होमियोपॅथीबद्दलचे समज-गैरसमज- भाग - ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |
 
 
 
होमियोपॅथीच्या औषधांचा उपयोग आता संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. लोकांच्या मनात या शास्त्राबद्दल काही शंका व गैरसमज असतात. आपण याच शंका किंवा गैरसमजांवर माहिती घेत आहोत. जेणेकरून सर्व शंकांचे निरसन होईल.
 
लोकांमध्ये एक शंका असते की होमियोपॅथी नक्की कशी काम करते?
 
तर याचे उत्तर विस्ताराने द्यायचे झाले, तर त्याला बराच वेळ लागेल. त्याबाबत आपण नंतरच्या लेखांमध्ये माहिती पाहणारच आहोत. पण, थोडक्यात सांगायचे झाले, तर होमियोपॅथी आपल्या शरीरातील जी रोगप्रतिकारक शक्ती व Healing Power आहे, तिला उद्दीपित करते. या औषधांमुळे माणसाची जी चैतन्यशक्ती आहे, तिला चालना मिळते. रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळाल्यामुळे, शरीर रोगाला मुळापासून बाहेर काढते. हे सर्व नैसर्गिक नियमांना अनुसरून झाल्यामुळे आजाराचे समूळ उच्चाटन तर होतेच, शिवाय या सर्व प्रक्रियेत रुग्णाला कुठलेही दुष्परिणामही भोगावे लागत नाहीत.
 
सर्वसामान्य लोकांमध्ये होमियोपॅथीबद्दल अजून एक गैरसमज असतो व तो म्हणजे, होमियोपॅथीची औषधे म्हणजे फक्त साखरेच्या गोळ्या असतात, हा होय.
 
या गैरसमजाबद्दल आपण आता जाणून घेऊया. होमियोपॅथीच्या पांढर्‍या गोळ्या म्हणजे औषध नसून, त्या फक्त वाहक आहेत. होमियोपॅथीची द्रवरूप औषधे जेव्हा या गोड गोळ्यांमध्ये घातली जातात, तेव्हा त्या गोळ्यांचे औषधात रुपांतर होते. रुग्णाच्या तक्रारीप्रमाणे औषधे या गोळ्यांमध्ये घातली जातात व अशाप्रकारे ते औषध तयार होते. ही द्रवरूप औषधे निसर्गातील विविध गोष्टींपासून बनवली जातात.
१) वनस्पतीजन्य (From Plant Kingdom)
२) प्राणिजन्य (Animal Kingdom)
३) मूलद्रव्य, धातू, अधातूजन्य (Mineral Kingdom) ज्याला ‘क्षारजन्य’ असेही म्हणू शकतो.
अशा प्रकारच्या स्रोतांपासून बनवलेली ही औषधे रुग्णांच्या लक्षणानुसार वापरली जातात. त्यामुळे काही रुग्णांना असे वाटते की, कुठल्याही आजाराला किंवा सर्वांना या सारख्याच दिसणार्‍या पांढर्‍या गोळ्या दिल्या जातात, जे अजिबात खरे नाही. दिसणार्‍या सर्व गोळ्या जरी एकसारख्या दिसत असल्या, तरी त्यात घातलेल्या द्रवरुपी औषधांमुळे, त्या गोळ्यांचे गुणधर्म हे संपूर्णपणे बदललेले असतात.
 
साधारणपणे इतर शाखांतील औषधे घेतलेल्या लोकांना ही शंका येणे स्वाभाविक आहे. कारण, या लोकांना वेगवेगळ्या रंगीबेरंगी, मोठमोठ्या गोळ्या व सिरप्स घेण्याची सवय लागली असते व त्यामुळे त्यांना असे वाटते की, या इतक्याशा गोळ्यांनी माझा आजार कसा काय बरा होणार? पण, निसर्गातील वस्तूंपासून बनवलेली ही आपली औषधे इतकी शक्तीशाली असतात की, ती आजाराला समूळ नष्ट करतातच व इतकेच नव्हे, तर रोग्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून, त्याला भविष्यात होणार्‍या मोठ्या आजारांपासूनही वाचवतात. ज्यांना होमियोपॅथीबद्दल व्यवस्थित ज्ञान आहे, असे अनेक लोक आमच्याकडे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने येतात व औषधोपचार घेतात. अशामुळे त्यांना कुठलेही वारंवार होणारे आजार होत नाहीत. इतकेच नव्हे तर भविष्यातही हे लोक कधी पटकन आजारी पडत नाहीत. याचे कारण असे की, होमियोपॅथीच्या नैसर्गिक औषधांनी या लोकांची चैतन्यशक्ती (Vital Energy or Vital Force) अत्यंत निरोगी झाली असते.
 
अजूनही काही शंका लोकांच्या मनात आहेत, ज्यांचे निरसन आपण पुढील भागात करु.
 
 
 
 
 
- डॉ. मंदार पाटकर 
 
@@AUTHORINFO_V1@@