बसवण्णा, वीरशैव लिंगायत आणि हिंदू धर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2018
Total Views |




न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने लिंगायत समाजाविषयी दिलेला अहवाल कर्नाटक सरकारने स्वीकारला आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म असून लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा द्यावा, अशी शिफारस आयोगाने केली. ती काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने केंद्र सरकाला पाठवली आहे. या पार्श्‍वभूमीवर राजकीय, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बाबींचा विस्ताराने विचार करणे गरजेचे बनले आहे.


बसवण्णा हेच लिंगायत धर्मसंस्थापक, लिंगायत आणि वीरशैव हे वेगवेगळे आहेत. पंचाचार्य हे वीरशैव आहेत. पंचाचार्य हे बसवोत्तर आहेत, आदी विविध तर्क काहीजण लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याच्या समर्थनार्थ मांडत आहेत. मात्र, त्याला कोणताही आधार नाही. विशेष म्हणजे बसवेश्‍वरांनी भारतीय समाजाचे आध्यात्मिक ऐक्य दृढ करण्यासाठीच भारतीय दर्शनांपैकी एक अशा प्राचीन वीरशैव मताचे पुनरुज्जीवन केले. शरण साहित्याच्या अभ्यासक जयदेवीताई लिगाडे म्हणतात, बाराव्या शतकात तत्कालीन समाजाची (विशेषत: हिंदूंचीच) विचारधारा व जीवनक्रम तेजोहीन आणि शिथिल बनला होता. उत्तरेकडे सतत होणार्‍या परकीय आक्रमणाचे भय व वर्णाश्रम धर्मांतील मूलभूत दोषांमुळे सर्वत्र फुटीरता वाढलेली होती. अशा पार्श्‍वभूमीवर हिंदू समाज एकसंध व एकजिनसी बनविण्याची नितांत आवश्यकता होती. याकरिता नव्या विचार प्रणालीची, आचारसंहितेची गरज होती. हे महान कार्य महात्मा बसवेश्‍वरांनी ‘वीरशैव’ या लिंगायत धर्माची (बसवधर्माची) स्थापना करून साधले.’’


संदर्भ : शून्य संपादन : शिवगण प्रसादी महादेव विरचित ‘शून्य संपादने’ या कन्नड पुस्तकाचा अनुवाद : जयदेवीताई लिगाडे, पृष्ठ 464.


बसवेश्‍वरांनी मांडलेले तत्त्वज्ञान त्यापूर्वी श्री रेणुकाचार्यांनी मांडले होते. (संदर्भ : श्रीसिद्धांत शिखामणी) पंचाचार्य हेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक होत. वीरशैव धर्म हे बसवपूर्व आहे, हे संशोधक डॉ. चिदानंद मूर्ती यांनी अनेकदा साधार सांगितले आहे. त्यांनी चर्चेचे आव्हान देऊनही ते कोणी न स्वीकारल्याने स्वतंत्र धर्म समर्थकांची भूमिका संशयास्पद आहे. आता मोठ्या प्रमाणातील संशोधन आणि पुरातत्त्व विभागाने दिलेल्या पुराव्यांनुसार वीरशैव धर्म बसवपूर्व आहे, हे सिद्ध झाले आहे. बसवण्णांचे अनुयायी असलेल्या विरक्त मठाधीशांनीही हे आता स्वीकारले आहे. त्यातच विरक्त परंपरेचे मेरुमणी यडियुरू सिद्धलिंगेश्‍वर यांनीही वीरशैव धर्माविषयी पुष्कळ उल्लेख केल्याचे इतिहासात दिसून येते.


बयरित्ती शिलालेख सन 1000, कक्केरी 1127, उद्रामी 1157, कोळ्ळुरू 1180, अम्मीनभावी


मठातील पत्र 1130, शिरनाळ 1187, अव्वेरहळ्ळी 1193, चौडदानपूर 1193 आदी शिलालेखांमध्ये रंभापुरी पीठाविषयी उल्लेख आहे. बागळी सन 1078, अव्वेरहळ्ळी 1093, मरडीपूर 1280 शिलालेखात उज्जयिनी पीठाविषयी सांगितले आहे.


सुप्रसिद्ध राजा जन्मेजयाचे ताम्रपट सन पूर्व 1500, मरडीपूर 1280 शिलालेख केदार पीठाच्या इतिहासावर प्रकाश टाकतात. पाणेम, गुंडाल, नडाल, हनुमकोंड, पालमपेट, बिजवाड, घंटामर आदी शिलालेखात श्रीशैल पीठाचा उल्लेख आहे. आणखी काशी पीठाविषयी सांगायचे तर जयनंद देव शिलालेख सन 574, जंगमपूर 631, नेपाळ जंगममठ 635 आदी शिलालेखांतून या पीठाविषयी स्पष्ट माहिती मिळते.


हिंदू विरोधी असलेल्या मोगलांनी काशी मठाला दिलेल्या सहाय्याचे दस्तऐवज आजही जंगमवाडी मठात उपलब्ध आहेत. तसेच वीरशैव धर्मसंस्थापक रेणुकादि पंचाचार्यांनी हिंदू संस्कृतीचे संरक्षण केले, हे आपण समजून घ्यायला हवे.


चन्नबसवण्णा, घट्टिवाळय्या, मरिमिंडदेवय्या, बाल बोम्मण्णा, अक्कनागम्मा, हाविनाळ कल्लय्या, अक्कमहादेवी, शिवयोगी सिद्धाराम, तोंटद श्री आणि बसवण्णांचे समकालीन ज्येष्ठ आदय्या, सकलेश मादय्या आदी शरणांनी आपल्या अनेक वचनांत भक्तिभावपूर्वक पंचाचार्यांचे स्मरण केले आहे.


सिद्धरामांचे सहकारी हाविनाळ कल्लय्या म्हणतात,


‘एन्न कतेयल्ली स्वायतवादनय्या शंकरदासिमय्यनु
एन्न करस्थलदल्ली स्वायतवादनय्या उरीलिंगपेद्दय्यनु
एन्न उरसेज्जियल्ली स्वायतवादनय्या घटिवाळ मुद्दय्यनु
एक अमळोक्यदल्ली स्वायतवादनय्या अजगण्णनय्यनु
एन्न मुखज्जेयल्ली स्वायतवादनय्या निजगुणदेवरू
एन्न शिखेयल्ली स्वायतवादनय्या अनिमिषदेवरू
एन्न प्राणदल्ली स्वायतवादनय्या एकोरामीतंदेगळु
एन्न जिव्हेयल्ली स्वायतवादनय्या पंडिताराध्यरु
एन्न नेत्रदल्ली स्वायवादनय्या रेवणसिद्धेश्‍वरदेवरु
एन्न त्वक्किनल्ली सिद्धरामेश्‍वरदेवरु
एन्न श्रोत्रदल्ली स्वायतवादनय्या मरुळसिद्धेश्‍वरदेवरु
एन्न हृदयदल्ली स्वायतवादनय्या प्रभुदेवरु
एन्न भ्रूमध्यदल्ली स्वायतवादनय्या चेन्नबसवण्णनु
एन्न ब्रह्मरंध्रदल्ली स्वायतवादनय्या संगनबसवण्णनु
एन्न उत्तमांगदल्ली स्वायतवादनय्या मडिवाळय्यनु
एन्न ललाटदल्ली स्वायतवादनय्या सोड्डळ बाचररसनु
एन्न पश्‍चिमदल्ली स्वायतवादनय्या हडपदप्पण्णनु
एन कंठदल्ली स्वायतवादनय्या किन्नर ब्रह्मय्यनु
एन्न सर्वांगदल्ली स्वायतवादनय्या गणंगळु
महालिंग कल्मेश्‍वरा, निम्म शरणर श्रीपादक्के
नमो नमो एनुतिर्देनु.


या वचनात हाविनाळ कल्लय्या यांनी एकोराम, पंडिताराध्य, मरुळसिद्ध या पंचाचार्य आणि श्री रेवणसिद्धेश्‍वर यांचा उल्लेख केला आहे. हाविनाळ कल्लय्या हे बसवण्णांचे समकालीन शरण होते. ते शिवयोगी सिद्धराम यांचे सहकारी शरण होते. रेवणसिद्ध हे बसवपूर्व वीरशैव संत होते, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. वचनांमध्ये आणि त्यापूर्वीच्या वेदागमात वीरशैव शब्दाचा पुष्कळवेळा वापर झाला आहे. त्यातही बसवण्णांपासून हेमगल्ल हंप यांच्यापर्यंत 30 शिवशरणांनी एकूण 142 वचनांमध्ये 221 वेळा वीरशैव शब्द धर्मवाचक म्हणून वापरला आहे. रेणुकाचार्यांनी मांडलेल्या वीरशैव तत्त्वज्ञानाला बसवेश्‍वरांनी उपनिषदातील मूल्यांची जोड दिली. बसवण्णा म्हणतात,


तंदे निनु तायी निनु ।
बंधू निनु, बळग निनु ।
निनिल्लदे मत्तारो इल्लय्या ।
कुडल संगमदेवा हाललद्दु निरलद्दु ॥


हे वचन म्हणजे संस्कृतमधील पुढील श्‍लोकाचे कन्नड रूपच आहे.


त्वमेव माताच पिता त्वमेव । 
त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव । 
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देव देव ॥ 

पुढील वचनात बसवण्णांनी शिवाच्या तांडव नृत्याचे वर्णन केले आहे.


अदुरितु पदाघातदिंद धरे ।
बिदिरिदवु मुकुट तागित तारेगळु ।
उदुरिदवु कैतागि लोकंगळेल्ला ।
नम्म कूडल संगमदेव निंतु नाट्यवनाडे ॥


हे वचन संस्कृतमधील शिवमहिन्मस्तोत्रातील 16 व्या श्‍लोकाचे कन्नड भावानुवादच आहे.


महि पदाघाताद व्रजति सहसा संशयपदं
पदं विष्टोर्भ्राम्यद भुजपरिघरुग्णग्रहगणं ।
महुर्दौर्दौस्थ्वं यात्यनिभ्यतजटाताडिततटा
जगद्राक्षय्ते त्वं नटसि ननु वामैव विभुता ॥ 


पुढील वचनात बसवण्णांनी भगवन्नाम संकीर्तनाचे महत्त्व विषद केले आहे. कोटी कोटी मंत्रजप करण्यापेक्षा तन्मयतेने एक भक्तिगीत गाऊन ईश्‍वराची आराधना करा, असे म्हणतात,


कोट्यानुकोटी जपवन्नु माडि ।
कोटलेगोळ्ळलदेके मनवे ? ।
जपवेंबुदेके मनवे ? ।
कूडल संगन शरणर कंडू
आडि हाडि नलिय मनवे !


हे वचन स्कंद पुराणातील पुढील श्‍लोकासारखे आहे.


श्रुतिकोटी समं जप्यं । जपकोटी समं हवि: ।
हविकोटी समं गेयं । गेयं गेय समं विदु:। 


वेदपारायणापेक्षा मंत्रजप कोटीपटीने अधिक चांगले. मंत्रजपापेक्षा हवि अर्पण करणे कोटी पटीने अधिक चांगले. हवि अर्पणापेक्षा भक्ती करणे कोटीपटीने अधिक चांगले होय. ईश्‍वराला आळवण्यासाठी भक्तिगीतापेक्षा अन्य कोणताही चांगला पर्याय नाही, हा या वचनाचा आशय आहे.


बसवण्णा म्हणतात, कळबेड, कोलबेड, हुसियु नुडियलू बेड, तन्न बण्णिसबेड, अन्यरिगे असह्य पडबेड, इदे अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी, इदे नम्म कुडलसंगमदेवन नोलिसुव परी । (चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, स्वत:चे कौतुक करू नको, दुसर्‍याशी वाईट वागू नको, हीच अंतरंग शुद्धी आहे, हीच बहिरंग शुद्धी आहे. हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.)


पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मुनी पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये हीच तत्त्वे सांगितली आहेत. त्यात यम आणि नियमाला महत्त्वाचे स्थान आहे. ‘यम’मधील अहिंसा, सत्य, अस्तेय आणि बसवण्णांच्या वचनातील कळबेड (आस्तेय), कोलबेड (अहिंसा), हुसियु नुडियलू बेड (सत्य) सारखेच आहेत. ही योगसूत्रे हिंदू धर्माचा पाया आहेत. वेदांच्या कठोपनिषदापासून रामायणातील योगवाशिष्ट, भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा पाया योगशास्त्र आहे. त्या पायावर उभे राहिले आहे कळबेड, कोलबेड, हुसियु नुडियलू बेड....


हे पाहता बसवण्णांच्या वचनांत पुरातन परंपरेचे विमर्श आढळते. कालौघात उपनिषदातील शुद्ध विचारांची जागा कर्मठतेने घेतली. त्यावरील ही जळमटे दूर करून त्यांच्या शुद्धीकरणाचे कार्य बसवण्णांनी केले. वरवर पाहता त्यांनी अनेक वचनांत वेद आणि शास्त्रांचा विरोध केल्याचे दिसते. धर्मशास्त्रांचे नाव पुढे करून सुरू असलेला दांभिकपणा थांबला पाहिजे, यासाठी त्यांनी कर्मठतेविषयी सात्विक संताप व्यक्त केला. वेदोपनिषदांचा योग्यप्रकारे अर्थ समजून न घेता आपली कर्मठता आणि स्वार्थलोलुपतेसाठी त्यांचा वापर करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे, हे समजून घेतले पाहिजे.


हरिदास साहित्यातही विशेषत: पुरंदरदास आणि कनकदासांनी आपल्या रचनांमध्ये अनेक ठिकाणी वैदिक कुप्रथांची थेट आणि कठोरपणे निंदा केल्याची उदाहरणे आहेत. केवळ त्यामुळे हे दोन्ही संत वैष्णव संप्रदायाच्या विरोधात होते, त्यांनी वेगळ्या धर्माची स्थापना केली, असे म्हणता येईल काय ? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केवळ आठ शरणांनी 10 वचनांमध्ये 12 ठिकाणी लिंगायत हा शब्द वापरलेला आहे. आपण नवीन धर्म स्थापन करत आहोत, हे बसवण्णांनी सांगितलेले नाही अथवा त्यांच्या कोणत्याही समकालीन शरणांनी आपण बसवण्णांनी स्थापन केलेल्या नव्या धर्माचे अनुयायी आहोत, असे लिहिले नाही. त्यामुळे अस्तित्वात नसलेली बाब ऐतिहासिक म्हणून बिंबवण्याचा आताच्या राजकारण्यांचा खटाटोप हा केवळ स्वार्थासाठी चालला आहे.


बसवण्णांनी स्थापन केलेल्या धर्मात मूर्तिपूजा नाही, हा तर्कही मांडला जात आहे. मात्र, यालाही कोणताही आधार नाही. बसवण्णांनी देवालयातील देव भक्तांच्या हाती दिला. माझे पाय हेचि खांब, देह हेचि देवालय, माझे शिर हेचि कळस या वचनातून बसवण्णांनी प्रत्येकात ईश्‍वर आहे, हे उपनिषदकालीन हिंदू तत्त्वज्ञानच मांडले. तुमच्यातच ईश्‍वर विद्यमान आहे, त्यामुळे स्थावर लिंगाची पूजा करू नका, असे सांगितले. याचा अर्थ त्यांनी मूर्तिपूजा नाकारली असा होत नाही. कारण इष्टलिंग हे शिवलिंगाचेच प्रतीक आहे. तसेच शिवाला लिंगरुपातच पूजण्याची प्रथा असल्याने ती मूर्ती नाही, ते केवळ संकेत आहे, हे सांगणे कितपत योग्य आहे ? आणखी एक बाब म्हणजे बसवण्णांसह सर्वच शिवशरणांचे वचनांकित हे स्थावर लिंगाची नावे आहेत. त्यांनी आपल्या ग्रामदेवतेचे, इष्टदेवतेचे नाव वचनांकित म्हणून स्वीकारले, हे कसे नाकारणार? वीरशैव लिंगायतांच्या अष्टावरणत लिंग, मंत्र (ओम प्रणवमंत्र), विभुती, रुद्राक्ष या बाह्य आवरणांना विशेष महत्त्व आहे. हे सर्व प्रतीक, संकेत हे हिंदू धर्म परंपरेतील आहेत, स्वतंत्र धर्मातील नव्हे. त्यामुळे वीरशैव लिंगायतांचे अष्टावरण, पंचाचार हे सनात धर्मापासून वेगळे करणे शक्य नाही. हिंदू हे भारतीय इतिहासातील सनातन धर्म, आणि भारतात उगम पावलेल्या पंथांना दिलेले सर्वसमावेशक नाव आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेच हिंदू हे रिलीजन नाही, ती एक जीवनपद्धती असल्याचा निर्वाळा दिला आहे.


2 जुलै 1995 रोजीचा एस. अहमद, जी. वेंकटाचल आणि कुलदीप सिंग यांचा निकाल कृपया वाचा -  


आपल्यात शाकाहारी हिंदू आहेत, मांसाहारी हिंदू आहेत. मृतदेह दहन करणारे हिंदू आहेत, दफन करणारेही हिंदू आहेत. देवाची साकार रूपात पूजा करणारे हिंदू आहेत, निराकार रूपात पूजा करणारे हिंदू आहेत. गुरूंचे मार्गदर्शन घेणारे हिंदू आहेत, मार्गदर्शन न घेणारे हिंदू आहेत. वेदमंत्र पठण करणारे हिंदू आहेत, न करणारे हिंदू आहेत. देवळात जाऊन पुजार्‍यामार्फत देवाची पूजा करणारे हिंदू आहेत, तेथे न जाता घरी स्वत: पूजा करणारे हिंदू आहेत. वर्णपद्धती पाळणारे हिंदू आहेत, ते न पाळणारे हिंदू आहेत. जातक, वास्तू, मुहूर्त पाहणारे हिंदू आहेत, ते न पाहणारे हिंदू आहेत. वेद मानणारे हिंदू आहेत, तसे न मानणारे हिंदू आहेत. आस्तिक हिंदू आहेत आणि नास्तिक हिंदू आहेत. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे हिंदू आहेत, आपण हिंदू आहोत हेच माहीत नसणारे हिंदू आहेत, हिंदू धर्माचे अहित चिंतणारेही हिंदू आहेत.


जगातील सर्वाधिक सहिष्णू विचार हिंदूंकडे आहे. माझा धर्म सत्य तसे इतरांचे धर्मही सत्य आहेत, असा सर्वसमावेशक विचार जगाच्या पाठीवर केवळ हिंदूंकडेच आहे. आत्मवत् सर्वभूतेषु म्हणजे इतर जीवही आपल्यासारखेच आहेत, असा विचार हिंदू धर्मात मांडला आहे. एकोहं बहुस्याम् म्हणजे ईश्‍वर एक आहे आणि तो विविध रूपांतून व्यक्त होतो हा भाव ज्या संस्कृतीत खोलवर रूजला ती हिंदू संस्कृती.


एकच माणूस एकाच वेळी मारुती, लक्ष्मी, विष्णू, राम, कृष्ण अशा अनेक देवांची उपासना करू शकतो. यामुळे तो गोंधळून जात नाही. असे केवळ हिंदू धर्मातच घडू शकते. नदी, पर्वत, वृक्ष, सूर्य, चंद्र, अग्नी, धनधान्याचीही पूजा करतो. आपल्याहून ज्ञानी, वडिलधारी व्यक्तींची पूजा करून चरणस्पर्श करण्याची परंपराही याच हिंदू संस्कृतीत आहे.


माझाच देव खरा आणि इतरांचे खोटे, जगातील सर्व लोकांनी माझाच देव मानला पाहिजे, अन्यथा त्यांना जगण्याचा अधिकार नाही, सर्व जग माझ्याच धर्माचे बनले पाहिजे यासाठी धर्मांतर करू वगैरे प्रकारचा विचार भारताबाहेर उगम पावलेले रिलिजन मांडत असतात. रिलिजन या अर्थाने धर्म या संकल्पनेकडे पाहणार्‍यांना हिंदू धर्म समजणे कठीण आहे. हिंदू जीवनपद्धती पाहून ते गोंधळून जातात. जगातील सर्व पंथांची जननी असलेला हिंदू धर्म तोडण्यासाठी एकांतिक धर्मांतील कट्टरवादी सदैव आटापिटा करत असतात. हिंदू धर्मातील विविध पंथांतील लोकांचा बुद्धिभेद करतात. त्यास खतपाणी घालतात. आणि मग संबंधित पंथांमधील काहीच्या स्वार्थ भावनेला फुंकर घातली जाते. परिणाम, आम्ही हिंदू नाही. आमचा धर्म स्वतंत्र आहे. त्याला तसा दर्जा द्या, अशी मागणी पुढे येते. सर्वसामान्य माणूस त्याची काहीही चूक नसताना अशा षडयंत्रांना बळी पडतो. याला इतिहास साक्षी आहे. आपली गुरुपरंपरा असलेल्या बौद्ध, जैन आणि शीख परंपरेला अल्पसंख्याक म्हणून दूर केले गेले.
 
गुरुग्रंथसाहिबमध्ये हरी हा शब्द 8344 वेळा येतो. राम हा शब्द 2533 वेळा येते. गोपाल हे नाम 491 वेळा येते. इस्लामी जिहादपासून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे कार्य केशधारी हिंदूंनी (शिष्य अर्थात शिख) केले. दुर्दैवाने आज शिखांना हिंदूंपासून वेगळे पाडण्यात आले. शीख हे हिंदू नाहीत, असे सांगण्यात आले. ठरवून फूट पाडण्यात आली. अलीकडे काही समाजघटकांना चुचकारून हिंदू समाजात दुही माजवण्याचे षडयंत्र रचले जात आहेत.

 
समाजाची धारणा करतो तो धर्म, ही धर्माची सोपी आणि मूळ व्याख्या. सर्वांच्या कल्याणाचा विचार करून बनवलेले नीतिनियम म्हणजे धर्म. एक शिक्षक म्हणून तुमचा धर्म काय, एक विद्यार्थी म्हणून तुझा धर्म काय... असे विचारले जाते तेव्हा कर्तव्य या अर्थाने धर्म शब्द येतो. वैष्णव धर्म, भागवत धर्म असे शब्द संप्रदाय किंवा पंथ या अर्थाने वापरण्याची प्रथा आहे. वीरशैव धर्म किंवा लिंगायत धर्म याच अर्थाने आहे. परंतु, हिंदू धर्माची शकले करण्यासाठी टपलेल्या शक्ती शब्दछल करतात. सामान्य माणसांचा बुद्धीभेद करतात. लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हे कमी होते म्हणून की काय आता येत्या काळात भागवत धर्म हा हिंदू धर्माहून वेगळा धर्म आहे आणि भागवत धर्माला स्वतंत्र दर्जा द्या, अशी मागणी पुढे करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वसामान्य हिंदूंची मती गुंग करणार्‍या या बाबी आहेत. हिंदू धर्म खिळखिळा करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हिंदूंनाच हिंदू धर्माच्या विरोधात उभे करण्याचे षडयंत्र सुरू आहे. आणखी किती तुकडे? हे हवे आहे का? नसेल तर हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. यासाठी आपण कृतिशील बनले पाहजे. स्वत: अभ्यास, वाचन सुरू केले पाहिजे.
 
लिंगायत समाजाला विभाजित करण्याचे राजकीय कुतंत्र


ब्रिटिशांनी भारतात ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनेही देशभरातील विविध मत, पंथांना चुचकारत हिंदू समाजात फूट पाडण्याचीच नीती कायम ठेवल्याचेच आजपर्यंतच्या त्यांच्या धोरणावरून दिसून आले आहे. आताही काँग्रेसचेच सरकार असलेल्या कर्नाटकात लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याच्या नागमोहन दास आयोगाचा अहवाल स्वीकारल्याने हिंदू धर्मच नव्हे तर वीरशैव लिंगायत समाजातच दुही माजवण्याचा त्यांचा डाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.

 
मागे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाज फोडण्याचा मनोदय व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत या समाजात फूट पाडायचीच, असे ठरवून दोन मंत्र्यांना याच कामासाठी नेमले. विशेष म्हणजे लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करून स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी घेतलेले एम. बी. पाटील हे मूलत: कुडवक्कलिगा समाजाचे आहेत. लिंगायत समाजातील पंचमसाली, गाणिग, बणजिग यांच्या तुलनेत कुडवक्कलिगा समाजाची लोकसंख्या फारच कमी आहे. त्यामुळे आपल्या जातीच्या संघटनेद्वारे राज्यात राजकारण करणे असाध्य असल्याचे ओळखून संपूर्ण लिंगायत समाजाचेच नेतृत्व करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. लिंगायतांमध्ये फूट पाडून भाजपचे येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाच्या जवळपासही फिरकणार नाहीत, याची काळजी घेतल्यास पुढे उपमुख्यमंत्री करण्याचे आमिष सिद्धरामय्या यांनी त्यांना दाखवल्याची कर्नाटकच्या राजकीय गोटात चर्चा आहे.


एम. बी. पाटील, विनय कुलकर्णी यांना लिंगायत समाजात स्थान मिळवणे महत्त्वाचे आहे, तितकेच ते सिद्धरामय्या यांच्यासाठीही महत्त्वाचे आहे. कारण ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या तीन वर्षांत त्यांचे नेतृत्व संपूर्ण कर्नाटकात प्रस्थापित होऊ शकले नाही. त्यांचे नेतृत्व केवळ जुन्या म्हैसुरू भागापुरतेच सीमित राहिले. उत्तर कर्नाटकातील जनतेने कोणत्याही कारणाने त्यांचे नेतृत्व मानले नाही. उत्तर कर्नाटकसाठी विशेष पॅकेज दिले. धारवाडला आयआयटी स्थापन केले. उत्तर कर्नाटकात काँग्रेसचा कोणताही नेता मोठा होणार नाही, याची काळजी घेतली. आर. व्ही. देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे अस्तित्व संपवले. उत्तर कर्नाटकात आपले नेतृत्व प्रस्थापित करायचे तर इतके पुरेसे नाही, त्यासाठी तेथील जातींच्या विषयातही लक्ष घालावे लागेल, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी लिंगायत समाजाला विभाजित करण्याचे कुतंत्र अवलंबले.


याद्वारे आपले नेतृत्व आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाची पाळेमुळे उत्तर कर्नाटकात मजबूत करायची. आपले प्रबल विरोधक बी. एस. येडियुरप्पा यांना त्यांच्याच आखाड्यात आव्हान देत चित करायचे. लिंगायत स्वतंत्र धर्मप्रश्नी त्यांची कोंडी करायची, अशी रणनीती आखली. लिंगायतांमधील काही मंडळी लिंगायत स्वंतत्र धर्माची मागणी करणारे तर काही स्वत:ला हिंदू म्हणवणारे आहेत. त्यामुळे येडियुरप्पा हे समाजातील काही लोकांचा विश्वास आणि मते गमावतील. डिनोटिफिकेशन प्रकरणात सोक्षमोक्ष लावण्याच्या प्रयत्नात असलेले येडियुरप्पा आपल्या जाळ्यात फसणार नाहीत, हे लक्षात येताच सिद्धरामय्या यांनी या प्रकारे त्यांना शह देण्याची रणनीती आखली.




- अप्पासाहेब हत्ताळे
@@AUTHORINFO_V1@@