सृजनोत्सव...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |
 
 
कौसल्याराणी हळू उघडी लोचने
दिपून जाय, माय स्वत: पुत्रदर्शने
ओघळले आसू, सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
 
 
ग. दि. माडगुळकरांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि सुधीर फडकेंच्या मुग्ध संगीताने सुरेल झालेल्या गीत रामायणातल्या या ओळी, स्वत: आई झाल्यानंतर मला फारच भुरळ घालतात. ‘ओघळले आसू, सुखे कंठ दाटला’ अशी सुंदर संमिश्र भावना जणू जगातल्या सर्व पालकांना एकमेकांशी एका धाग्याने जोडते. यातला काव्याचा भाग बाजूला ठेवला तरी जन्माला येणारं मूल हा सृजनाचा अविष्कार बहुतांश घरांमध्ये नवचैतन्य निर्माण करत असतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवी मूल हे जन्माला येताना आणि त्यानंतरही बराच काळ पालकांवर अवलंबून असते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, जन्माच्या आधी गर्भावस्थेत मुलांचा भावनिक विकास होत नाही. मूल आई-बाबाच्या आवाजाला, स्पर्शाला गर्भातून प्रतिसाद देत असते. अनोळखी आवाज व स्पर्श यातून आपल्या ओळखीच्या आवाजाची व स्पर्शाची स्पंदने मुलांना गर्भावस्थेतही ओळखता येतात. सुरेल व शांत संगीताचा दीर्घकाळ चांगला परिणाम गर्भातील जीवावर होतो याचे पुरावे उपलब्ध आहेत. अर्थात काही विशिष्ठ ध्वनीलहरी ऐकल्यावर गर्भामध्ये मेंदूची वाढ जास्त प्रमाणात, अधिक वेगाने होते याला मात्र काही शास्त्राधार नाही. गर्भार्पणातील आईची मानसिकता व त्याचा गर्भातील जीवावर होणारा परिणाम, याविषयी अनेक अभ्यास झाले आहेत. निष्कर्ष सांगतात की, गर्भावस्थेतील मूल प्रेम, आनंद, दु:ख, तणाव यासारख्या भावना समजू शकते. गरोदर स्त्रीचे विशेष लाड पुरवण्यासाठी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये प्रचलित असलेले कार्यक्रम हे याचंच द्योतक असणार.
 
समुपदेशनाला सुरूवात करण्याआधी नोंदवून घेतलेल्या सविस्तर माहितीमध्ये गर्भावस्थेतील आईची मानसिकता हा प्रश्न याकरिताच महत्त्वपूर्ण ठरतो. मी आणि माझी एक सहकारी लंडनमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसतर्फे नवीन मातांसाठी नियमित वर्ग घ्यायचो. महिना-सव्वा महिन्याची १०-१२ मुले आणि त्यांच्या माता एका खोलीत जमलेल्या असायच्या. मुलांना सांभाळत आमच्याशी संवाद साधताना या आयांची कसरत व्हायची खरी. परंतु, मुलांच्या वाढीबद्दल मिळणारे ज्ञान त्यांना खूप महत्वाचे वाटायचे. शिवाय साधारण सारख्या परिस्थितीतून जाणार्‍या या स्त्रियांना एकमेकींचा आधार वाटायचा हा अजून एक फायदा. इंग्लंडसारख्या व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या देशात आठवड्यातून काही तास तरी समान अनुभवांतून जाणार्‍या सख्यांची साथ त्यांना बळ देत असणार, हे निश्चित. अशाच एका गटात एका जरा काळजीवाहू आईने विचारले, ‘‘माझ्या मुलाच्या चेहर्‍याच्या जवळ जर मी माझा चेहरा नेला तर माझे मोठे डोळे, नाक, तोंड पाहून तो घाबरेल का?’’ हा प्रश्न तिने इतक्या निरागसपणे विचारला की तिला क्षणभर मिठी मारायचा मोह मला आवरला नाही. मग मी तिला सांगितले, ज्ञानेंद्रियांना, हातापायांना विशिष्ट कामे वाटून देण्याची कला माणूस कालांतराने शिकतो. लहान मूल सर्व ज्ञानेंद्रिये उघडी ठेवून मिळेल ती माहिती ग्रहण करत असते. शिवाय जन्माला आल्यानंतर चार-सहा महिन्यांपर्यंत मुलांची नजरेची कक्षा मर्यादित असते. त्या पलीकडचे त्यांना धूसर दिसते. तेव्हा तुझ्या मुलाच्या चेहर्‍याजवळ तुझा चेहरा जरूर ने. त्याला त्याच्या आईला डोळे भरून पाहू दे; तिचा भुलवणारा आवाज ऐकू दे; ओठांनी तिची चव पाहू दे; श्वासाबरोबर तिचा आश्वासक गंध घेऊ दे; आणि तिच्या उबदार स्पर्शात त्याला सुरक्षित वाटू दे. तुझ्या माध्यमातून त्याला समाजाची पहिली ओळख होत आहे. तेव्हा समाजात जगण्याची ऊर्जा त्याला वारंवार देत राहा.
मूल जन्माला येते आणि त्याच्याबरोबरच आई-बाबादेखील जन्माला येतात. बाल्यावस्थेतल्या, आपल्यावर बहुतांशी अवलंबून असणार्‍या या जीवाला सांभाळणे ही फारच आव्हानात्मक गोष्ट आहे. याच काळात मूल अतिशय वेगाने विकसितही होत असते. त्यामुळे त्या वेगाशी जुळवून घेताना पालकांची तारांबळ उडते. अशावेळी जर मानवी विकासाचे शास्त्रशुद्ध ज्ञान सोबत असेल तर हा सृजनोत्सव चिंतामुक्तपणे व जास्त आनंदाने साजरा करता येतो.
 
 
 
- गुंजन कुलकर्णी
(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@