पुरुषी अहंकार ठेचण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018   
Total Views |
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. काबाडकष्ट करावे लागलेल्या नोकरीत हयात गेली. मुंबईतील सांताक्रुझ परिसरातल्या कुठल्याशा चाळीत तारुण्यातले उमेदीचे दिवस कसे सरले अन्‌ पोरांच्या संसारातच ‘आपले’ समाधान शोधण्याचे पर्व केव्हा सुरू झाले कळलेच नाही. चारही पोरांची लग्नं लावून होताच जन्माचे सार्थक झाल्याची भावना चेहर्‍यावर नकळत समाधानाची कळी खुलवून जायची. अशातच चाळीतले घर विकून फ्लॅट विकत घेण्याचा प्रस्ताव पोरानं बापासमोर ठेवला. आता आपले म्हणून राहिलेच किती दिवस? मुलाचा तोच आपलाही संसार. तो डोळ्यांदेखत फुलताना बघण्याचे भाग्य वाट्याला येत असताना नकार द्यायचा तरी कशासाठी? ...मग काय, चौघांचा तो चाळीतला संसार नव्या कोर्‍या फ्लॅटमध्ये थाटामाटात शिफ्ट झाला. सुख-सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असते, असा विचार मनात येण्याचीच देर की, नशिबाचा फेरा चुकतो की काय, असे वाटू लागले. मुलगा आणि सुनेची नियत दिवसागणिक बदलू लागली. ज्यांच्या आयुष्यभराच्या कमाईच्या भरवशावर स्वत:च्या संसाराचा थाट मांडला, त्यांचीच अडचण होऊ लागली. त्यांना अडगळीत टाकण्याच्या नवनवीन क्लृप्त्या मुलगा आणि सुनेच्या मनात येऊ लागल्या. एक दिवस बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्याने मुलाने आई-बापाला गाडीत बसवले. भटकंती सुरू झाली. एकेक गाव मागे टाकत सारे धुळ्याला पोहोचले. तर तिथल्या बसस्थानकावर त्या दोघांना बसवून, ‘लगेच येतो’ असे सांगून मुलगा निघून गेला... आता येईल, मग येईल म्हणून मुलाची आतुरतेनं वाट बघणारे दाम्पत्य अखेर हताश झाले. तो मात्र आलाच नाही... मोठ्या खुबीनं त्यांची जबाबदारी टाळून तो निघून गेला होता. आपली नेमकी चूक काय झाली, तेही कळेना! बसस्थानकावरचा कॅण्टीनवाला, कुणीतरी रिक्षावाला अशा ‘देवदूतांनी’ त्यांना एका वृद्धाश्रमात पोहोचविले. यातल्या कर्त्या माणसाचा नुकताच मृत्यू झाला. त्याबाबतचा निरोप मंबईकर मुलासह इतर तीन मुलींनाही पाठविण्यात आला होता. पण, जन्मदात्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची फुरसत कुणालाच न झाल्याने शेवटी वृद्धाश्रमातील ‘आप्तांनी’ अखेरचे सोपस्कार पार पाडले...
 
आयुष्यातली जेमतेम आठ वर्षे पूर्ण केलेल्या एका कोवळ्या जिवाला ओलीस ठेवून तिच्यावर कित्येक दिवस आळीपाळीने बलात्कार करीत राहिलेल्या सहा जणांनी नंतर, काश्मिरातील कठुआ येथे तिचा दगडाने ठेचून खून केल्याच्या हृदयद्रावक घटनेने अस्वस्थ झालेलं मन अद्याप थार्‍यावर आलेलं नसताना, उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे एक उमलती कळी अशाच काही नराधमांनी निर्दयीपणे कुसकरल्याचा आरोप आहे. यात एका राजकीय नेत्याचाही समावेश आहे म्हणतात. आरोप असलेली व्यक्ती आमदार आहे म्हणून तिला सुरुवातीला अटक झाली नाही, असाही आरोप आहे...
खरंच, मन सुन्न करणार्‍या घटना आहेत सार्‍या. यांत्रिक युगात वावरताना माणसं कोडगेपण लेऊन घराबाहेर पडताहेत की काय आताशा! हळव्या मनाची ती नाजूकशी गुंतागुंत दिसत नाही ती कुठेच! जीवघेण्या स्पर्धेच्या आडून आपसूकच वाट्याला आलेल्या धकाधकीच्या जीवनात माणसं बेभान होऊन पैशाच्या मागे पळत सुटलीत हे खरंच. धावण्याच्या या शर्यतीत भावनेपेक्षा व्यवहार काहीसा अधिक प्रभावी ठरतोय्‌ हेही तितकंच खरं. पण एवढा? पीडित मुलीवर बलात्कार करणारा आमदार कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, हे बघून कॉंग्रेसच्या आंदोलनाची तीव्रता ठरत असेल अन्‌ अशा प्रकरणात पीडितेचा फोटो छापायचा नसतो, एवढे साधेसे भानही पत्रकार जगतातील मी मी म्हणवणार्‍या दीडशहाण्यांना जपता येत नसेल, तर मग संपलंच सारं!
 
उपरोक्त प्रकरणातील एकूण एक माणसांचं वागणं म्हणजे निर्लज्जतेची हद्द अधोरेखित करणारं अन्‌ माणुसकीला काळिमा फासणारं धगधगतं वास्तव आहे. एकुलता एक मुलगा साता समुद्रापल्याड दूर कुठेतरी इंग्लंड-अमेरिकेत राहतो म्हणून एकटेपण सोबतीला घेऊन जगणार्‍या आई-बापाची करुण कहाणी काय अन्‌ स्वत:ची सारी जिंदगानी मुलांवर उधळूनही आयुष्याची संध्याकाळ वृद्धाश्रमात घालवण्याची वेळ आलेल्या त्या दाम्पत्याचं ताल-सूर हरवून बसलेलं जीवनकाव्य काय, वेशीवर टांगलेलं दुर्दैवच...! माणसं इतकी निष्ठुर वागू शकतात, हे पुन्हा एकदा जगजाहीर झालेलं वास्तव स्वीकारण्याची हिंमतच होत नाही बघा! मन पुरते अस्वस्थ करणारं आहे सारं.
 
मध्यंतरी अमेरिकेतल्या एका प्रख्यात महिला संपादकाचं वक्तव्य कानावर पडलं- दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर... ‘‘जगभरातील भ्रमंती हा आवडता छंद असतानाही भारतात येण्याचं मात्र धाडस होत नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातील इस्लामाबादला जाणं आपण पसंत करू.’’ हे त्यांचं म्हणणं क्षणभर त्यांच्याबद्दल तीव्र भावना निर्माण करून गेलं. पण मग मनात विचार आला की, चूक काय त्यांची असा विचार करण्यात? इथल्या नराधमांच्या, वासनेनं वखवखलेल्या नजरेतून विदेशी पर्यटकही सुटत नसतील, मनाचा थरकाप उडविणार्‍या निर्भया हत्याकांडाने संपूर्ण जगभरात आमची छी: थू: झाली असेल, तर मग दिल्लीच्या तुलनेत इस्लामाबाद अधिक सुरक्षित असल्याची त्या संपादिकेची भावना चुकीची कशी ठरवता येईल? मानवी आवरणं झुगारून पुरुषी अभिनिवेश जपतच माणसं सर्वदूर वावरणार असतील, ‘स्त्री’त्वाच्या संवेदना पायदळी तुडवून त्यात फक्त ‘मादी’ शोधण्याचीच प्रवृत्ती सर्वदूर उफाळून येणार असेल, तर या नराधमांकडे किळसवाण्या नजरेनं बघणार्‍या जगाला तरी दोष का द्यायचा?
इवल्याशा जिवावर पाशवी बलात्काराचं ओझं लादताना कुठला आसुरी आनंद मिळवला असेल त्या पिशाचांनी तरी? सलग काही दिवस तिच्या इभ्रतीचे लचके तोडताना अन्‌ शेवटी निर्दयीपणे तिला दगडाने ठेचताना मनं द्रवली नाहीत त्यातल्या कुणाचीच? या प्रकरणात एक शहाणा तर दूरवरच्या मिरतहून पोहोचला होता म्हणे काश्मिरात- खास ही ‘कर्तबगारी’ बजावायला! ऐकतानाही काळीज चिरून निघावं इतका हृदयद्रावक आहे सारा घटनाक्रम.
 
परवा दिल्लीत राहुल गांधी, प्रियांका वढेरा यांच्या नेतृत्वात मध्यरात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला- कठुआ आणि उन्नावमधील घटनेच्या निषेधार्थ. स्वाभाविकच आहे. बलात्काराच्या या जगावेगळ्या घटनेने कुणीही अस्वस्थ व्हावं. खरंतर हा कॅण्डल मार्च ‘कॉंग्रेस’चा न राहता सर्वसामान्य माणसांचा असायला हवा होता. कारण त्यांना संताप अनावर होणं महत्त्वाचं. राजकीय मंडळींचं काय, त्यांच्या भावना परिस्थिती पाहून उचंबळून येतात. सोयीचं असलं की संताप अन्‌ अडचणीचं असलं की शांतता, अशी भूमिका बदलत राहते त्यांची. पण, जनताजनार्दनाचं तर तसं नाही. मग ती का मूग गिळून बसली आहे? एका चित्रपटाच्या प्रदर्शनावरून देशभर धिंगाणा घालणारा समूह हा. संपूर्ण कथानक जसेच्या तसे ठेवून केवळ मथळ्यात ‘पद्मावती’चा ‘पद्मावत’ झाला तरी आंदोलन ‘यशस्वी’ झाल्याच्या आवेशात कॉलर टाईट करून वावरणारा जनसमुदाय, वर नोंदवलेले प्रसंग ऐकून जराही अस्वस्थ होत नसेल, तर मग आपल्या समाजाचीच तब्येत तपासून बघितली पाहिजे एकदा! कारण, पीडितेवर अत्याचार करणार्‍या त्या नराधमांपेक्षाही दुर्लक्ष करून त्यांना माफ करणारा समाज अधिक दोषी अन्‌ घातक ठरतो. कारण, इथे कठोर कायद्यांपेक्षाही समाजाची मानसिकता, त्याचा धाक, त्याचा वचक, एकूणच स्त्री समूहाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन... या सार्‍याच बाबींवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आता काय, केवळ हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढण्यापुरता उरलाय्‌ आपला समाज? मुकाट्यानं श्रद्धांजली वाहून मोकळे होणार आहेत लोक? की पाच-दहा वर्षांनी या हरामखोरांना न्यायालयात शिक्षा जाहीर होईल तेव्हा आनंदाने ढोल बडवायला सरसावेल षंढांचा गोतावळा?
मध्यंतरी, एकाकी जीवन जगणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या जुजबी गरजा पूर्ण करण्याकरिता, प्रसंगी फावल्या वेळात त्यांच्याशी गप्पा मारण्याकरिता पोलिसदलात एक गट तयार करण्याची कल्पना, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मांडली होती. मानवी समाजातील पुरुषी अहंकार, त्यांची राक्षसी वृत्ती नष्ट करण्यासाठी कायद्याच्या पलीकडचा असाच एखादा उपाय अंमलात आणण्याच्या गरजेचाही विचार व्हावा ना कधीतरी...!
 
 
- सुनील कुहीकर
9881717833
 
@@AUTHORINFO_V1@@