हे कुठल्या दिशेनं चाललंय???

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |



 

 
आपल्या कार्यक्रमातून कबीर कला मंचने बाबासाहेबांचे लोकशाहीनिष्ठ विचार नव्हे, तर मार्क्स, माओ, लेनिन यांचे विखारी विचार पसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. भोळ्याभाब दलित समाजबांधवांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावासोबत माओचे नाव लावल्याचे, माओ म्हणजे नेमका कोण, त्याची विचारधारा कोणती, त्याचा भारताशी संबंध काय हे कधी समजलेच नाही.

राज्य पोलिसांनी ३१ डिसेंबरला पुण्यात नवी पेशवाई गाडण्यासाठी तथाकथित आंबेडकरवाद्यांनी घेतलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक असलेल्या कबीर कला मंच व रिपब्लिकन पॅँथरच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर आज धाडी टाकल्या. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून एल्गार परिषद, त्यानंतरची कोरेगाव-भीमा येथील दंगल, नंतरचा महाराष्ट्र बंद’ यातून इथल्या जनतेला वेठीस धरण्याचे कामया तथाकथित आंबेडकरवाद्यांनी केले. पुण्यात ज्यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव घेत एल्गार परिषद घेतली, ती परिषद कमी आणि सरकारविरोधातील गरळ ओकण्याचाच कार्यक्रम जास्त होता. याच परिषदेत राज्यातील भाजप सरकारला इतिहासातील पेशवाईची उपमा देत हे सरकार दलितविरोधी असल्याचे सांगितले गेले. हा प्रकार डॉ. आंबेडकरांचा ज्या लोकशाहीवर अफाट विश्वास होता, त्याला छेद देणाराच होता. पण, ज्यांना डॉ. आंबेडकरांचे नाव फक्त स्वार्थासाठी वापरायचे आहे, त्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. पेशवाईच्या याच उपमेतून पुढे राज्यात ठिकठिकाणी दंगली उसळल्या. एका तरुणाचा जीव गेला, कोट्यवधींच्या संपत्तीची हानी झाली आणि मुख्य म्हणजे आतापर्यंत एकजीव असलेली समाजमने दुभंगली गेली. राज्यातली सामाजिक परिस्थिती धगधगती राहिली तरच आपली स्वार्थाची पोळी भाजता येईल, ही खूणगाठ मनाशी बांधून डॉ. आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करत जातीयतेचे विष कालवण्यासाठी भुकेल्या लोकांनीच या घटना घडवून आणल्या. आज ज्या एल्गार परिषदेतील लोकांवरील, कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पॅँथरच्या कार्यकर्त्यांवरील धाडीमुळे राज्याला या जातीय विद्वेषाच्या आगीत ढकलणार्‍या शक्ती नेमक्या कोणत्या आहेत, याचा उलगडा व्हायला सुरुवात झाल्याचे म्हणावे लागेल. नक्षलवादी चळवळीशी संबंध असलेली ही मंडळी आहेत. दलित चळवळीला हे जितके घातक तेवढेच भारतासाठीही ते धोकादायक आहे. आता दलितांनी वेळीच या लोकांचा खरा चेहरा ओळखायला हवा.

राज्याच्या निरनिराळ्या भागात जाती-जातीत संघर्ष सुरू ठेवून सामाजिक सलोखा बिघडवायचा, आतापर्यंत मिळूनमिसळून राहत असलेल्या समाजात एकमेकांविषयी संशयाची भावना तयार करायची आणि त्यातून आपला मतलब साधायचा, ही नीती अवलंबत या मंडळींनी गेल्या काही काळापासून प्रामुख्याने दलित आणि वनवासी समाजाच्या वस्त्या-पाड्यांमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दलित समाज नेहमीच भावनेच्या आधारे विचार करणारा, निर्णय घेणारा म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ज्याच्या तोंडी तो आपला, असेही बहुतांश दलित समाजबांधवांना वाटते. दलितांच्या याच बाबासाहेबांप्रति असलेल्या भावनांचा गैरफायदा घेत कबीर कला मंचने दलितांना आपल्या जाळ्यात ओढले. विद्रोही शाहिरी, काव्य आणि साहित्याचा मोठा वारसा दलित समाजाला आहे. अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, विठ्ठल उमप, नामदेव ढसाळांसारख्या शाहीर आणि लेखकांचे नाव आजही दलित वस्त्यांसह सर्वत्रच आदराने घेतले जाते, पण कबीर कला मंचने वर उल्लेखलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणार्‍या व्यक्तींच्या नेमकी विरोधात भूमिका घेतली. गाणी आणि शाहिरीच्या साहाय्याने डॉ. आंबेडकरांचे नाव घेत दलितांना भुलवण्याचे, हिंदू समाजाविरोधात चिथावण्याचे, आपल्या गरिबी, मागासलेपणाला सवर्ण हिंदूच जबाबदार असल्याचे पटवून द्यायला सुरुवात केली. आपल्या प्रत्येक कार्यक्रमातून कबीर कला मंचने बाबासाहेबांचे लोकशाहीनिष्ठ विचार नव्हे तर मार्क्स, माओ, लेनिन यांचे विखारी विचार पसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले. डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुलेंच्या जयजयकाराच्या घोषणांसोबत हळूच माओच्या जयजयकाराच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. भोळ्याभाबड्या दलित समाजबांधवांना शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावासोबत माओचे नाव लावल्याचे, माओ म्हणजे नेमका कोण, त्याची विचारधारा कोणती, त्याचा भारताशी संबंध काय हे कधी समजलेच नाही. त्यांना तोही कोणी दीनदुबळ्यांच्या, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारा महापुरुष वाटला. पण मंचाच्या या उद्योगातून दलित समाजाला आपला लढा नेमका काय आणि कोणाविरुद्धचा तेच कळले नाही. जो शत्रू अस्तित्वातच नाही, त्याच्याविरोधात कबीर कला मंचने दलितांची माथी भडकावली, पण त्याचा फायदा दलित चळवळीला झालाच नाही. नक्षलवादी विचारांशी प्रामाणिक असलेल्या कबीर कला मंचने योजनाबद्धरित्या दलित आणि आंबेडकरी चळवळीला आपल्या सापळ्यात अडकवले. एल्गार परिषदेत तर डॉ. आंबेडकरांचे नाव घेत या लोकांनी जब जुल्म हो तब बगावत होनी चाहिए, शहर में- और बगावत ना हो तो, बेहतर हो के ये रात ढलने से पहले- ये शहर जलकर राख हो जाए, ये शहर जलकर राख हो जाए,’ अशी क्रांतीची चिथावणी दिली. हे डॉ. आंबेडकरांचे नव्हे तर कम्युनिस्टांचे समाज-सरकारविरोधी हिंसक विचार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरही याला बळी पडले. त्यांनीही नक्षल्यांचे हे विचार उचलून धरत त्यांना देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले. प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असल्याचे मिरवण्याऐवजी त्यांचे लेखन वाचले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आता दलित समाजाने तरी कोण खरेच आंबेडकरांच्या विचारांवर चालतोय, ते ओळखून त्याला साथ दिली पाहिजे, तरच ही दलित चळवळीला लागलेली कबीर कला मंचसारखी वाळवी नष्ट होईल.

‘‘आपली सांस्कृतिक अस्मिता ही आत्मशोधातून आंतरिक समृद्धता आणण्यात असते. इतरांचे अस्तित्व नष्ट करण्याकरिता नाही, याचे भान सुटले की सांस्कृतिक अराजकता निर्माण होते व त्यातून सामाजिक व राजकीय अराजकतेचा जन्म होतो,’’ ज्येष्ठ पत्रकार दिलीप करंबेळकर यांच्या लेखातील हे वाक्य. ते इथे देण्याचे कारण म्हणजे एल्गार परिषद असो वा कोरेगाव-भीमा येथील सभा, तिथे जमलेला दलित समाज आपल्या सांस्कृतिक अस्मितेपायीच आला होता. पण याचा गैरफायदा घेत तिथे भाषणे ठोकणार्‍या लोकांनी इतरांचे अस्तित्व नष्ट करण्याच्याच घोषणा आणि चिथावण्या दिल्या. त्यातून पुढचा सगळा अराजकतेचा अध्याय घडला. हे समाजसौहार्दाच्या दृष्टीने जेवढे घातक तेवढेच दलितांबद्दल इतर जातीसमूहांच्या मनात दरी निर्माण करणारेही. दलितांनी त्यामुळे आपले नेतृत्व कोणी करावे, याचा विचार करण्याची हीच ती योग्य वेळ आली असल्याचे म्हटले पाहिजे. कबीर कला मंच, प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवानी, रिपब्लिकन पँथरसारखे एकमेकांविरोधात संघर्ष करायला लावणारे नेतृत्व हवे की, सांस्कृतिक अस्मिता व आत्मशोधातून आंतरिक समृद्धता आणणारे नेतृत्व हवे, हे दलितांनीच ठरवायचे आहे.

 
शिक्षणाच्या आणि नोकरीच्या सवलती मिळाल्या की विकासाची शक्यता निर्माण होते, असे म्हणतात. पण शक्यता निर्माण झाली म्हणजे विकास होतोच असे नाही. शक्यता असूनही विकास का खुंटतो, याचे उत्तर इतरांशी भांडून मिळत नसते. ते आत्मपरीक्षण करून मिळत असते. सवर्ण हिंदू समाजाने आपल्याला मानाने समान म्हणून स्वीकारावे, यासाठी केवळ झगडा पुरत नसतो. त्यासाठी सौजन्य, कृतज्ञता यांचीही गरज असते. उठताबसता हिंदू धर्माला शिव्या देऊन, तुच्छ लेखून ते होत नसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे, या लेखात करतात. सध्या दलित चळवळीचे नेतृत्व मात्र अशाच इतरांना शिव्या देणार्‍यांच्या हाती गेले आहे. ते दलित चळवळीला पुढे घेऊन जाणार्‍या, सर्व समाजाला एका सूत्रात गुंफणार्‍या लोकांच्या हाती देण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे. कबीर कला मंच वा रिपब्लिकन पँथरसारख्यांच्या तावडीतून निसटून आपल्या समाजाला विकासाचा पथिक बनविण्याची हीच योग्य वेळ आहे. दलित समाजाने आता त्यासाठीच कंबर कसली पाहिजे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@