नाशिकमधून १ लाख ८० हजार टन द्राक्षांची निर्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2018
Total Views |
 
 
नाशिक : यावर्षी आतापर्यंत युरोपीय देशांमध्ये ९० हजार ५०० तर नॉन युरोप देशांत ९० हजार मेट्रिक टन अशी एकूण १ लाख ८० हजार ५०० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. ही निर्यात मागील वर्षांच्या तुलनेत कमी असली तरी २ लाख मेट्रिक टनांपर्यंत यंदाची निर्यात जाणार आहे. द्राक्ष निर्यातीबाबत द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी ही माहिती दिली.
 
गेल्या वर्षी निर्यातक्षम द्राक्षाला चिली या देशातील द्राक्षांशी स्पर्धा करावी लागली. यावर्षी मात्र चिलीलाही नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदा चिलीची द्राक्षे युरोपीय तसेच इतर देशांमध्ये पोहोचली नसल्याने भारतीय द्राक्षांना अजूनही मागणी आहे. असे असूनही नैसर्गिक संकटामुळे उत्पादन घटल्याने देशाचे नुकसान झाले आहे, असे खापरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी नैसर्गिक संकटावर मात करीत द्राक्षउत्पादकांनी द्राक्ष शेती फुलवली. तरीही नैसर्गिक प्रतिकूलतेचा द्राक्ष उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे सरासरी ३५ लाख मेट्रिक टन द्राक्षांचे होणारे उत्पादन यावर्षी ४० ते ४५ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी २० ते २२ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. त्यात उत्पादकांनी गुणवत्ता टिकवून द्राक्ष उत्पादन घेतल्याने मोठी निर्यात झाल्याचे खापरे यांनी नमूद केले.
 
बांगलादेशात द्राक्ष निर्यात करताना पांढरी द्राक्षे ५५ तर काळी द्राक्षे ७५ रु. प्रतिकिलो एक्साईज ड्युटी भरावी लागत आहे. आज बांगलादेशात ३० ते ३५ हजार मेट्रिक टन निर्यात झाली आहे. त्यामुळे भारत सरकारने बांगलादेशाशी विचारविनिमय करून ही ड्युटी कमी केल्यास तेथे भारतीय द्राक्षांची बाजारपेठ वाढू शकेल, असा विश्वास निर्यातदारांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी एका एकरात १५० ते १८० क्विंटल उत्पादन घेतले गेले. आज नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात घट होऊन ते ७५ ते १०० क्विंटल निघाले. स्थानिक बाजाराप्रमाणे २ ते ३ लाख रुपये तर निर्यातीचा विचार करता ३ ते ५ लाख रुपये इतके द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाल्याचे द्राक्ष उत्पादक मंगेश गवळी यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@