परिस्थितीची पाहणी करून नाणारबाबत भूमिका ठरवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |

खा. शरद पवार यांची सावध भूमिका


 
 
 
मुंबई : नाणार प्रकल्पात राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी लक्ष घालावे यासाठी नाणारवासीयांनी शुक्रवारी त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आपण जागेची आणि त्याठिकाणच्या परिस्थितीची पाहणी करून आपली भूमिका ठरवणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
 
केंद्र सरकारने नाणार प्रकल्पाला दिलेल्या मंजुरीनंतर शुक्रवारी नाणारवासीयांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. नाणार हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून तो महाराष्ट्राबाहेर जावा असे आपल्याला वाटत नसल्याचे पवार यावेळी म्हणाले. मात्र, या प्रकल्पाबाबत लोकांच्या भावना तीव्र असून यासाठी शेतकऱ्यांच्या जागेऐवजी अन्य कोणती पर्यायी जागा मिळेल का याची पाहणी करणार असल्याचे आश्वान त्यांनी प्रकल्पग्रस्तांना भेटीदरम्यान दिले.
 
१० मे रोजी नाणार दौरा
१० मेला शरद पवार हे नियोजित नाणार प्रकल्पस्थळाला भेट देणार असून ते त्या ठिकाणच्या काही अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांचीही ते भेट घेणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती रिफायनरी विरोधी शेतकरी,मच्छिमार संघर्ष समितीचे सचिव भाई सामंत यांनी यावेळी दिली. त्यामुळे या दौऱ्यानंतर ते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  
नाणारबाबात शेतकऱ्यांमध्ये गैरसमज- मुख्यमंत्री
नाणार प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्यात येत आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्र सरकारने जो नुकताच सामंजस्य करार केला आहे तो वेस्ट कोस्टसाठी करण्यात आलेला करार आहे. हा प्रकल्प रत्नागिरीतच व्हावा अशी केंद्र आणि राज्य सरकारची इच्छा आहे. या प्रकल्पामुळे १ लाख नवे रोजगार निर्माण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@