निफाड ड्रायपोर्टसाठी जमिनीची मोजणी सुरू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |

महसूल विभाग आणि भूमापन कार्यालयाने केला कामाला प्रारंभ

 
 
 
नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर ड्रायपोर्ट उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या असून, महसूल विभाग आणि भूमापन कार्यालयाच्या वतीने जमिनीच्या मोजणीस प्रारंभ झाला. निसाकाची मालमत्ता सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. या मालमत्तेपैकी १०८ एकर जमीन जेएनपीटीला ड्रायपोर्ट उभारणीसाठी १०५ कोटी रुपयांत देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी बँक पदाधिकार्‍यांसह बैठकही घेतली आहे. थकीत कर्जापोटी जिल्हा बॅँकेने एकरकमी कर्जफेड अंतर्गत १०५ कोटींत जिल्हा बॅँकेने निसाकाला कर्जातून मुक्त करावे, अशी सहकारमंत्र्यांची सूचना आहे. त्यासाठी बॅँकेने नाबार्डकडे प्रस्ताव पाठवावा, असेही सूचित केले आहे. असा प्रस्ताव सादर करणे, मंजुरी मिळविणे, जेएनपीटीकडे जमीन आणि बॅँकेकडे १०५ कोटी वर्ग होणे, हे सर्व दोन अडीच महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाले तर पुढील हंगामासाठी निसाकाला हंगामपूर्व कामे, करारमदार करण्यास वेळ मिळून निसाकाची चाके पुढील हंगामात फिरू शकतील, असे जाणकारांचे मत आहे.
पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौर्‍यावर येत असून, त्यावेळेस या प्रक्रियेस अधिक चालना मिळू शकेल, अशीही चर्चा आहे. दरम्यान महसूल यंत्रणा, भूमापन खात्याने १०८ एकर जमीन मोजणीस प्रारंभ केला आहे. निफाडचे प्रांत महेश पाटील यांनी यासंदर्भात शुक्रवारी निसाका कार्यस्थळाला भेट दिली. त्याचप्रमाणे बँक पातळीवरील प्रस्तावासंबंधी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. या प्रस्तावावर लवकर कार्यवाही होऊन निसाकाची चाके सुरू व्हावी, अशी ऊस उत्पादकांसह निफाडकरांची इच्छा आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@