पालकत्वाच्या पतंगाची दोरी....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |

पालकांच्या हातातील मुलांच्या पतंगाची दोरी त्या पतंगाला उंचीवर उडवते खरी, पण इतर अधिक सक्षम पतंगांच्या दोर्‍यांनी ती सहज कापली जाते. तो पतंग दिशाहीन भरकटतो आणि कुठे जाऊन पडतो याची जाणीवही पालकांना होत नाही. मुलांच्या आयुष्यातही नेमके असेच होते. आईवडील त्यांना भरारी मारायला लावतात, पण मुले दिशाहीन होऊन, काहीच करु शकत नाहीत. वेगळ्याच वाटांमध्ये ती हरवून जातात. नक्की काय करायला हवे याचे उत्तर मुलांना सापडत नाही. त्यामुळे आईवडिलांनी दाखविलेल्या दिशेने चालण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. ‘ही वाट दूर जाते, स्वप्नांचिया गावी’ तसे हे खरे नाही. उलट ही वाट भरकटतच जाते. वाट अशीच चालत असते, या वाटेत खाचखळगे असतात, अडथळे असतात. पण, त्यांना आपण ठरविलेल्या ध्येयाकडे जाता येईल, याची अजिबात खात्री नसते. अशा वेळी मन विचलित होते.
 
आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांवरचा ताण प्रचंड वाढला आहे. स्पर्धा जीवघेणी झाली आहे. अभ्यासाच्या सर्कलमध्ये आपल्या मुलांना टिकता आलं पाहिजे व त्यापेक्षाही पुढे जाऊन जिंकता आलं पाहिजे, हा पालकांचा असहाय अट्टहास असतो. कारण, दहावी व बारावी या टप्प्यांची पालकांनी केलेली बेरीज- वजाबाकी चुकली, तर मुलांच्या व पालकांच्या भविष्याचे पूर्ण गणित चुकते. चुकलेले गणित आयुष्याच्या बाबतीत पुन्हा मागे जाऊन सोडविता येणे शक्य नसते. अगदी ब्रह्मदेवालाही काळ पुन्हा मागे नेता येत नाही. अशा वेळी पालकांना पुन्हा एकदा नवीन गणितांची बेरीज-वजाबाकी मांडावी लागते. नवीन उत्तरे शोधावी लागतात. नवीन पर्याय पाहावे लागतात. बर्‍याचदा हे नवे पर्याय पालकांना आवडत नाहीत, तर कधी ते मुलांना रूचत नाहीत. अशा वेळी पैसे मोजावे लागतात. एकतर अपेक्षित यश आपल्या मुलांना मिळाले नाही याची मनस्वी खंत असते, वर अपराधीपणाची भावनादेखील मनाला कुरतडत राहते. मुलांना आपण आपल्या स्वप्नांत रंगविलेली करिअर्स मिळावी वा आपणच त्यांच्या मनात चित्रित केलेल्या करिअर्सचा हट्ट त्यांनी धरला की पैशाचा उद्गमशोधायचा. कधी आईने आपले सोने विकायचे तर कधी बाबांनी जमीन विकायची वा कधी शिक्षणासाठी कर्ज काढायचे हा सगळा उपद्व्याप वाटतो तितका सोपा नाही. यात व्यावहारिक जुळवाजुळव करताना, मनात होणारी कासावीस पालकांनाच जाणवत असते. आतापर्यंत घामगाळून, कष्ट करून, जीवाचा आटापिटा करून, पोटाला चिमटा काढून, मुलासाठी प्रयत्न केले. चांगले कॉलेज, महागडे कोचिंग क्लासेस लावले, तरीही आपल्या पाल्याने अपेक्षित यश मिळविले नाही याची बोच मनात कायमच राहते. पण, भविष्याबद्दल यशाची खात्रीही त्यांना नसते. चुकल्यासारखे वाटत असते. या अवस्थेला आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्याची निराशा जितकी कारणीभूत असते, तितकीच उत्तमयश मिळेल की नाही याची चिंताही कारणीभूत असते. शेवटी अपत्य तर आपल्या पोटचा गोळाच असते. ही द्विधा मनस्थिती आपण कुणाकडे कशी व्यक्त करावी, हे पालकांना कळत नाही. अनेक वेळा हे प्रश्र्न नवरा-बायको एकमेकांकडेही व्यक्त करत नाहीत. मनात खूप संकोच असतो. अपराधी भावना असते. आपल्या मुलाबद्दल आपण असे नकारात्मक विचार कसे करायचे?
 
या प्रश्र्नाकडे केवळ भावूक होऊन न पाहता, वास्तवाच्या दृष्टिकोनातून पाहणे खूप महत्त्वाचे आहे. सत्य परिस्थितीला सामोरे जाण्यातच शहाणपण आहे. आईबाबा आपल्या पाल्याची क्षमता न पाहता अनेक स्वप्ने पाहतात. अर्थात सर्वसाधारण पालकांची त्या स्वप्नांत आपल्या मुलांचे भले व्हावे, ही भाबडी अपेक्षाच असते. पण, या स्वप्नांची मर्यादा पाहणे आवश्यक आहे. मुलांच्या मनात एखादे करिअर करायचे उदाहरणार्थ डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे ठरले असेल, पण त्यासाठी आपण किती कष्ट केले पाहिजेत याची जाणीव नसेल, तर ती मुले वास्तवापासून दूर जातात. काही मुलांची क्षमताच मुळात कमी असते. आजकाल दाम्पत्याला एखादेच मूल असते, त्यामुळे पालकांना आपल्या स्वप्नांना मूर्त स्वरुप देण्यासाठी दुसरा पर्याय नसतो. पण, मुळातच आपल्या पाल्याची क्षमता कमी असताना त्याच्याकडून सर्वात जास्त यशाची अपेक्षा करण्यासारखी दुसरी चूक नाही. आपण आपल्या मुलांना, ते आहेत त्या पायरीवरुन पुढे घेऊन जायला नको का? अर्थातच आपण त्यांना पुढच्या पायरीवर घेऊन जाणे पालकांचे कर्तव्य आहे. पण, त्यांना शिखरावर घेऊन जाताना तेथे पोहोचण्याची ताकद त्यांच्यात आहे का, याची शहानिशा करणेही आवश्यक आहे. पालकांच्या विचारांचा, मुलांच्या मनावर जबरदस्त प्रभाव असतो. सत्यस्थिती समजायचा शहाणपणा यायच्या आधीच मुलं पालकांच्या विचारांनी भरारी घ्यायला लागतात. यामुळे त्यांना भावनिक प्रगल्भता तर येत नाहीच, पण स्वत:च्या क्षमतेचा अंदाजही त्यांना येत नाही. यामुळे स्वप्नांच्या दुनियेत भरारी मारायची इच्छा बाळगणार्‍या मुलांना आपल्या पंखांतले बळ कमी पडले आहे. याची परखड जाणीव नसते. जर ती जाणीव झाली असेल, तर ती स्वीकरण्याची ताकद त्यांच्यात नसते. अशी मुलं वस्तुस्थिती नाकारतात, कारण ती स्वीकारली, तर मुलांचे भावनिक खच्चीकरण व्हायची शक्यता अधिक असते. यात होते असे की, पालकांच्या हातातील मुलांच्या पतंगाची दोरी त्या पतंगाला उंचीवर उडवते खरी, पण इतर अधिक सक्षमपतंगांच्या दोर्‍यांनी ती सहज कापली जाते. तो पतंग दिशाहीन भरकटतो आणि कुठे जाऊन पडतो याची जाणीवही पालकांना होत नाही. मुलांच्या आयुष्यातही नेमके असेच होते. आईवडील त्यांना भरारी मारायला लावतात, पण मुले दिशाहीन होऊन, काहीच करु शकत नाहीत. वेगळ्याच वाटांमध्ये ती हरवून जातात.
 
नक्की काय करायला हवे याचे उत्तर मुलांना सापडत नाही. त्यामुळे आईवडिलांनी दाखविलेल्या दिशेने चालण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. ’ही वाट दूर जाते, स्वप्नांचिया गावी’ तसे हे खरे नाही. उलट ही वाट भरकटतच जाते. वाट अशीच चालत असते, या वाटेत खाचखळगे असतात, अडथळे असतात. पण, त्यांना आपण ठरविलेल्या ध्येयाकडे जाता येईल, याची अजिबात खात्री नसते. अशा वेळी मन विचलित होते. मनाच्या ताकदीने पुढे जायचे म्हटले, तर क्षमता कमी पडते. अशा वेळी जो गोंधळ मुलांच्या मनात माजतो, त्यामुळे आपण निश्चित काय करायला हवे, याची खरी जाणीव त्यांना होते. बरेचदा आपल्या आईबाबांनी दाखवलेल्या दिशेने ते चालतात, पण तिथेही मार्गक्रमण करणे त्यांना जमत नाही. अशाने पुन्हा मागे फिरायला लागते. अशा मुलांमध्ये दुर्दैवी गोष्ट अशी की, त्यांना ज्या उंचीवर झेप घ्यायची असते, त्यापेक्षा कमी उंचीवर त्यांना यायला लागते. स्वतःच्या स्वप्नांच्या रुपरेषा आक्रसून घेणे अत्यंत आवश्यक असते. मुलांना त्या उंचीवर पोहोचता येणे शक्य होत नसते व त्यापेक्षा कमी उंचीवर स्थिर होण्यास मन तयार होत नसते. अशा वेळी मुलांच्या मनात स्वतःच्या क्षमतेबद्दलच शंका निर्माण होते. जबाबदारीची जाणीव असलेली मुले, आपल्याला आईवडिलांची इच्छा आपल्याला पुरी करता आली नाही म्हणून अगदी शरमेने झुकून जातात. त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. न्यूनगंड हा आयुष्याला लागलेला शापच जणू. अनेक गोष्टी करता येणे शक्य असूनही, केवळ न्यूनगंडामुळे त्यांना साकार करणे शक्य होत नाही. मागच्या लेखात अधीरच्या आईवडिलांप्रमाणे स्वतःला दोष न देता, सकारात्मक दृष्टिकोनातून त्याला पुढे कसे न्यायचे, याचा संयमाने विचार केला पाहिजे. अधीरप्रमाणेच आपली मुलेसुद्धा माणसेच आहेत त्यांच्याकडे शहाणपणा नसल्याने, थोडी अप्रगल्भ आहेत. तेव्हा त्यांच्यात असलेल्या सृजनशीलतेला ओळखून, खूप विचारांती त्यांना रुचणारी व पेलणारी करिअरची दिशा आखणं आवश्यक आहे. मुलांची बुद्धिमत्ता सर्वसाधारण असते, पण त्यांचा सूर वेगवेगळा असतो. पालकांना तो नेमका पकडता आला पाहिजे. पूर्वी केवळ ठराविक करिअर्स माहीत असायची, पण आज शैक्षणिक संधी मुबलक आहेत. त्यातून कधी नेहमीची करिअरची वाट, तर कधी वेगळी नावीन्यपूर्ण वाट मुलांना देता येऊ शकते. शेवटी यश म्हणजे केवळ करिअर नव्हे, तर त्यातून विकसित होत आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यातूनच मुले आपले यशस्वी विश्व निर्माण करु शकतात.
 
 
 
 
 
 
- डॉ. शुभांगी पारकर 
 
@@AUTHORINFO_V1@@