मनपाची करवाढ रोखण्यास मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार : आ. बाळासाहेब सानप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |

करवाढीविरोधात भाजपची भूमिका स्पष्ट

 
 
 
 
नाशिक : शहरात पिवळ्या पट्‌ट्यातील शेतीसह मोकळ्या जागांवर घरपट्टी आकारण्यात आल्याने शहरात शेतकर्‍यांसह सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ’’शेतकरी व नागरिकांच्या भावना लक्षात घेत आम्ही या करवाढीविरोधात महासभा बोलावली आहे. यात या करवाढीविरोधात ठराव करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ,’’ असे प्रतिपादन आ. बाळासाहेब सानप यांनी केले.
 
शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने प्रभाग २ मधील आडगाव येथील मारुती मंदिर पारावर शेती, पार्किंग व घरपट्टी करवाढीच्या निषेधार्थ शेतकर्‍यांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अॅड. जे. टी. शिंदे, आ. बाळासाहेब सानप, कृती समिती अध्यक्ष अविनाश अरिंगळे, अॅड. उन्मेष गायधनी, अॅड. नितीन ठाकरे, गजानन शेलार, गुरमित बग्गा, तसेच नगरसेवक यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
महापालिका आयुक्तांनी शेती, मोकळ्या जागांवर केलेल्या करवाढीविरोधात भाजपची भूमिका असल्याचे आम्ही स्पष्ट केले असल्याचे सांगत आ. सानप म्हणाले, ’’शेतकरी, नागरिक यांच्यावर घरपट्टीचा बोजा पडू नये यासाठी महासभेत निर्णय घेणार आहोत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपण सर्वजण जाऊ आणि शेतकर्‍यांसह सर्वांना न्याय मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी अॅड. जे. टी. शिंदे यांनी पिवळ्या पट्ट्यातील शेती, मोकळ्या जागा, शिक्षणसंस्था, मंदिरे, इमारतीजवळ मोकळ्या जागा अशा ठिकाणी महापालिकेने लावलेल्या करासंदर्भातील सविस्तर माहिती दिली.
 
गजानन शेलार यांनी शेतकरी व नागरिकांना कुटुंबीयांसह आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी आयुक्तांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. माजी उपमहापौर गुरमित बग्गा म्हणाले की, शासनाच्या नियमाप्रमाणे ४० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ करता येत नाही. असे असतानाही हा कर लादण्यात आला आहे. याविरुद्ध एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कृती समिती अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी आपल्या भाषणात डी. पी. मध्ये शेतकर्‍यांवर टाकण्यात आलेली ८० टक्के आरक्षणे उठविण्याचे काम समितीने केल्याची आठवण करून दिली. आता पुन्हा शेती, मोकळ्या जागा, इमारतींच्या पार्किंगवर घरपट्टी लावण्याचे काम महापालिकेने केल्यामुळे महापालिकेतील प्रत्येक गावात शेतकर्‍यांच्या बैठका घेऊन जनआंदोलन उभारण्याचे काम सुरू असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. वीस टक्के करवाढीचा विरोध न केल्यास आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपल्याला गाव सोडून जाण्याची वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. उन्मेष गायधनी यांनी करवाढीविरोधात ‘मी नाशिककर’ म्हणून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले तर दत्ता गायकवाड यांनी महासभेच्या दिवशी सकाळी ११ वाजता महापालिकेसमोर आंदोलन करण्याचे जाहीर केले. महासभेनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करण्यासाठी यापुढे जनआंदोलन आणि वेळ पडल्यास थेट मंत्रालयावर उपोषण करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@