वनवासी समाजाने संघर्षरत राहून हिंदू संस्कृती टिकवली : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |



 
  

६० हजार नागरिकांच्या उपस्थितीत विराट हिंदू समेलन

पालघर: जो शेवटपर्यंत लढला परंतु दुष्ट शक्तींना शरण गेला नाही तो आदिवासी समाज. आदिवासी समाजाने कायम सनातन हिंदुत्व आणि वैदिक परंपरा जपण्याचे कार्य केले आहे. वनवासी हा आपला बंधू आहे, पण आपण त्याला उपेक्षित ठेवले. असे करून चालणार नाही. आपल्या मुलाबाळांना, उर्वरित समाजाला त्याचा परिचय करून दिला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत हे संचित पोहोचविले पाहिजे. परस्परांतील एकता जपली पाहिजे. त्यांना प्रगतीची संधी दिली पाहिजे. स्वतःच्या उत्पन्नाचा एक तृतीयांश हिस्सा आणि आयुष्यातील एक तृतीयांश वेळ या समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला, तर लवकरच हा समाज मुख्य प्रवाहात येईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला.

विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरणेतून तलासरी येथे सुरू झालेल्या जनजाती वसतिगृह प्रकल्पाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या निमित्ताने डहाणू येथे आज विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सवितानंदजी महाराज, बालयोगी सदानंद महाराज, महामंडलेश्वर बाप्पा, अशोकजी चौगुले, देवकीनंदन जिंदाल आदी मान्यवरदेखील उपस्थित होते.

सरसंघचालक पुढे म्हणाले की, “भाषा, प्रांत, जातीची ओळख सांगताना आपले हिंदू असणे ही मुख्य ओळख आपण विसरत चाललो आहोत. आपल्या आयुष्याच्या प्रवासातील हिंदू असणे हे महत्त्वाचे जंक्शन आहे. आपल्यासारख्या पाथिकांना हे जंक्शन सापडू नये म्हणून अनेक जण धडपडत आहेत. भारतात हिंदुत्वाचे स्मरण कोणाला होऊ नये यासाठी मेकॉलेपासून अनेकांनी प्रयत्न केले आहेत. सध्या त्याचाच कित्ता ठराविक मंडळी गिरवत आहेत. त्यांच्यापासून दूर राहणे आणि हिंदू ही ओळख जपण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे.’’

सुमारे ६० हजार उपस्थिती असणार्‍या या विराट हिंदू संमेलनाला, पालघर जिल्ह्याच्या सुदूर वनवासी भागांतून हिंदू बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून वन-जन गाथा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सरसंघचालकांनी विराट हिंदू संमेलनानंतर तलासरी येथील ५० वर्ष पूर्ण करणार्‍या प्रकल्पाला भेट दिली.

 

...तर स्वार्थाची दुकाने बंद होतील!

“समाजातील एकजूट कायम राहिली तर अनेकांची स्वार्थाची दुकाने लवकरच बंद होतील. गोड बोलून, आपला कळवळा दाखविणारी आणि धर्मांतर करणारी ही मंडळी मायावी आहेत. दोन बोक्यांच्या भांडणात लोणी खाऊन जाणारी ही माकडाची प्रजात आहे. अशांपासून आपण सजग राहणे आवश्यक आहे,’’ असा इशारा देतानाच सरसंघचालकांनी तलासरी प्रकल्पाने असे अनेक सजग कार्यकर्ते तयार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

 

राममंदिर उभारल्यास संस्कृतीचे मूळ कापले जाईल

“राममंदिर उद्ध्वस्त करणारा भारतातील मुस्लीम समाज नव्हता. भारतीय नागरिक असे करूच शकत नाही. परकीय शक्तींनी भारतीयांचे खच्चीकरण करण्यासाठी येथील मंदिरे उद्ध्वस्त केली, पण आज आपण स्वतंत्र आहोत. जे जे उद्ध्वस्त आहे, ते ते पुन्हा उभे करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कारण ही केवळ मंदिरे नव्हे, तर आमच्या अस्तित्वाची ओळख आहेत. राममंदिर उभे राहिले नाही तर आमच्या संस्कृतीचे मूळ कापले जाईल. मंदिर जेथे होते, तिथेच ते बनणार यात शंकाच नाही,’’ अशा शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपले मत केले.

@@AUTHORINFO_V1@@