्रदेशातही काँग्रेसव्यतिरिक्त अन्यांची सत्ता असेल, पण अमेठी तर काँग्रेसच्याच ताब्यात होते ना? यातून काँग्रेसने फक्त लोकांना आमिष दाखवून आपला स्वार्थ साधल्यानंतर त्यांना वार्‍यावर सोडल्याची नीती अवलंबल्याचेच स्पष्ट होते.

आज आपल्याला अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूर या परिसरात निरनिराळ्या सरकारी कंपन्यांचे साम्राज्य असल्याचे दिसते. हे प्रकल्पही आधी संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या दबावामुळेच इथे आले. या प्रकल्पांमुळे इथे सरकारी नोकर्‍यांची रेलचेल झाली. पण आज अन्य शहरे ज्याप्रमाणे वेगाने प्रगती करताना दिसतात, तसा प्रगतीचा वेग अमेठीने कधीच पकडला नाही. आजही इथल्या जेमतेम ६० टक्के लोकांना लिहिता-वाचता येते. ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे राहुल गांधी करतात. लोकांना अशिक्षित आणि अडाणी ठेवण्याची ही नीती कोणालाही कळू शकते.

 
अशिक्षित लोकांना कोणतीही स्वप्ने दाखवणे आणि त्यांचा निवडणुकीत वापर करणे सोपे असते. याच नितीला अनुसरून आतापर्यंत इथे काँग्रेसने निवडणूक लढवली आणि जिंकलीही. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकांना काँग्रेसचा हा फंडा चांगलाच कळला. प्रतिस्पर्धी उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना विजयासाठी चांगलेच दमवले. मतांच्या टक्केवारीत तब्बल २५ टक्क्यांची घट होऊन राहुल विजयी झाले. स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यातील मतांचा हा फरक फक्त लाखभर आहे. हेही समाजवादी पक्षाशी केलेल्या छुप्या तडजोडीने आणि त्या पक्षाने उमेदवार न दिल्याने घडले. जर समाजवादी पक्षाने त्यांचा उमेदवार दिला असता तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता. काँग्रेसची सद्दी संपल्यानंतर उत्तर प्रदेशात सपा आणि बसपचे राज्य होते. त्यांनी काँग्रेसच्या विरोधात लढत स्वतःचे काँग्रेसीकरण करून घेतले. कधी काँग्रेस विरोध तर कधी काँग्रेसशी सलगी करून आपले राजकीय हित या पक्षांनी साधले आणि अमेठीसह सर्व राज्य उपेक्षित ठेवला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीचे कॅलिफोर्निया करण्याचे आश्वासन दिले. अशीच आश्वासनांची खैरात राहुलनी निरनिराळ्या राज्यात झालेल्या निवडणुकांतही वाटली. पण त्यांच्यावर, त्यांच्या पक्षावर विश्वास नसल्याने या आश्वासनांच्या आमिषानंतरही मतदारांनी काँग्रेसच्या झोळीत मतांचे दान टाकलेच नाही. राहुल गांधींनी आता खरे तर अशी आश्वासने देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे. आपल्याला मते का मिळत नाहीत, याचा विचार करावा. शिवाय एखाद्या शहराचा कॅलिफोर्निया करण्याची गोष्ट राहुल गांधी करतात, तर मग त्यांना संपूर्ण देशाच्या विकासाची भूमिका का मांडावीशी वाटत नाही? राहुल गांधी फक्त स्वतःच्या शहरापुरताच का विचार करतात? आज देश भाजपच्या नेतृत्वात ‘सबका साथ सबका विकास’ ही भूमिका घेऊन पुढे जात आहे. इथे फक्त एका शहराच्या नाही तर देशाच्या विकासाचा विचार केला जात आहे, तर राहुल गांधी जर स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार मानत असतील तर त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका मांडायला हवी होती.
 
दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अमेठीतील भाषणात आणखी एक विधान केले. ‘‘मला १५ मिनिटे संसदेत बोलायला दिले तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गप्प करेल,’’ असे ते म्हणाले. राहुल गांधींच्या या विधानानंतर सोशल मीडिया आणि सर्वसामान्यांनी मात्र त्यांची पुरेपूर खिल्ली उडवली. तुम्ही आमच्यासमोर १ मिनीट उभे राहिलात तर तुमच्या विधानांमुळे हसून हसून पुरेवाट होते, म्हणत कित्येकांनी १५ मिनिटे खूप झाली, तेवढा वेळ कोण हसत बसणार? अशी खिल्ली उडवली. राहुल गांधींच्या प्रत्येक वाक्याची खिल्ली उडवली जाते, हे असे का होते, याचा विचार राहुल गांधींनी केला पाहिजे. पण फक्त दुसर्‍यांना दूषणे देण्यातच ज्यांचा सगळा वेळ खर्ची जातो, ते असे करणार नाही. त्यापेक्षा याला गप्प बसवू शकतो, त्याला गप्प बसवू शकतो, असे म्हणणे सोपे असते. राहुल गांधी तेच करत आहेत. ज्या राहुल गांधींना प्रसिद्ध अभियंते, ज्यांच्या जन्मदिनी ‘भारतीय अभियंता दिन’ साजरा केला जातो, देशातील कित्येक प्रकल्पांची निर्मिती ज्यांनी केली त्या मोक्षगुंडमविश्वेश्वरैय्या यांचे नावही व्यवस्थित घेता आले नाही, ते मोदींना गप्प करण्याची भाषा करतात. राहुल गांधींना संसदच का हवी आहे, मोदींना गप्प करण्यासाठी? त्यांच्याकडे अन्य कुठलेही माध्यमनाही का? की इतरत्र कोणी गंभीरपणे घेण्याची शाश्वती नाही, म्हणून राहुल गांधी असे बोलत आहेत? १५ मिनिटांत राहुल असे काय बोलणार आहेत? हे प्रश्न विचारावेसे वाटतात. राहुल गांधी त्याची उत्तरे देतील का?
@@AUTHORINFO_V1@@