जागतिक वारसा दिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018   
Total Views |





१८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगभरातील अनेक वारसास्थळे, स्मारके यांबाबत सर्वांना माहिती व्हावी, त्यामुळे विभिन्न संस्कृतीची ओळख व्हावी, अशा स्मारकाचे तसेच संस्कृतीचे संरक्षण व्हावे ह्या हेतूने स्मारके व वारसास्थळे यांच्या आंतरराष्ट्रीय समितीने १९८२ साली हा दिवस घोषित केला ज्याला UNESCO ने मान्यता दिली. अभिमानाची गोष्ट आहे की, United Nations Educational, Scientific and Cultural Organization म्हणजे UNESCO ने जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित केलेल्या स्थळांपैकी भारतामध्ये अशी ३६ स्थळे आहेत. आणि यामुळे वारसास्थळांच्या जगाच्या क्रमवारीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. ह्या ३६ स्थळांपैकी ७ नैसर्गिक, २८ सांस्कृतिक आणि एक मिश्र स्वरूपाचे स्थळ आहे. भारताला निसर्ग आणि संस्कृतीचा असा उच्च वारसा लाभला आहे. आपली वने, सरोवरे, नद्या आणि वन्य जीवसृष्टी यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणे, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ही आपली मूलभूत कर्तव्ये आहेत. आणि अशी माहिती असणं, आपल्या पुढच्या पिढीला करून देणं आणि त्यायोगे त्यांचं संवर्धन करणं हे आपलं एक मूलभूत कर्त्यव्यही आहे. अर्थात आजचा दिवस हा मानवनिर्मित वारशांसाठी साजरा केला जातो. ह्यावर्षीच्या वारसादिनाची थीम आहे “पिढ्यांसाठी वारसा” त्यानिमित्ताने अशाच काही मानवनिर्मित स्थळे आणि स्मारकांची ओळख करून घेऊयात.


१. आग्र्याचा किल्ला आग्र्यामध्ये ताजमहालापासून जवळच असलेल्या यमुनेच्या काठावर असलेला हा किल्ला मुघल बादशहा अकबराने इसवी सन १५६५ मध्ये बांधला. सुमारे ९४ एकरांमध्ये बांधलेला ह्या किल्ल्याला चार मोठे दरवाजे आहेत.




२. अजिंठा लेणी – महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा दगडात कोरलेल्या बुद्ध लेण्या ह्या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन ४८० ते ६५० व्या शतकापर्यंत बांधण्यात येत होत्या. यामध्ये भगवन बुद्धाच्या जीवनातील तसेच जातक कथांमधील प्रसंग चितारले आणि कोरले आहेत.



३. वेरूळ लेणी ही औरंगाबाद शहरापासून ३० कि. मी. अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध  लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण ३४ लेणी आहेत. यामध्ये १२  बौद्ध (लेणी क्र. १ - १२), १७  हिंदू (लेणी क्र. १३ - २९) आणि ५  जैन (लेणी क्र. ३० - ३४) लेणी आहेत.





४. ताज महल मुघल बादशहा शाह जहानने इसवी सन १६३२ ते १६४८ दरम्यान आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधलेला संगमरवरी ताजमहाल आज जगभरातील प्रवाशांचे आकर्षण आहे.





५. महाबलीपुरम येथील वारसास्थळ समूह सातव्या आणि आठव्या शतकामध्ये पल्लव राजांनी येथे सर्वांगसुंदर असे दगडातील मंडप आणि रथ मंदिरे बांधली आहेत. तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० किमी अंतरावरील हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे सातव्या शतकापर्यंत महत्त्वाचे बंदर होते.



६. कोणार्कचे सूर्यमंदिर कोणार्क सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. १२३६ - १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावमध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. हे मंदिर पुरी पासून ३५ कि.मी तर भुबनेश्वर पासून ६५ कि.मी आहे. प्रचंड आकाराची बारा चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे. येथे असलेली सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्या सूर्यमंदिरात दिसत नाही. गाभारा व जगमोहन यांच्यापुढे नटमन्दिर हा स्वतंत्र मंडप आहे. या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेल्या आहेत.



७. गोव्यातील चर्च जुन्या गोव्यातील १६ व्या आणि १७ व्या शतकात बांधलेली काही चर्च ही जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहेत.



८. फत्तेपूर सिक्री आग्र्याच्या जवळ सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात अकबराने बांधलेलं हे शहर साधारण १० वर्षे मुघलांची राजधानी होतं. बुलंद दरवाजा, दिवाने-आम, दिवाने-खास, सलिम खिस्ती चा दर्गा ह्या प्रेक्षणीय वास्तू आहेत.



९. हम्पी येथील वारसास्थळे समूह मध्य कर्नाटकात बेल्लारी जिल्ह्यात असलेले हंपी ही वैभवशाली विजयनगर साम्राज्याची चौदा ते १६ व्या शतकामध्ये राजधानी होती. भारताच्या आणि हिंदूंच्या उच्च सांस्कृतिक कलेचा हंपी हा एक उत्कृष्ठ नमुना आहे. हंपीमध्ये निरनिराळे मंडप, मंदिरे, खांब, दरवाजे, संगीत ध्वनित होणारे खांब, रथ मंदिर अशा स्थापत्यातील अनेक आश्चर्यकारक प्रत्येक भारतीयाने भेट देऊन अवश्य अनुभवण्यासारख्या आहेत.



१०. खजुराहो समूहइसवी सन पूर्व ९०० ते ११३० दरम्यान चंडेल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समुहासाठी हे ठिकाण त्याच्या कलात्मक शिल्पाकामासाठी प्रसिद्ध आहे.



११. एलिफंटा लेणी मुंबईजवळ अरबी समुद्रातील बेटावर हिंदू आणि बौद्ध मूर्त्यांचं कोरीव काम असलेली घरापुरीची लेणी म्हणून प्रसिद्ध आहे.



१२. चोळ राजांची मंदिरे - चोळ राजांच्या साम्राज्यात  तमिळ राष्ट्राने कला साहित्य आणि धर्म ह्या क्षेत्रात प्रगतीचे उच्च शिखर गाठले. पल्लवांच्या राज्यात आरंभ झालेल्या सांस्कृतीक आंदोलनाचे आपले शिखर चोळांच्या शासनात गाठले. भारतात ह्या पूर्वी कधीही न झालेल्या शिल्पकला, वास्तूकला आणि धातूपासून पुतळ्यांची निर्मितीस प्रारंभ झाला आणि भारतीय इतिहासात एका नव्या पर्वाने प्रारंभ केला.पल्लवांच्या शासनात सुरु झालेल्या भव्यदिव्य देवळांची निर्मिती तशीच चालू ठेवत चोळ राज्यकर्त्यांनी त्यात अधिक भर घालून द्राविडी वास्तूशिल्प कलेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. तंजावुर येथील शिवाचे देऊळ, गंगैकोण्डचोळपुरम येथील गंगैकोण्डचोळीश्वरमचे देऊळ, तंजावुर येथील बृहदेश्वराचे देऊळ, दारासुरम येथील ऐरावतेश्वराचे देऊळ ही आवर्जून पाहण्यासारखी आहेत.



१३. कर्नाटकातील पट्टदकल येथील मंदिरे - ही सातव्या आणि आठव्या शतकात चालुक्य साम्राज्याने बांधलेली आहेत. हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. हे खेडे बदामीपासून २२ किलोमीटर व ऐहोळेपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथील ऐतिहासिक मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी - फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात. ही मंदिरे भारतीय द्राविड आणि नागर या दोन्हीही स्थापत्यशैलीत आहेत.
१४. सांची येथील बौद्ध स्तूपभारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील सांची गावातील एक बौद्ध स्तूप आहे. सांची हे भोपाळपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. सांचीचा स्तूप हा मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेला आहे.


१५. हुमायून कबर - ही मुघल बादशहा  हुमायूँ याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे.

१६. कुतुबमिनार आणि इतर वास्तू - ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण  दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे.१३ व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरूवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. ह्या परिसरात पुर्वी २७ हिंदू आणि जैन मंदिरे होती. ही मंदिरे उध्वस्त करून हा कुतुब मिनार लाल दगडानी बांधलेला आहे. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात पहायला मिळतात. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. मिनारासमोर प्राचीन असा लोहस्तंभ आहे. तिसऱ्या आणि चौथ्या शतकात चंद्रगुप्त राजाने निर्माण केलेला हा ७ मीटर उंचीचा भगवान विष्णूला समर्पित असा हा स्तंभ आहे. त्यावर संस्कृत लेखन आहे.



१७. भारतामधील पर्वतीय रेल्वेकालका − सिमला रेल्वे, दार्जीलिंग हिमालयन रेल्वे आणि निलगिरी पर्वतीय रेल्वे ह्या हिमालय आणि निलगिरी पर्वतातील रेल्वे म्हणून जागतिक वारसास्थळांमध्ये नमूद आहेत.

१८. महाबोधी विहार - हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (सं बोधी / बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध’ बनले, व ‘ बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे.



१९. भीमबेटका - हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे. भोपाळ पासून ४५ किमी अंतरावर आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे. यांपैकी तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी इसवी सनपूर्व ३०,००० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते. ही भित्तिचित्रे भारतातली सर्वात प्राचीन भित्तिचित्रे समजली जातात.



२०. चंपानेर पावगढ २००४ मध्ये सूचीमध्ये दाखल केलेलं हे गुजराथमधील एक पुरातत्व उद्यान आहे. आठव्या ते चौदाव्या शतकातील मंदिरे, इमारती, किल्ले इ. अनेक वस्तूंचे अवशेष तेथे आहेत.

२१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - आधीचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.



२२. लाल किल्ला - हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला आहे.  मुघल सम्राट शाहजहानने ह्या किल्याला इ.स. १६३८ साली बाधण्यास सुरुवात केले व तो इ.स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा जगातील भव्य राजवाड्यापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचे घनिष्ट संबंध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती.



२३. जंतर मंतर १८ व्या शतकात जयपूरमध्ये खगोलनिरीक्षणासाठी बांधण्यात आलेल्या २० उपकरणांच्या समूहाला जंतर मंतर असे नाव आहे. उपकरणे आणि त्यांतून मिळणारी स्थळ, काळ, वेळेची तसेच खगोलशास्त्रीय घटनांची, ग्रह ताऱ्यांची निरीक्षणे ही भारताच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष आहेत.

२४. राजस्थान मधील किल्ले २०१३ मध्ये जागतिक वारसास्थळांच्या सूचीत चितोडगढ, कुम्भलगढ, सवाई माधोपुर, जलौर, जयपूर आणि जैसलमेर हे किल्ले दाखल केले गेलेले आहेत.



२५. राणीची विहीर - पाटण, गुजराथ येथील सरस्वती नदीच्या काठावर असलेली रानी की वाव नावाने सुप्रसिद्ध असलेली पायऱ्यांची विहीर आहे. तिला २०१४ मध्ये युनेस्कोकडून मान्यता मिळाली आहे. १०६३ मध्ये सोलंकी राजवटीचे राजा भीमदेव प्रथम यांनी आपली पत्नी राणी उदयमती हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही विहीर बांधलेली आहे. २७ मीटर खोल आणि पायऱ्या असलेली विहीर ही वास्तुकलेचा अद्भुत चमत्कार आहे.



२६. नालंदा विश्वविद्यालय - हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षणकेंद्र होते. नालंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. सद्यस्थितीत तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव नलविहार असे होते. विश्वविद्यालयात १०००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यांतले ३००० तर विश्वविद्यालयाच्या वसतीगृहात रहात होते. विश्वविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांत चीन,कोरिया व तिबेट येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वारपरीक्षा घेतली जात असे. अभ्यासक्रमात हीनयान व महायान पंथाच्या तत्त्वज्ञानाबरोबरच  वेदाध्ययन,  अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, धर्मशास्त्रे, ज्योतिष, व पाणिनीसूत्रे या विषयांचा समावेश होता. बौद्ध व पाणिनीच्या सूत्रसंग्रह अभ्यासाला विशेष महत्त्व होते. शीलभद्र हे विश्वविद्यालयाचे मुख्य आचार्य (कुलगुरू) होते आणि धर्मपाल, जिनमित्र, प्रभामित्र व चंद्रपाल, शांतरक्षित, आतिश, आर्यदेव, ज्ञानचंद्र व वसुबंधू आदी विविध विषयातील तज्‍ज्ञ आचार्य अध्यापनाचे कार्य करीत होते. विश्वविद्यालयात एकूण १५७० अध्यापक होते. विश्वविद्यालयाच्या विविध सभागृहांत रात्रंदिवस वादविवाद, परिसंवाद, प्रश्नोत्तरे व चर्चासत्रे चालत.



२७. कॅपिटल इमारत संकुल चंदिगढच्या सेक्टर हाली कोर्बूजिएने केलेला स्थापत्यशास्त्राचा आधुनिक अविष्कार आहे. ह्यामध्ये तीन इमारती, तीन स्मारक आणि एक तलाव अंतर्भूत आहेत. २०१६ साली युनेस्कोने ह्या संकुलाला मान्यता दिली आहे.


२८. अहमदाबाद - युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची २६ सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.

अर्थातच ह्यामध्ये अजून आसाममधील काझिरंगा अभयारण्य, प. बंगालमधील सुंदरबन अभयारण्य अशी वन्यजीवसृष्टीने समृद्ध अशी ठिकाणेही आहेत. आज जागतिक वारसादिनाच्या निमित्ताने ही "मानवनिर्मित" स्थळे आठवताना तितकीच महत्त्वाची भारतीय पुरातत्व विभागाचीही अनेक स्थळे आणि स्मारके आठवत आहेत. "माझ्या देशावर माझे प्रेम आहे। माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।“ ही आपल्या प्रतिज्ञेतील वाक्ये प्रकर्षाने आठवत आहेत.

- विभावरी बिडवे 
@@AUTHORINFO_V1@@