संवेदनशील घटनांचे भांडवल नका करू!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018   
Total Views |


कठुआ आणि उन्नाव येथील अत्यंत संवेदनशील घटनांवरून भाजप सरकारची जेवढी बदनामी करता येईल, तेवढी करण्याचे उद्योग चालू आहेत. येऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांची अशी पावले पडू लागली आहेत. भाजपला एकटे पाडण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. पण, केंद्र सरकारने आणि भाजपचे शासन असलेल्या राज्यांनी विरोधकांच्या अपप्रचारास सुप्रशासन देऊन उत्तर दिल्यास विरोधाचे मळभ सहज दूर होऊ शकेल.
 
सध्या संपूर्ण देशभर एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे जम्मू-काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे झालेल्या बलात्काराच्या घटनांची. या घटना लक्षात घेऊन देशातील पीडित मुलींना न्याय मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, तर बलात्काराच्या घटना सहभागी असलेल्या नराधमांना कठोरात कठोर शासन केले जाईल, असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगूनदेखील या घटनांचे निमित्त साधून केंद्रातील तसेच संबंधित राज्यांतील भाजप सरकारला बदनामकरण्याचे प्रयत्न विरोधकांकडून चालले असल्याचे दिसत आहे. बलात्काराच्या ज्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत, त्या अत्यंत घृणास्पद, माणुसकीला काळिमा फासणार्‍या आहेत. अशा घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अशा कुकृत्यात सहभागी झालेल्या नराधमांना कठोरात कठोर शासन व्हायलाच हवे, याबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. विविध प्रसिद्धीमाध्यमे, समाजमाध्यमे यावरून या घटनांचा निषेध केला जात आहे. पण, या घटनांचे निमित्त साधून भाजप सरकारविरुद्ध लोकांना कसे भडकविता येईल, असा प्रयत्न कॉंग्रेससह काही राजकीय पक्षांनी चालविला आहे. या अत्यंत संवेदनशील घटनांचे भांडवल करून भाजपची, केंद्र सरकारची बदनामी कशी करता येईल, असा प्रयत्नही भाजपद्वेषाची कावीळ झालेल्या काही नतद्रष्ट लोकांकडून केला जात आहे.

उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपचे सरकार आहे. कठुआ बलात्कारप्रकरणी आरोपींच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतल्याबद्दल आणि पोलीस चौकशीबद्दल शंका उपस्थित केल्याबद्दल भाजपच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. अशीच मागणी जम्मू-काश्मीर कॉंग्रेसचे अध्यक्ष गुलामअहमद मीर यांनीही केली होती. त्याबद्दल त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉंग्रेसच्या दुटप्पी वागण्यावर टीका केली. ते म्हणाले, ’’आमच्या मंत्र्यांनी जेव्हा अशाच भावना व्यक्त केल्या होत्या, त्यावेळी कॉंग्रेस पक्ष आणि माध्यमांनी आकाशपाताळ एक केले होते. आम्ही कारवाई केली. आमच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. मेणबत्ती मोर्चाचे नेतृत्व करणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या प्रदेशाध्यक्षावर कारवाई का करीत नाहीत?, असा आमचा त्यांना सवाल आहे. राहुल गांधी हे इतरांकडे बोटे दाखवितात, पण आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाबाबत मौन बाळगतात,’’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

कठुआ आणि उन्नावमधील घटना पाहून भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलेल्या माजी ४९ अधिकार्‍यांचा कंठ अचानक दाटून आला आहे. ही घटना काळीकुट्ट असल्याची टीका करून त्याबद्दल या मंडळींनी उजव्या विचारसरणीचे राजकारण आणि संघ परिवार यांच्यावर ठपका ठेवला आहे. देशाला खाली मान घालावयास लावणार्‍या घटना याआधीही घडल्या आहेत. तेव्हा त्यांनी डोळ्यावर झापडे बांधली होती, असे म्हणायचे का? या मंडळींनी सरळसरळ कॉंग्रेसची तळी उचलण्यासाठी आणि संघ परिवारास बदनामकरण्यासाठीच ही खेळी खेळली आहे, हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल. या ४९ अधिकार्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण नागरिक म्हणून आणि कोणाशीही संलग्न नसल्याचे नमूद करून हे पत्र लिहीत असल्याचे म्हटले आहे. कठुआ आणि उन्नाव येथील घटना रोखण्यात तेथील प्रशासन अपयशी ठरले असल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला असता तरी ते समजू शकले असते, पण यात संघ परिवारास नाहक गोवण्याचा सल्ला तुम्हा हुशार मंडळींना कोणी दिला? कोणतीही घटना घडली की, संघ परिवारास जबाबदार धरण्याची जी सवय काही पक्षांना लागली आहे, त्यात तुम्ही कशाला सामील होता?

कठुआ आणि उन्नाव येथील अत्यंत संवेदनशील घटनांवरून भाजप सरकारची जेवढी बदनामी करता येईल, तेवढी करण्याचे उद्योग चालू आहेत. येऊ घातलेल्या विधानसभा आणि २०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांची अशी पावले पडू लागली आहेत. कोणतेही निमित्त साधून भाजपला एकटे पाडण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. पण, केंद्र सरकारने आणि भाजपचे शासन असलेल्या राज्यांनी विरोधकांच्या अपप्रचारास सुप्रशासन देऊन उत्तर दिल्यास विरोधाचे मळभ सहज दूर होऊ शकेल.


समाज तोडण्याचे राजकारण नाही


कठुआ आणि उन्नाव घटनांवरून भाजपविरुद्ध रान पेटविण्याचे विरोधकांचे प्रयत्न चालू असतानाच, ‘‘देशातील विविध घटनांसंदर्भात भाष्य करताना, आम्ही समाजात दुही माजविण्याचे, फूट पाडण्याचे राजकारण करीत नाही,’’ असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले आहे. कठुआमधील घटना दुर्दैवी, अत्यंत दु:खद आणि लज्जास्पद असल्याचे सांगून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका प्रसिद्ध दैनिकास दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, केंद्र सरकार विविध आघाड्यांवर अपयशी ठरत असल्याचा मुद्दा खोडून काढला; उलट सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांमुळे सामान्य जनतेस कसा लाभ झाला हे स्पष्ट केले. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, जीवन ज्योती योजना, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कसे भले होत आहे, हे स्पष्ट केले. देशातील नक्षल समस्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, तसेच पूर्वांचल राज्यातील घुसखोरी मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

अलीकडेच दलित समाजाने केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, ‘‘आता निवडणुका जवळ येऊ लागल्याने काही शक्ती आपल्या राजकीय लाभासाठी लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, आपले हित साधणारे केवळ हेच सरकार आहे, हे दलित समाजास चांगले कळून चुकले आहे. दलित समाज आणि उपेक्षित वर्ग यांच्यासाठी आम्ही अनेक योजना राबविल्या आहेत. दलित समाज हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत जागरूक झाला आहे. त्या समाजास कोणीही फसवू शकत नाही. समाजात फूट पाडून, दुही माजवून राजकारण करणे, हे आमच्या विचारधारेत बसत नाही,’’ असे राजनाथ सिंह यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. २०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांचा आघाडी करण्याचा प्रयत्न चालला आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता आपण एकेकटे भाजपला हरवू शकत नाही, हे त्या पक्षांच्या लक्षात आले आहे. भाजपची ताकद त्यांनी निर्विवादपणे मान्य केल्याचेच यावरून दिसून येत आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

‘‘कठुआ आणि उन्नाव येथील घटनांवरून भाजप सरकारची यथेच्छ बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न चाललेला असतानाच, समाजात फूट पाडण्याचे राजकारण भारतीय जनता पक्षाला करायचे नाही,’’ असे भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते पाहता कोणाची पावले कशी पडत आहेत याची कल्पना यावी.


- दत्ता पंचवाघ
@@AUTHORINFO_V1@@