हिंदू दहशतवादाचा बुडबुडा फुटला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |



 
 
पी. चिदंबरम् असो वा राहुल गांधी वा काँग्रेसी लोक, त्यांना फक्त हिंदूद्वेषाची शिकवण मिळाली आहे. हिंदूंना जितके बदनाम करता येईल, तेवढे बदनाम करायचे, इथल्या पुरोगामी, बुद्धीजीवींना खुश ठेवायचे आणि आम्ही किती धर्मनिरपेक्षतावादी म्हणत देशभर मिरवायचे, हेच त्यांचे काम. तिकडे हिंदूंच्या आयुष्याची माती झाली तरी आम्ही आमची स्वार्थी सत्तेची भूक शमविणारच, हा त्यांचा आवडता उद्योग. पण मतदाराने काँग्रेसींचा बुरख्याआड लपलेला चेहरा वेळीच ओळखला आणि २०१४ साली त्या पक्षाला भुईसपाट करून सोडले. 
 
 
 
हैद्राबादमधील मक्का मशिदीत २००७ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह पाचही आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. येथे ‘पुराव्याअभावी’ हा शब्द महत्त्वाचा असून त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात मान्य केले. म्हणजेच स्वामी असीमानंद यांच्यासह अन्य आरोपींना केवळ हिंदूद्वेषापोटी आणि हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करता यावा म्हणूनच अटक केल्याचे स्पष्ट होते. ही अटक काँग्रेस सरकारने केली आणि तीही फक्त हिंदू समाजाला, हिंदुत्वनिष्ठांना बदनाम करण्यासाठी! या बदनामीकरणाच्या कार्यातून काँग्रेसला आपली सत्तेची पोळी भाजता यावी, जनसामान्यांमध्ये हिंदू धर्म, हिंदुत्वनिष्ठांबद्दल तिरस्काराची भावना निर्माण व्हावी आणि आपली मुसलमान मतपेढी शाबूत ठेवता यावी, ही योजना होती. गेली जवळपास ११ वर्षे काँग्रेसने याच योजनेनुसार काम केले. आपल्या दाढी कुरवाळू राजकारणापायी स्वामी असीमानंद यांच्यासह हिंदुत्वनिष्ठांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. हे काँग्रेसी परंपरेला तसे साजेसेच. बहुसंख्य हिंदूंच्या सहिष्णुपणाचे, धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गात त्यांना चुचकारायचे आणि अल्पसंख्य मुसलमानांचे लांगूलचालन करायचे, ही काँग्रेसची स्वातंत्र्यापूर्वीपासूनची नीती. स्वातंत्र्योत्तर काळातही काँग्रेसने हीच नीती सुरू ठेवली. मुसलमानी मतांची एकगठ्ठा खैरात मिळावी म्हणून काँग्रेसने हिंदूंचा कायमच बळी दिला. स्वामी असीमानंदांच्या आधी काँग्रेसने मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी असेच केले. कोणतेही पुरावे नसताना साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना वर्षानुवर्षे कारागृहात डांबून ठेवले, पण न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांचीही निर्दोष मुक्तता केली. स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांची मुक्तता म्हणजे हिंदुत्वनिष्ठांवर लावण्यात आलेला दहशतवादाचा आरोप पुसला गेल्याचे प्रतीक आणि काँग्रेसचा मुसलमानांसाठी, त्यांच्या मतांसाठी लाळघोटेपणा करण्याचा उत्तम नमुना. आता कोणतेही पुरावे नसताना स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आणि अन्य आरोपींची जी १०-१२ वर्षे तुरुंगाच्या काळकोठडीत सडण्यात गेली, त्याची भरपाई कोण करणार? फक्त स्वतःचा हिंदूद्वेषाचा कंड शमविण्यासाठी स्वामी, साध्वी, पुरोहित यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्‍या काँग्रेसचा चेहरा खरे तर या न्यायालयीन निकालांमुळे देशासमोर उघडा पडला. राहुल गांधींनी गुजरात निवडणुकांच्या काळात हिंदूंच्या मतांसाठी हाती झोळी घेऊन मंदिरांत हेलपाटे मारण्याचे काम केले. त्यांनी स्वतःला ‘जानवेधारी हिंदू’ म्हणूनही लोकांपुढे सादर केले. आता राहुल गांधी स्वामी असीमानंद आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांना फक्त मुसलमान समाजाला, पुरोगामी बुद्धिजीवींना खुश करण्यासाठी तुरुंगात टाकल्याचे मान्य करत माफी मागतील का? आपण खरोखर हिंदूंची चिंता, काळजी करतो, हिंदूंच्या भावभावना समजून, जाणून घेतो, त्याचा आदर करतो, असे जाहीर करत खरोखरच हिंदूही आपल्याला मुसलमानांइतकेच प्रिय असल्याचे दाखवून देतील का? की निवडणुका संपल्या तशा त्यांचा हिंदूहितवादी विचारही संपला?
  
 
आज न्यायालयाने मक्का मशीद बॉम्बस्फोटप्रकरणी निकाल दिल्यानंतर गृहमंत्रालयाचे माजी अधिकारी आर. वी. एस. मनी म्हणाले की, “या प्रकरणात हिंदू दहशतवादाचा कुठलाच पुरावा नव्हता. मला याच निकालाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या खटल्यात अनेक पुराव्यांशी छेडछाड केली असून सर्वच लोकांना जाणूनबुजून अडकविण्यात आल्याचे ते म्हणाले. ‘हिंदू दहशतवादा’ची संकल्पना माजी गृहमंत्री पी. चिदंबरमयांनी मांडत हिंदूंना बदनाम करण्याचे धोरण स्वीकारले. सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी यांनीही तेच केले. गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांनी कित्येकदा मालेगाव आणि मक्का मशीद बॉम्बस्फोटाचा उल्लेख करत तमाम हिंदुत्वनिष्ठांना ‘दहशतवादी’ म्हणत बदनाम करण्याचे काम केले. पी. चिंदबरमयांनी हे काम नेमके का केले? कोणाला खुश करण्यासाठी केले? गृहमंत्रालयाच्या माजी अधिकार्‍याने पुराव्यांशी छेडछाड केल्याचे सांगितले, ती छेडछाड पी. चिदंबरम यांच्या संमतीनेच झाली ना? आता पी. चिदंबरम भाजपवर रोजच तोंडसुख घेताना दिसतात. भाजपची प्रत्येक गोष्ट चुकीची असल्याचे ते नेहमीच खरडतात, बोलतात. मग आपल्या कार्यकाळात हिंदू दहशतवादाचे भूत उभे करण्याची, पुरावे नसतानाही हिंदुत्वनिष्ठांना बॉम्बस्फोटांत अडकविण्याची ही बदमाशी चिदंबरम् यांनी का केली? मुसलमानी मतांच्या पेट्या आपल्या झोळीत रिकाम्या व्हाव्यात म्हणूनच ना. पण चिदंबरम् यांच्या या कृत्यामुळे किती लोकांचे आयुष्य बरबाद झाले, किती लोकांची हयात वाया गेली, याचा कोणी विचार करणार की नाही? पण पी. चिदंबरम् असो वा राहुल गांधी वा काँग्रेसी लोक, त्यांना फक्त हिंदूद्वेषाची शिकवण मिळालीय. हिंदूंना जितके बदनाम करता येईल, तेवढे बदनामकरायचे, इथल्या पुरोगामी, बुद्धीजीवींना खुश ठेवायचे आणि आम्ही किती धर्मनिरपेक्षतावादी म्हणत देशभर मिरवायचे, हेच त्यांचे काम. तिकडे हिंदूंच्या आयुष्याची माती झाली तरी आम्ही आमची स्वार्थी सत्तेची भूक शमविणारच, हा त्यांचा आवडता उद्योग. पण मतदाराने काँग्रेसींचा बुरख्याआड लपलेला चेहरा वेळीच ओळखला आणि २०१४ साली त्या पक्षाला भुईसपाट करून सोडले. आता तर न्यायालयीन निकालांमुळे काँग्रेसवर न्यायालयानेदेखील हिंदूविरोधी असल्याचे शिक्कामोर्तब केल्याचे म्हणावे लागेल.
 
 
मक्का आणि मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी हिंदू दहशतवादाची हाळी देत त्यागाच्या भगव्या रंगाला कायमच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. जेव्हा जेव्हा धर्मांध मुसलमान दहशतवाद्यांकडून देशभरात हल्ले झाले, तेव्हा तेव्हा काँग्रेसी नेत्यांनी, पुरोगाम्यांनी दहशतवादाला धर्म नसल्याचे कानीकपाळी ओरडून सांगितले. मुसलमानांकडून जेव्हा दहशतवादी कारवाया केल्या जातात, तेव्हा भंपक पुरोगाम्यांना त्याचा कुठलाही रंग दिसत नाही. त्यावेळी रंगाच्या मामल्यात त्यांची तोंडे शिवली जातात. पण जेव्हा कोणी हिंदू व्यक्ती अशा घटनेत अडकतो तेव्हा तेव्हा हा हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद असल्याच्या कंड्या पिकवल्या जातात. यातूनच या लोकांच्या तनामनात फक्त आणि फक्त हिंदूद्वेष भिनल्याचे स्पष्ट होते. आता न्यायालयाने असे काही नसल्याचे, हिंदू दहशतवाद अस्तित्वातच नसल्याचे सांगितले. आता ही हिंदूंवर नेहमीच भुंकणारी मंडळी आपण चुका केल्याचे मान्य करतील का? हिंदूंविरोधी प्रचाराची जी राळ या लोकांनी उडवली होती, ती चुकीची असल्याचे तितक्याच जोरकसपणे सांगतील का? तर नाही, यांच्या रक्तातच हिंदूद्वेष भिनल्याने जे जे वाईट हिंदूंच्या माथी मारता येईल, ते ते मारायचे आणि कुठे हिंदू निर्दोष दिसला की, शहामृगासारखी मातीत चोच खूपसून बसायचे, हेच यांचे काम. त्यामुळे ते तसे करणार नाहीत. पण हिंदू समुदायाने तरी या लोकांचे दाखवायचे दात वेगळे असल्याचे आणि खायचे दात वेगळे असल्याचे समजून घ्यायला हवे. एका छत्राखाली संघटित होत या लोकांच्या कारस्थानांना बळी न पडता यांच्याच कुटिल कारस्थानांच्या चिंधड्या उडवल्या पाहिजेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@