अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पाहणीचे विभागीय आयुक्तांचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2018
Total Views |

तहसीलदारांनी तलाठी आणि कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेमार्फत पाहणी करण्याचे निर्देश

 
 
 
नाशिक : जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी आणि त्यापूर्वीच्या काही दिवसांमध्ये पाऊस झाला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन वेगात कामास लागले असून दोन दिवसांत प्राथमिक अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.
 
या अवकाळी पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून मिरची, कांदा, टोमॅटो, द्राक्ष आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील निकवेल, कंधाणे, जोरण, दहिंदुले भागात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जायखेडा, सोमपूर, आसखेडा, तांदुळवाडी, ब्राह्मणपाडे या भागात उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला. देवळा आणि कळवणमध्येही शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप सरकारने दिले नसले तरी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर नुकसानाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.
 
त्यानुसार संबंधित तालुक्यांमधील तहसीलदारांनी तलाठी आणि कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेमार्फत नुकसान झालेल्या शेतांमध्ये पाहणी करावी, त्याबाबतची माहिती तसेच छायाचित्रे घ्यावीत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिले आहेत. त्यानुसार तलाठ्यांपासून तहसीलदारांपर्यंतची यंत्रणा कामाला लागली असून दोन दिवसांत याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त होणार आहे. उन्हाळा सुरू होऊन महिन्याचा कालावधी होत नाही, तोच वातावरणात मोठे बदल होऊन जिल्ह्यासह राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत गेल्या चार दिवसांपासून अवकाळीची हजेरी लागली आहे, तर गुरुवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात सायंकाळी अचानक गारांसह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. ग्रामीण भागात सटाणा, देवळासह कळवण तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सटाणा तालुक्यातील मोसम खोर्‍यासह पश्‍चिम आदिवासी पट्ट्यात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या.
 
@@AUTHORINFO_V1@@