रा.स्व. संघाची 'अखिल भारतीय चिंतन बैठक' उद्यापासून पुण्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |
 
 
 
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय चिंतन बैठक उद्या पासून म्हणजेच १७ एप्रिल पासून पुण्यात सुरु होत आहे. ही बैठक १७ ते २१ एप्रिल २०१८ या काळात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह संपूर्ण अखिल भारतीय कार्यकारिणी तसेच क्षेत्र संघचालक, क्षेत्र कार्यवाह आणि क्षेत्र प्रचारक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी आज दिली. पुण्यातील मोतीबाग येथील संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार हे देखील उपस्थित होते.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दर १०-१५ वर्षांमध्ये एकदा ही बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीत गेल्या १०-१२ वर्षात संघ कामाचा झालेला विस्तार, संघ कार्याची दिशा, समाजात सुरु असलेल्या घडामोडी तसेच पुढील वाटचालीबद्दल चर्चा करण्यात येते. या आधी ही बैठक २००७ मध्ये धर्मस्थळ येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी ही बैठक पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

'ते' आंबेडकरांचे खरे अनुयायी नाहीतच :

यावेळी माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले की, "समाजात काही अराजक तत्वे आहेत ज्यांच्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यांच्याविषयी देखील या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. नुकतेच अॅट्रॉसिटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या निर्णयाविरोधात समाजातील काही लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. ही अराजकता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेवून केली जात होती. संघ याचा निषेध करतो. हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी नाहीतच. बाबासाहेबांनी नेहमी समाजातील जातीभेद दूर करून संपूर्ण समाजाला एक करण्याचा प्रयत्न केला होता, संघाची विचारसरणी देखील यालाच अनुसरुन आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे नाव घेवून समाजात जातीय तेढ निर्माण करणारे लोक त्यांचे खरे अनुयायी नाहीतच." असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 
रा. स्व. संघाशी जोडल्या जाणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात अनेकांचा सहभाग असतो. गेल्या काही वर्षांमध्ये संघात येणाऱ्या लोकांची तसेच संघ विचारांशी जोडल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रा.स्व. संघाच्या संकेतस्थळावर 'जॉईन आरएसएस' ही सुविधा २०१२ मध्ये सुरु झाली. त्यानंतर या संख्येत तीव्रतेने वाढ झाली. २०१२ मध्ये संघात येणाऱ्या लोकांची संख्या १३ हजार होती. २०१३ मध्ये हा आकडा वाढून १८ हजारांवर गेला. तर २०१४-२०१६ या काळात या संख्येत वाढ होवून हा आकडा ८५ हजार झाली. गेल्या वर्षी २०१७ मध्ये हा आकडा १ लाख २५ हजारांवर पोहोचला, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
 
२०१९ च्या निवडणुकीबद्दल कुठलीही चर्चा होणार नाही :

अखिल भारतीय चिंतन बैठकीत २०१९ च्या निवडणुकीबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यात येणार नाही, असे मनमोहन वैद्य यांनी यावेळी जाहीर केले. पूर्ण माहिती नसल्याने अनेकदा माध्यमांचा गैरसमज होतो त्यामुळे काय करण्यात येणार नाही याची देखील माहिती देण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
@@AUTHORINFO_V1@@