Tech भारत : कुठे नेऊन ठेवेल 5G तंत्रज्ञान ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018   
Total Views |


 
तंत्रज्ञान क्षेत्र हे आजच्या युगातील प्रभावी क्षेत्र मानले जाते, यामुळे जागतिक स्तरावर अनेक बदल घडत असतात. एखादे नवीन तंत्रज्ञान जेव्हा विकसित होते, तेव्हा त्याचा प्रभाव कसा पडेल ? त्यामुळे जग कोणत्या दिशेला वाटचाल करेल ? हे ठरत असते. संवाद तंत्रज्ञान त्यात एक महत्वाची भूमिका बजावत असते, त्याचे महत्व जाणूनच या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड इकनॉमिक फोरमने 5G तंत्रज्ञानावर चिंतन केले आहे, त्यातून पुढे आलेल्या बाबींवर प्रकाश टाकणारा हा लेख.
 
 
मोबाईल तंत्रज्ञान आणि त्यामुळे बदलते जगत

मोबाईल तंत्रज्ञानात प्रत्येक पिढीत नवीन संशोधन होत आले आहे. परिणामी, प्रत्येक पिढीत त्याचे वेगवेगळे परिणाम झाले आहेत. पहिल्या पिढीच्या मोबाईल तंत्रज्ञानात अॅनालॉग व्हॉईस प्रणाली होती जी अतिशय खर्चिक आणि वापरताना अनेकवेळेला अडथळ्यांनी भरलेली असे. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील तंत्रज्ञान विकसित झाले जे डिजिटल व्हॉईस प्रणालीने प्रभावित होते, तसेच तुलनेने अधिक स्वस्त होते. हे तंत्रज्ञान अनेकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर 3G प्रणालीचा तिसऱ्या पिढीत उदय झाला ज्यामुळे इंटरनेटचा वापर, मोबाईल कम्प्युटिंग, मोबाईल अॅप्स या प्रणालींनी गती घेतली. 4G तंत्रज्ञानात याहून पुढे झेप घेत HD ऑडिओ, व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मिडीयाचा सुकर वापर या बाबींना पोषण मिळाले.
 
 
या पार्श्वभूमीवर 5G तंत्रज्ञानात याहून वेगळ्या अपेक्षा आज आहेत. ज्यात 4G तील अडचणी दूर करून व्यावसायिक वापरासाठी अधिक सुकर प्रणाली विकसित होऊन त्यासाठीचे पोषक वातावरण तयार व्हायला मदत होईल. भारत सरकारचा स्टार्ट - अप इंडिया प्रकल्प याच प्रणालीवर मोठ्या प्रमाणत विस्तारित होईल.
 
 
5G तंत्रज्ञान

कुठलेही तंत्रज्ञान विकसित होताना एक विशिष्ट कालावधीची आवश्यकता असते. आज आपल्या खिशात मोबाईलच्या स्वरुपात एक छोटे कम्प्यूटर आहे, त्याचे श्रेय गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना जाते. त्याचप्रमाणे 5G तंत्रज्ञान विकासित होताना या स्वरूपाची कामगिरी जगाला अपेक्षित असेल.
 
 
ई-कॉमर्स, मॅपिंग, जलद आणि सुरक्षित पेमेंट गेट-वे याचा प्रभावी उपयोग 5G तंत्रज्ञानात होईल. एक अशा विश्वाची आपण कल्पना करू शकतो जेथे वाहने मॅपिंग तंत्रज्ञानाच्या आधारावर धावतील, तेव्हा चालक शिवाय चालणाऱ्या कार सहज उपलब्ध असतील. वैयक्तिक मेडिकल उपकरणे असतील जेथे सामान्य आजारांवर चिकित्सा केली जाईल. वैद्यकीय उपकरणांचा दैनंदिन जीवनात तसेच वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढेल, यातून अधिकाधिक स्वस्थ आणि निरोगी जीवनशैली विकसित होऊ शकेल. बाजारपेठेत सुरु असलेल्या ट्रेंड्सबद्दल लोकांना योग्य सल्ले मिळून त्यात बेस्ट-फिट (सर्वोत्तम उपलब्धता) असलेल्या वस्तूंची माहिती देणाऱ्या मोबाईल अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढेल.
 
 
या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वाढणे देखील अपेक्षित आहे. त्याचबरोबर सर्व कनेक्शन्स अधिकाधिक सुराक्षित तसेच जलद होण्याची देखील अपेक्षा आहे. आजचा मोबाईल तंत्रज्ञानाचा प्रभाव पाहता येणारे 5G तंत्रज्ञान हे ऑटोमोबाईल, वैद्यकीय, वास्तुनिर्माण, आपत्कालीन सेवा, रिटेल बाजारपेठ यांसारख्या प्रत्येक क्षेत्राला प्रभावी करेल. किंबहुना या सर्व क्षेत्रांनी मोबाईल तंत्रज्ञाचा प्रभावी वापर करावा यासाठीच 5G तंत्रज्ञान विकसित केले जाईल.
 
 
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@