सांस्कृतिक मार्क्सवाद भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018   
Total Views |



 

पूर्वार्धात सांस्कृतिक मार्क्सवादाची पार्श्वभूमी आणि इतिहास मांडला होता. परंतु त्या पार्श्वभूमीसोबत त्याचं 'प्रॅक्टिकल अप्लिकेशन' हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि हे अप्लिकेशन महत्वाचं असल्याचं कारण म्हणजे आपल्या समाजात, संस्कृतीत ह्या मर्क्सवादाने केलेला शिरकाव.


आपल्या रोजच्या जीवनात हे इतकं खोलवर शिरू पाहतंय की, आपण त्याचं बेमालूमपणे अंग होत चाललो आहोत. मात्र त्याआधी ह्या विचारसरणीशी निगडित असलेल्या थिअरीज बद्दल थोडं काही.


कोणत्याही विचारसरणी मागे काही मार्गदर्शक थिअरीज असतात. त्या थिअरीजच्या आजूबाजूला त्यांच्या अनुयायांच्या सर्व कृती वा ऍक्शन प्लान्स असतात. सांस्कृतिक मार्क्सवादाशी संबंधित दोन तीन थिअरीज इकडे लक्षात घ्यायला हव्यात. विचारी मनुष्याला त्यामागचे हेतू लगेच ध्यानात येतीलच.


पहिली आहे 'क्रिटिकल थिअरी'.


क्रिटिकल थिअरी हा विचार सांस्कृतिक मार्क्सवाद्यांनी पुढे आणलेला एक मुख्य विचार आहे. प्रस्थापित सत्यांना कोणत्याही पुराव्याशिवाय आणि कोणत्याही विचाराशिवाय केवळ खोटं ठरवणं, ही क्रिटिकल थिअरी आहे. त्याला काहीही पाया, कोणतंही संशोधन असायची गरज नाही. फक्त गरज आहे त्याला खोटं ठरवणाऱ्यांची एक टोळी उभी करायची आणि खोटं सर्वदूर पसरवायचं. शंभर वेळा असत्याचा प्रचार केला तर जनसामान्यांना ते सत्य वाटायला लागतं. फक्त टीका करत राहणं ही क्रिटिकल थिअरीची सोपी संज्ञा आहे. काही वृत्तपत्राचे अग्रलेख ह्याचं तंतोतंत पालन करताना दिसतात. जगात, राजकारणात, देशात त्यांना सकारात्मक असं काहीही दिसतच नाही. क्रिटिकल थिअरीचा त्यांच्या मानसावर झालेला हा परिणाम असतो.
 
 
'पोलिटिकल करेक्टनेस' हा एक डाव्यांचा आणखी एक आवडता विषय आणि हीच दुसरी थिअरी. आहे ते सत्य ते अडचणीचे होईल ह्याची जाणीव झाल्यामुळे ते लपवून असत्याला न्यायाचा मुलामा द्यायचा, हा त्यामागचा हेतू. बहुसंख्य समाजाची बाजू न घेता ज्यांच्याद्वारे राष्ट्र फोडता येईल अश्यांची बाजू लढवत राहायचं. सोपं उदाहरण - काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाबद्दल एकही ब्र उच्चारायचा नाही, उलटपक्षी अतिरेक्यांना मदत करणाऱ्या काश्मीरी लोकांची बाजू लढवायची.
 
 
'सोशल जस्टीस' किंवा सामाजिक न्याय ही एक संज्ञादेखील डाव्यांनी चलनात आणली. सोशल जस्टीस म्हणजे नेमकं काय ह्याचं उत्तर अजूनही कोणी ठामपणे देऊ शकत नसल्यामुळे ह्या संज्ञेची व्याप्ती त्यांनी फार मोठी करून ठेवली. कामगारांचा लढा, स्त्री-मुक्ती, आर्थिक समानता, सामाजिक समानता, समलिंगी लोकांचे हक्क इथपासून ते विस्थापितांचा लढा इथपर्यंत जी काही म्हणून आंदोलनं झाली ती सगळी ह्या संज्ञेत समाविष्ट करण्यात आली. वरकरणी वाचायला हे कितीही न्याय्य वाटलं तरी त्यातला अंतःस्थ हेतू फूट पाडणे किंवा दुफळी माजवणे हाच होता. भारताच्या बाबतीत त्याला विकास कामांना किंवा कोणत्याही बदलाला खीळ लावण्यासाठी वापरलं गेलं. आपल्या दुर्दैवाने अश्या चळवळींना आणि तथाकथित 'सोशल जस्टीस व्हॉरीयर्स' ना इतकं ग्लॅमर प्राप्त झालं की, सत्य आणि न्याय्य असं सर्वकाही दडपून टाकण्यात आलं. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी केलं गेलेलं आंदोलन हे ह्याचं उत्तम उदाहरण आहे. आंदोलनकर्मी आणि आंदोलनालाच इतकं ग्लॅमर मिळालं की प्रकल्पग्रस्तांना मिळालेली भरपाई ही न्याय्य असूनदेखील प्रकल्प रखडला. खोट्या आंदोलनापायी विकासाला खीळ कशी घातली जाऊ शकते ह्याची ही एक अगदी नजीकची कथा.
 
 
कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाजाचं एक अविभाज्य अंग आहे. गेली शेकडो हजारो वर्षं आपला समाज ह्या व्यवस्थेवर तरून राहिला आहे. अडीअडचणीला सर्वसाधारण मनुष्य, देव पर्यायाने धर्म आणि कुटुंब ह्या दोन गोष्टींच्या आश्रयाला जात असतो. मग त्या दोन्ही गोष्टी लयाला न्यायचा जोरदार प्रयत्न मार्क्सवाद्यांनी केला. दुर्दैवाने त्यांचे काही प्लान्स यशस्वी देखील होताना दिसताहेत.
देश बुडवायचा असल्यास त्याची सुरवात कुटुंबापासून करावी लागते हे डाव्यांनी जबरदस्त ताडलं आहे आणि त्याची सुरवात त्यांनी फार नियोजितपणे केली.
 
 
एकत्र कुटुंब पद्धती जी आपल्याकडे वर्षानुवर्षे रुजली होती तिला धक्का द्यायचं पाहिलं काम ह्यांनी केलं. त्यांचा अजेंडा राबवायला तथाकथित पुरोगामी विद्रोही साहित्य आणि चित्रपट हे प्रकार होतेच.
 
 
साधी गोष्ट बघा, चित्रपट हे माध्यम सर्वसामान्यांच्या आयुष्याचा आरसा असतो असं बिंबवलं गेलं आणि त्याच चित्रपटात वेश्यागमन हे सर्रास दाखवलं गेलं. वेश्यांना विरोध वगैरे हा विषय इकडे नाहीये पण जी गोष्ट सामान्यांच्या आयुष्यात कधीही घडत नाही तीच चांगली असल्याचं वारंवार दाखवलं गेलं.अगदी तसंच टीव्हीवरच्या सिरियल्समध्ये विवाहबाह्य संबंध हे कॉमन केले गेले. कुटुंबव्यवस्था ही सर्वतोपरी बुडवून मध्यमवर्गीय माणसाची उपयुक्तता कमी करणं हा छुपा हेतू पुढे व्हायला लागला.
 
 
माध्यमांमधून, लोकांसमोर येणाऱ्या साहित्यातून कुटुंबाशी संबंधित असलेल्या संज्ञा हळूहळू बदलायला सुरवात झाली. वडील ह्या शब्दाची जागा बाप ह्या शब्दाने घेतली. बाप हा कायम कठोर, आततायी, निर्दयी आणि जुलुमी दाखवायला सुरवात झाली. तर आई ही मनोरुग्ण, अधीर, थोडी बुद्धू ह्या प्रकारात रंगवली गेली. आई आणि वडील ह्यांच्याबद्दल नकारात्मक विचार पसरले की मग कुटुंब ह्या व्यवस्थेला काहीच अर्थ राहत नाही. हे नैराश्य वाढत गेलं की, घटस्फोटाचं समर्थन केलं जातं. सिनेमातून आईवडील हे नातं जवळपास नाहीसं झाल्याचं निरीक्षण फेसबुक पोस्टमध्ये एकदा कुणीतरी लिहिलं होतं. त्याचं कारण समजायला हरकत नाही.
 
 
सांस्कृतिक मार्क्सवादातल्या क्रिटीकल थिअरीचं काम समाजात सांस्कृतिक नैराश्य पसरवणे हे आहे. आपली संस्कृती ही किती मागास आहे हे सतत बिंबवून त्यापासून तोडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. होळी दिवाळीपासून इतर कोणतेही सण, कोणत्याही प्रथा पाळणं हे प्रतिगामी असल्याचं लक्षण आहे हे इतकं बिंबवलं जातंय की, आजच्या तरुणांना ते अगदी खरं वाटायला लागलं आहे. इतिहास लेखनाला विशिष्ट पद्धती प्राप्त झाल्यावर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी भारत हा मागास देश असून भारतीय संस्कृती अतिमागास असल्याचा प्रसार जगभर केला. त्याचीच री आताची माध्यमं ओढताहेत, पद्धत फक्त बदलली आहे.
 
 
आजतागायत वेगवेगळ्या समाजाच्या ज्या काही समजुती होत्या त्या केवळ खोट्या असून सत्य काही वेगळंच आहे, हे बिंबवायचा प्रयत्न ह्या चळवळीने केला. ह्या समजुती असत्य मानल्या तर मग सत्य काय आहे ह्याचं उत्तर ह्या मार्क्सवादी लोकांकडून अपेक्षित होतं. पण त्यांच्या मते त्यांना जे वाटत होतं ते आणि तेच सत्य होतं. ते सत्य आहे असं सिद्ध करायची त्यांना गरज वाटली नाही. आणि ज्यांनी म्हणून त्यांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला त्यांना शक्य त्याप्रकारे डाव्यांनी संपवून टाकलं. इतिहासापासून अगदी वर्तमानात मॉस्को, बीजिंग, केरळ ते पश्चिम बंगाल सर्व ठिकाणी काळ ह्याचा साक्षीदार आहे.
 
 
समाजात दुफळी माजवणे हा सामाजिक स्तरावरचा कम्युनिस्टांचा दुसरा डाव आहे. समाजात वेगवेगळे गट पाडून त्यांना एकमेकांविरुद्ध उभं करणं, त्यांच्यात दुफळी माजवणं, अनावश्यक गोष्टींना महत्त्व आणून दोन धर्म, दोन जाती, दोन गट एकमेकांविरुद्ध कसे उभे करता येतील हे त्यांनी कायम पाहिलं आहे.
 
 
हे करण्यासाठी मग असहिष्णुता वगैरे भारतीय समाजात कधी ऐकले न गेलेले शब्द अश्यावेळी समाज माध्यमात पेरले जातात. जुलूमाचाच इतिहास असलेल्यांचा उदो केला जाऊ लागतो. अफझल खान हा क्रूरकर्मा वाटायचं बंद होतो, महिषासुराचा उत्सव साजरा केला जाऊ लागतो. अगदी फार जवळचं उदाहरण म्हणजे अल्लादिन खिलजीचं इतकं ग्लॅमर पसरवायला सुरवात झालीय की, तोही आता लोकांना भुरळ घालू पाहतोय. वाईटाबद्दल आकर्षण निर्माण व्हायला लागतं आणि समाज हळूहळू मार्जिनलाईझ व्हायला लागतो. डाव्यांनी हवं ते साध्य करायला सुरवात केली ती अशी.
 
 
गंमत म्हणचे ज्या डाव्यांनी संस्कृतिक मार्क्सवाद फार सहजपणे इतर देशांमध्ये पसरवला त्या कम्युनिझमच्या पुरस्कर्त्या देशांनी मात्र ह्यातलं एकही तत्त्व पाळलं नाही. ना एखादा अल्पसंख्यांक त्यांचा कधी पंतप्रधान झाला ना समान वागणुकीचा अधिकार तिकडे सामान्यांना मिळाला. आपल्या देशातले डावे नेते आणि पत्रकार मात्र तिकडे डोळेझाक करत त्या देशांतर्फे पोपटपंची करत राहिले. एकीकडे होमोसेक्शुअल लोकांच्या हक्कासाठी त्यांना पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे अतिमागास इस्लामच्या चालीरीतींना पाठिंबा द्यायचा. थोडक्यात कोणतंही वैचारिक तत्त्व न बाळगता केवळ बहुसंख्य असलेल्या समाजाला येनकेन प्रकारेण विरोध करायचं एकमेव काम डाव्यांनी हातात घेतलं आहे.
 
 
सबव्हर्जन आणि सांस्कृतिक मार्क्सवाद ह्यातलं साम्य म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण त्या त्या गोष्टींच्या आहारी कसे कधी गेलोय हे समजतच नाही. ज्याप्रमाणे आपण सबव्हर्ट कधी झालो हे आपल्याला समजत नाही, त्याचप्रमाणे आपण सांस्कृतिक मार्क्सवादी झालो आहोत हे आपल्या स्वतःलाच समजत नाही. ज्या ज्या वेळी आपण आपल्याच सणांची निंदा करतो, टीव्हीवर, चित्रपटात दाखवलं जाणारं आपल्याला पटायला लागतं, नवविचारसरणी ह्या नावाखाली आपण अल्ट्रा फेमिनिझम, बेगडी सेक्युलरीझम, स्वीकारू लागतो त्यावेळी आपण सांस्कृतिक मार्क्सवादी झालेलो असतो.
 
 
फ्री सेक्स, न्यूडीटी, नशाबाजी ह्या गोष्टीना डाव्यांनी पाठिंबा दिला आणि दुर्दैवाने ह्या गोष्टींचं सहज आकर्षण असलेली तरुण पिढी फार सहजपणे त्यांच्या जाळ्यात फसत गेली आहे.


डाव्यांच्या चळवळीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे विचार पुरोगामी आणि उजवे सर्वच विचार प्रतिगामी हे बिंबवण्यात ते यशस्वी झालेत. देव धर्म संस्कृती हे ह्यावरचा विश्वास म्हणजे विज्ञानाशी शत्रुत्व ह्याचाही त्यांनी प्रचार फार यशस्वीरित्या केला आहे. फारसा विचार किंवा लॉजिकल रिझनिंग न करणारे तरुण 'पुरोगामी' ह्या शब्दाला भूल पडून फार लवकर 'वाममार्गाला' लागतात. कारवायांमधील सातत्य ही डाव्यांची खासियत आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण प्रतिसाद देत राहतो. मात्र त्यामागे असलेला मोठा कट लक्षात येईस्तोवर सर्वाला फार उशीर झालेला असतो.
 
 
मग ह्या सांस्कृतिक मार्क्सवादाचा विळख्यात न अडकण्यासाठीचा उपाय काय ? 'लॉजिकल रिझनिंग' हा सर्वात पहिला उपाय आहे. ज्या घटना देशात, समाजात घडताहेत असं मीडिया दाखवते त्या सर्व घटनांचं लॉजिकल रिझनिंग करणं आणि त्या मागचं सत्य समजावून घेणं. सत्य काय आहे हे समजल्याशिवाय त्यामागचा हेतू लक्षात येत नाही. म्हणून ते महत्वाचं आहे.
 
 
दुसरा उपाय म्हणजे, कोणत्याही तथाकथित पुरोगामी विचारांच्या माध्यमांच्या मतांचा लगेच स्वीकार न करता आपली बुद्धी लावणे. जे काही आपल्या देशातलं आहे ते सर्व आपलं आहे, त्यामागे काही विचार आहे हे लक्षात ठेवायला हवं. मॉडर्न विचार कितीही चांगला असला तरी तो देश विघातक असल्यास त्याज्यच असायला हवा.
 
 
तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही घटनेवर लगेच प्रतिक्रिया न देता त्याघटनेला उद्युक्त करणाऱ्या विचारांचा मागोवा घेऊन नंतरच प्रतिक्रिया नोंदवायला शिकायला हवं.
 


आज बरीच माध्यमं ही डाव्यांच्या हातात आहेत त्यामुळे मेनस्ट्रीम वृत्तपत्रात आणि बातम्यांमध्ये आपल्यासमोर जे काही येतं ते तसंच्या तसं स्वीकारण्यापेक्षा आपला थोडासा अभ्यासदेखील सत्यासत्य पडताळून पाहायला उपयोगी होतो.
 
 
सांस्कृतिक मार्क्सवाद हे सावकाश भिनत जाणारं विष आहे. ते ओळखायची आणि उपाय करायची हिच ती वेळ आणि हाच तो क्षण !
 
- सारंग लेले
@@AUTHORINFO_V1@@