कोण आहेत स्वामी असिमानंद .....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018   
Total Views |

 
'स्वामी असिमानंद' हे नाव गेल्या ८-९ वर्षापासून चर्चेत आहे. तथाकथित हिंदू दहशतवादाच्या मालिकेत असिमानंद यांना देखील अडकवण्याचा मोठा प्रयत्न झाला. मात्र शेवटी सत्य जगासमोर आले. स्वामी असिमानंद यांच्याविरोधात पुराव्याच्या अभावामुळे त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. हैदराबाद येथील मक्का मशीद स्फोट, अजमेर दर्गा स्फोट, समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोट या घटनांमध्ये स्वामी असिमानंद यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या सर्वातून ते 'पुराव्याच्या अभावी' निर्दोष मुक्त झाले. यात पुराव्याच्या अभावी हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण त्यांच्याविरोधात कुठलेही पुरावे मिळू शकलेले नाहीत.
 
 
अशा या असिमानंद यांच्याबद्दल माध्यमांमध्ये अनेकानेक चर्चा ऐकायला मिळतात. थेट दहशतवादी ठरविण्याचा अनेकांचा प्रयत्न असफल करणाऱ्या या व्यक्तिमत्वाच्या एकूण जीवनाबद्दल आपण जाणून घेऊयात.
 
पूर्वाश्रमीचे असिमानंद

स्वामी असिमानंद यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील हूगळी जिल्ह्यातील कामार्पुकुर येथे झाला आहे. संन्यस्थ जीवन अंगीकारण्यापूर्वी त्यांचे नाव जतीन चॅटर्जी असे होते. ओमकारनाथ या नावाने देखील ते ओळखले जात. त्यांचे वडील बिभूतीकुमार सरकार हे स्वातंत्र्य सेनानी असून, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरुंगवास पत्करला होता. ७ भावंडांपैकी एक असलेले असिमानंद यांनी भौतिकशास्त्रात एम. एस्सी. पर्यंतचे शिक्षण, पश्चिम बंगाल येथील बर्धमान विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
 
 
कामार्पुकुर हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे तेथे रामकृष्ण मिशनचे मोठे कार्य प्रस्थापित आहे. असिमानंद देखील त्या कामात जोडले गेले. त्यामाध्यमातून त्यांनी नागालँड, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम येथे अनेकवर्षे वनवासी क्षेत्रात सेवा काम केले. त्यांचे गुरु स्वामी परमानंद यांनी त्यांना असिमानंद हे नाव दिले. त्यानंतर ते याच नावाने ओळखले जाऊ लागले.
 
 
वनवासी समाजाची सेवा

स्वामी असिमानंद हे मुख्यत्वे वनवासी क्षेत्रात सेवा काम करण्यासाठी ओळखले जातात. वनवासी जाती, जमातींना हिंदुत्वाशी जोडून ठेवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्राण्यांची बळी देणे, यांसारख्या वनवासी जमातींतील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचे देखील मोठे काम त्यांनी केले आहे. असिमानंद यांच्याशी जोडले गेलेले अनेक वनवासी कुटुंबीय आजही मांसाहाराचे सेवन वर्ज्य मानतात. त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे भक्तीभावाचे वातावरण रुजवत असतात. ज्यामुळे अनेक वनवासी बांधव त्यांच्याशी जोडले जाऊ लागले. वनवासी समाजातून मतांतरण होण्याचे प्रमाण देखील यामुळे मोठ्याप्रमाणात घटले.
 
 
वनवासी समाजाची सेवा करण्याचे मुख्य ध्येय असलेल्या असिमानंद यांनी यासाठी अनुकूल त्या प्रत्येक संघटनेची मदत घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध जोडला जात असला तरी देखील, त्यांनी सलग राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम केलेले नाही. संघ परिवारातील वनवासी कल्याण आश्रम या वनवासी क्षेत्रात सेवाकार्य करणाऱ्या संघटने सोबत त्यांनी काम करायला सुरु केले. १९८८ साली त्यांनी अंदमान निकोबार बेटांतील वनवासी समाजात काम सुरु केले. तेथे लहान झोपड्या तयार करून त्यांनी काम सुरु केले. सहज वनवासी लोकांसोबत जाऊन राहणे, त्यांच्यासोबत जेवण करणे, अनेक कथा, भजन, गीत, सेवाकार्य यांच्यामाध्यामातून ते लोकांना संघटीत करत असत. आजही दक्षिण अंदमानमध्ये स्वामी असिमानंद यांनी स्थापन केलेल्या हनुमानाची मूर्ती तेथे स्थित आहे.
 
 
अंदमान निकोबार येथे काम केल्यानंतर त्यांनी काही काळ झारखंड आणि महाराष्ट्रात काम देखील काम केले. १९९० च्या दशकात ते गुजरातमधील डांग जिल्ह्यात आले. आणि त्यानंतर तेथेच मोठा काळ स्थिरावले. डांग जिल्ह्यातील वनवासी समाजात आजही अनेक कुटुंबीय हे स्वामी असिमानंद यांचे अनुयायी आहेत. याचे मूळ कारण म्हणजे असिमानंद यांनी केलेले सेवा आणि धार्मिक कार्य. रामायणातील शबरी डांग जिल्ह्यातील होती, असे असताना स्वामी असिमानंद यांनी शबरीमातेचे मोठे मंदिर व्हावे म्हणून संपूर्ण परिसरात १९९८ साली लोक चळवळ सुरु केली. डांग जिल्ह्यातील सुबीर येथे शबरीधाम व्हावे म्हणून, गुजरातमधील डांग, तापी, सुरत, नर्मदा तसेच महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांतून त्यांना मोठ्याप्रमाणात वनवासी समाजाचा प्रतिसाद मिळत गेला.
 
 
परंतु या कामाला तेथील स्थानिक ख्रिश्चन मिशनर्यांनी मोठा विरोध केला होता. स्वामी असिमानंद यांची वाढती जाणारी लोकप्रियता, शबरीधाम तयार करण्याचे प्रयोजन, म्हणून स्थानिक वनवासी समाजाचे ख्रिश्चन मिशानार्यांकडे जाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे तेथे विरोध केला जात होता. त्यावेळी माध्यमांमध्ये देखील असिमानंद यांची चर्चा सुरु झाली होती. परंतु या सर्वाची तमा न बाळगता, वेळी धोका पत्करून त्यांनी शबरीधामसाठी कार्य करणे सुरु ठेवले. त्यांना स्थानिकांचा मोठ्याप्रमाणात पाठींबा होताच. ते काम लोकसहभागातून पूर्ण झाले, आज शबरीधाम हे वनवासी समाजासाठी एक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
 
 
२००६ साली याच धर्तीवर शबरी कुंभाचे आयोजन हे स्वामी असिमानंद यांच्या मुख्य सहभागातून करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण भारतभरातून वनवासी बांधव एकत्र आले होते. माता शबरी प्रती अपार श्रद्धा असलेल्या वनवासी समाजाच्या या भव्य एकत्रीकरणामुळे तेथे अनेक विकासाची कामे देखील स्थानिक सरकार तर्फे करण्यात आले होते.
 
 
सुबीर येथे असलेले स्वामी असिमानंद यांचे आश्रम आजही सर्वांसाठी खुले असते, तेथे कुठल्याही जाती, पंथ, समुदायातील व्यक्तीचे स्वागतच होते. स्थानिक वनवासी समाजाकडून ते चालवले जाते. तेथे माता शबरीचे भव्य मंदिर आणि स्वामी असिमानंद यांनी उभारलेल्या कामातून स्थानिकांचा स्नेह, हे मिळवून मन सुखावल्यासारखे होते.
 
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@