राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६६ पदकांसह भारत तिसऱ्या स्थानावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे गेल्या दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची अखेर काल सांगता झाली. या स्पर्धेत भारताने उत्तम खेळाचे प्रदर्शन कर पहिल्या तीन क्रमांमध्ये स्थान मिळवलं आहे. एकूण ६६ पदकांची कमाई करत भारत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
 
 
 
 
या स्पर्धेत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या स्थानावर इंग्लंड आहेत. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच भारताचे नाव पहिल्या तीन क्रमांमध्ये घेण्यात आले आहे.
भारताने या खेळांमध्ये २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदाकांसह एकूण ६६ पदकांची कमाई केली. सर्व भारतीय खेळाडूंनी आपले उत्तम प्रदर्शन करण्यासाठी वर्षभर भरपूर मेहनत घेतली होती. त्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे, असे या राष्ट्रकुल खेळांमध्ये स्पष्ट झाले आहे.
 

कोणत्या क्रीडा प्रकारात भारताने उत्तम कामगिरी केली याचा लेखा जोखा :

नेमबाजी :

नेमबाजीच्या स्पर्धेत देखील भारताने अतिशय उत्तम कामगिरी केली. या क्रीडा प्रकारात भारताने एकूण १६ पदके पटकावत आपल्या देशाचे नाव उंच केले आहे. नेमबाजीत यावेळी भारतीय नेमबाजांनी ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई केली आहे. आशीष भानवाला, मनु भाकेर, जीतू राय, हीना सिधू, संजीव राजपूत, तेजस्विनी सावंत आणि श्रेयसी सिंह यांनी सुवर्ण पदकांची कमाई करत भारताच्या पारड्यात ७ सुवर्ण पदके घातली. तर हीना सिधू आणि तेजस्विनी सावंत यांनी आणखी एका सामन्यात रौप्य पदक देखील पटकावले आहे. त्यांच्यासह मेहुली घोष आणि अंजुम मोघदिल यांनी देखील रौप्य पदकांच्या कमाईत हातभार लावला. याशिवाय ओम मिथारवाल याने २ कांस्य पदके पटकावली आहेत, त्याच्यासह रवि कुमार, अंकुर मित्तल आणि अपुवी चंदेल यांनी देखील भारतासाठी कांस्य पदकांची कमाई केली आहे.




भारोत्तोलन :

२०१८च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारोत्तोलनात भारतानं उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय भारोत्तोलकांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करत एकूण ९ पदकांची कमाई केली. यामध्ये ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश होता. भारोत्तोलक पी. गुरुराजा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्यात भारताचं खातं उघडलं. त्यांनी पुरुष ५६ किलो वनाच्या गटात रौप्य पदक पटकावलं. मीराबाई चानू आणि संजीता चानू, सतीश कुमार शिवलिंगम, वेंकट राहुल रगाला आणि पूनम यादव यांनी भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली. प्रदीप सिंह आणि गुरुराजा यांनी रौप्य तर विकास ठाकुर आणि दीपक लाथेर यांनी भारतासाठी कांस्य पदकांची कमाई केली.

कुस्ती :

कुस्तीच्या क्षेत्रात भारत नेहमीच अव्वल राहिला आहे. राष्ट्रकुल खेळांमध्ये कुस्तीच्या क्षेत्रात भारताने ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण १२ पदके कमावली. सुमित मलिक, विनेश फोगाट, सुशील कुमार, राहुल आवरे आणि बजरंग पूनिया यांनी कपस्तीचे उत्तम प्रदर्शन करत भारतासाठी सुवर्ण पदकांची कमाई केली, तर मौसम खत्री, पूजा ढांढा आणि बबीता फोगाट यांनी रजत पदक कमावले. कांस्य पदकावर सोमवीर, दिव्या ककरन, साक्षी मलिक आणि किरण यांनी आपले नाव कोरले आहे. एकूण कुस्तीच्या क्षेत्रात भारताने तब्बल १२ पदकांची कमाई केली आहे.







बॅडमिंटन :

बॅडमिंटन देखील भारतासाठी एक अत्यंत महत्वाचा मानला जाणारा खेळ. भारताने नेहमीच जगाला अनेक मातब्बर बॅडमिंटन खेळाडू दिले आहे. बॅडमिंटन या खेळ प्रकारात भारताने एकूण ६ पदकांची कमाई केली आहे. भारताने एकूण २ सुवर्ण ३ रौप्य तर १ कांस्य पदक पटकावले आहे. सायना नेहवालने मिश्र दुहेरी आणि महिला एकल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. औत्सुक्याची बाब म्हणजे तिच्या विरुद्ध भारताची पी.व्ही. सिंधू असल्याने रौप्य पकदावर पी.व्ही. सिंधू हिने आपले नाव कोरले आहे. तसेच किदांबी श्रीकांतला देखील रौप्य पदक मिळाले आहे, त्यासोबतच चिराग रेड्डी आणि सात्विक रंकीरेड्डी यांच्या जोडीला देखील रौप्य पदकाने गौरविण्यात आले आहे, तर सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीने कांस्य पदक पटकावले आहे.




मुष्टीयुद्ध :

मुष्टीयुद्धात भारताने एकूण ९ पदके जिंकली. यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. सुपर मॉम मेरी कोमने कारकिर्दीतील पहिले राष्ट्रकुल पदक मिळवले. तिने ४८ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यासोबतच विक्रम क्रिश्नन आणि गौरव सोलंकी यांनी देखील सुवर्ण पदक पटकावले आहे. तर सतीश कुमार, अमित पानघळ आणि मनीष कौशिक यांनी रजत तर मोहम्मद हसमुद्दीन, नमन तन्वर आणि मनोज कुमार यांनी कांस्य पदकांची कमाई केली आहे.




टेबल टेनिस :

 टेबल टेनिस प्रकारात भारताने एकूण ८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य तर ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. टेबल टेनिसमध्ये महिला आणि पुरुष या दोन्ही गटांमध्ये भारताने इतिहास रचला. पुरूष आणि महिला संघाने सुवर्ण कामगिरी केली. याशिवाय महिला एकेरीत मनिका बत्राने सुवर्णपदक जिंकले. पुरुष दुहेरीत आणि महिला दुहेरीत भारताने रौप्य पदकाची कमाई केली.




अॅथलेटिक्स :

अॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात भारताने ३ पदके जिंकली. नीरज चोपडाने भालाफेकमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले. तर सीमा पुनियाने थाळीफेकमध्ये रौप्य आणि नवदीप ढिल्लोने कांस्यपदकाची कमाई केली आहे.



स्क्वॉश :

हा एक वेगळाच क्रीडा प्रकार असतो. भारताने या क्रीडा प्रकारात २ रौप्य पदकांची कमाई केली आहे. ज्योत्स्ना चिनप्पा आणि दीपिका पल्लिकल यांनी भारतासाठी स्क्वॉश या क्रीडा प्रकारात रौप्य पदके पटकावली आहेत.

हॉकी :

यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय हॉकी संघांच्या हाती निराशा आली. पुरुष आणि महिला या दोन्ही संघांना चांगली कामगिरी करता आली नाही.." .

 
एकूण यंदाच्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताचे प्रदर्शन अतिशय उत्तम होते. यामुळे भारतातील क्रीडा क्षेत्राला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. सोबतच आता पुढे येणाऱ्या ऑलिम्पिक खेळांसाठी भारत सज्ज होत असल्याचे सुद्धा राष्ट्रकुल खेळांमधून आता स्पष्ट झाले आहे.  
@@AUTHORINFO_V1@@