निषेधाच्या मेणबत्त्यांनी काही अंधार दूर होणार नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018   
Total Views |
एक काटेरी अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्या मागे एक असुरक्षिततेची भावनाही आहे. अत्याचार झालेल्या मुलींबद्दलचा कळवळा आहे; पण दुसर्‍याचा उंबरा अपवित्र करणारा हा विकार थांबविण्याचा माझ्याकडे काहीच मार्ग नाही, त्यापासून आपले घर कसे सुरक्षित ठेवायचे, हा काळजीचा भाग जास्त आहे. उन्नाव आणि कथुआ... काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरत चालले आहे. टीव्ही सुरू केला की एखाद्या सरपटणार्‍या विषारी श्वापदाने हलकेच सरपटत वेटोळून टाकावे आपले अवघे अस्तित्व तसे गारगार विषारी वेटोळे अंगाभोवती लपेटले जात आहे, असे वाटत राहते. आपण पुरुष आहोत, याचीच खंत वाटावी असेच वातावरण. आपल्यातल्या या शुभंकर, शुचित अशा वरवरचा वर्ख फाडून आपल्यातले नरपुंगत्व कधी आपले अस्तित्व टराटरा फाडत बाहेर पडेल, याची भीती वाटू लागली आहे. श्वापदे जागे करणारेच वातावरण बहुताल. शरीरातला जिवंत उबदारपणाच निघून जातो आहे की काय असे वाटावे. आता बलात्कारालाही धर्माची, जातीची जोड देण्यात येत असल्याने अवघे अस्तित्वच मुडद्यासारखे थंडगार झालेय्‌...
 
 
बरे हे थांबविण्याचा विचार करायचा अन्‌ या भीषण समस्येवर उत्तर शोधण्याची उसंत तर मिळावी ना... पण; आता त्या समस्येचेच राजकारण केले जात आहे. बुद्धिभेद, भ्रम निर्माण केला जातो आहे. हे खरे की ते, असा नवाच सवाल जात्या निर्माण केला जातो आहे. सत्य काय? टोळकी झाली आहेत अन्‌ ती सत्यापासून दूरच आहेत. आपल्याला हितकारक वाटते त्या टोळक्याचेच बरोबर, हे सांगण्याचीही अहमहमिका सुरू झालेली आहे. चूक असू शकते आणि बरोबरही... पण; सत्य नाही! कथुआत एक चिमुकली मारली गेली. अत्यंत क्रूरपणे. कुणीही केले असेल हे कृत्य; पण आता त्यावरच्या चर्चा घडले ते वाईट, अशा नाहीतच.
का होतात बलात्कार? कारणे आम्ही शोधत नाही... केवळ आम्ही अशा काही घटना झाल्या की कँडल मार्च काढतो. संतापाला अन्‌ वाढत जाणार्‍या असुरक्षेच्या भावनेला वाट करून देतो. कारणे शोधली तरीही त्यामागे येणारी जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही. सार्‍याच अहितकारक गोष्टींना आम्ही दुसर्‍या कुणालातरी जबाबदार धरत असतो. सोप्प असतं सरकारलाच जबाबदार धरणं... सुरक्षा यंत्रणाच सक्षम नाहीत. पोलिस झोपलेले असतात... खरे तर हे आहे की, 96 टक्के बलात्काराच्या घटना घरांतच घडत असतात. तिथे पोलिस नसतातच कधी. असावेत असे आम्हाला पटणारेही नाही. मग कोण असतं जबाबदार? आमच्याकडे जबाबदारी दाखविणारी बोटं वळू लागली की ज्यांची आम्ही काळजी करत असतो, ज्यांच्यावर अन्याय झाला म्हणून हळहळत असतो त्यांनाच पायाखाली टाकून त्यांच्या अंगावर उभे राहतो... शेतकरी आत्महत्या करतात कारण ते आळशी असतात, व्यसनाधीन असतात, असे म्हणून आम्ही हात झटकतो. बलात्काराला स्त्रियाच कशा जबाबदार आहेत, हेही सांगून आम्ही मोकळे होत असतो. त्या म्हणे कमी कपडे घालतात, नको तितक्या मोकळ्या वागतात... समाजमाध्यमांवर मोकळ्या होतात... म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात. (आमची काहीच जबाबदारी नाही ना!)आणखी काही कारणे शोधायची तर मग सरकारचे कायदे कडक नाहीत. कोर्टात खटल्यांना वेळ लागतो. बलात्कार्‍यांना फाशीच द्यायला हवी... आपल्या देशात कायदे कडक नाहीत, त्या तमक्या देशांत बघा कसे सुतासारखे सरळ वागतात लोक कायदे कडक असल्याने... असे काय काय म्हणत असतो. सारेच प्रश्न कायद्याने सुटत नसतात. सामाजिक परिवर्तन नावाची काही चीज आहे की नाही? आम्ही बदलायला तयार नाही. आमची मानसिकता आम्ही बदलूच पाहात नाही. स्त्रिया या आम्हाला नेहमीच संपत्ती वाटत आल्या आहेत. त्या म्हणजे केवळ देहच, उपभोग्य वस्तू हीच आमची मानसिकता आहे. वरवर समाजात वावरत असताना आम्ही फार शहाणे होऊन वावरतो मात्र एकट्यात पुरुषांच्यातला नर जागा होतो. त्याला आणखी एक मादी कमवायची असते.
 
कायदा गुन्हा घडल्यावर येतो. मनाच्या पातळीवर त्याची तालीम सुरू असते तेव्हा काय करायचे? मुळात आमच्या सगळ्याच गोष्टी घटना घडून गेल्यावरच असतात. त्या आधी आम्ही कसलीच काळजी घेत नाही. बलात्कार प्रत्यक्षात होण्याआधी तो मनाच्या पातळीवर अनेकदा केला जातो. महिलांना चोरटा स्पर्श, इव्ह टिझिंग, सहेतुक काही बोलणे... हे सारे घडत असताना आम्ही गप्प बसलो असतो अन्‌ मग बलात्कार झाला की आम्ही कँडल मार्च काढून, ‘आम्ही नाही त्यातले’ हे दाखविण्याचा शाहजोगपणा करतो...
आजच्या बाजारीकरणाने सगळेच कसे बाटवून टाकले आहे. भ्रष्ट केले आहे. उत्पादनांची विक्री असो की मनोरंजन असो त्याच्या प्रेरणा या सेक्सच आहेत. आता दाढीची ब्लेड विकण्यासाठी बाईचाच वापर का केला जातो? पुरुषांची अंतर्वस्त्रे विकण्यासाठीही बाईच का लागते आम्हाला? दुकानांतही स्त्रियांची अंतर्वस्त्रे उन्मादक पुतळ्यांवर लावून ती दुकानासमोर सजवून ठेवलेली असतात. पुरुषांचे असे अर्धनग्न उत्तान पुतळे का नसतात दुकानांच्या समोर? पुरुषांची अंतर्वस्त्रे अशी टांगून का ठेवत नाही आम्ही? विखाराचे विष असे इंजेक्ट केले जाते... हे स्लो पॉयझिंनग सुरू असताना आम्ही त्याच्या झिंगेत असतो.
 
सेक्स व्हिडीओ गेम्स सर्रास विकले जातात. असे 500 सेक्स गेम्स बाजारात धडाक्यात विकले जात आहेत. आता मोबाईलवरही ते उपलब्ध आहेत. एक गेम बघा... एक आई तिच्या दोन तरुण मुलींसह रेल्वे स्टेशनवर आहे. हा मोबाईल गेम खेळणार्‍याने त्या आईवर यशस्वी असा बलात्कार करायचा आहे. म्हणजे त्याला पॉईंटस्‌ भेटतात आणि त्या बदल्यात त्याला त्या दोन मुलींपैकी एक मुलगी भेटत असते... हे असे गेम्स तीच माणसे खेळत असतात जी बलात्काराच्या अशा काही घटना घडल्यावर समाजशुचिता संपली म्हणून छाती बडवीत असतात. कॉलेजच्या पोरांच्या हातातील मोबाईलवरही असे गेम्स असतात... त्यातून काय इंजेक्ट होते?
सेक्स टॉईजचेही खूप मोठे मार्केट आहे. मेट्रो सिटीज्‌मध्ये लोकल रेल्वेस्थानकाच्या बाहेर खुल्यावर हे सेक्स टॉईज विकले जातात... आता अगदी गावखेड्यापर्यंत एकांताचे कोपरे नासविले गेले आहेत. पांढरपेशांच्या सुखवस्तू वसाहतींमधले बगिचे, शांत असलेले रस्ते किंवा एकांतात टाकलेले नगरसेवकी बाकडेही पोर्न कृती करण्याची सुरक्षित ठिकाणे झालेली आहेत. नागपूरसारख्या शहरातील प्रतापनगरसारख्या उच्चभ्रूंच्या वस्तीमधील माझ्या सदनिकेच्या बगिचाचे आल्हाददायक दृश्य दाखविणार्‍या खिडक्या बंद ठेवाव्या लागतात. घरांत वयात आलेली लेकरं असतात अन्‌ त्यांना ही जिवंत लैंगिक दृश्य बघण्यासाठी बाहेर जाण्याची गरजच नसते. सहज खिडकीजवळ उभे राहिले की समोरच्या मैदानाबाहेरच्या रस्त्यावर त्यांच्याच वयाची जोडपी वाट्टेल त्या अवस्थेत असतात...
 
कायद्याने काहीही होणार नाही. शिक्षा कुणाकुणाला करणार? किमान देशांतल्या 20 टक्के लोकांना शिक्षा करावी लागेल. त्यात दुकानाकडे पांथस्थांचे लक्ष जावे म्हणून स्त्रियांची अंतर्वस्त्रे टांगून ठेवणार्‍या दुकानदारालाही शिक्षा करावी लागेल... हे बदलायचे असेल तर माणसे बदलली पाहिजेत. या परिवर्तनाकडे कुणाचेच लक्ष नाही. सुरुवात आम्ही आमच्यापासून करायला हवी, असे तर कुणालाच वाटत नाही. त्यामुळे निषेधाच्या मेणबत्त्यांनी काही अंधार दूर होणार नाही...
-------
@@AUTHORINFO_V1@@