रिपब्लिक इंडिया विरुद्ध कम्युनिस्ट इंडिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 

 
नक्षलवाद हे मार्क्सवादाचंच ओंगळवाणं रूप आहे. बाबासाहेबांनाही स्वातंत्र्य, समता, बंधुता अभिप्रेत होती, पण ती मार्क्सची नव्हे तर बुद्धाची अभिप्रेत होती. रक्ताचा एक थेंबही न सांडता घडणारी रक्तविरहित क्रांती बाबासाहेबांना अपेक्षित होती की, जी त्यांना बुद्ध विचारात आढळली. म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला आणि मार्क्स नाकारला. पण, एक आंबेडकरवादी म्हणून आपण कठोरपणे मार्क्सला, मार्क्सवादाला व मार्क्सवाद्यांना नाकारलं पाहिजे.
 
"जय भिम" म्हणण्यासाठी स्वत:कडे एक नैतिक अधिष्ठान असावं लागतं. उठसूट कोणीही आंडूपांडू "जय भिम" म्हणू शकत नाही. "जय भिम" हा शब्द म्हणजे काही खाऊ नाही. "जय भिम" म्हणजे आहे एक ठाम विचारधारा आणि आपल्याला काही वेगळंही करायचं नाही. आपल्या बापाने आपल्याला जे सांगितलं आहे ते निमूटपणे करणं, हे एकच काम आपल्याला करायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी करायचा आगाऊ शहाणपणा करायची काहीही गरज नाही. कारण, बाबासाहेबांइतका महापंडित व विचारवंत आंबेडकरी चळवळीतच नव्हे, तर संपूर्ण देशात अजून जन्माला आलेला नाही. त्यामुळे इथे कोणीही अकलेचे तारे तोडायची गरज नाही. बाबासाहेबांनी आपल्याला ’रिपब्लिकन’ आयडेंटिटी दिली आहे. त्यामुळे ’बहुजन’ किंवा ’मूलनिवासी’ सारख्या भिक्कार आणि संकुचित बिरुदावल्या आपण अजिबात मिरविता कामा नये. आपण जर स्वत:ला ‘आंबेडकरवादी’ समजत असू तर बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा आपल्याला प्रमाण असलाच पाहिजे. मग काही अर्धवट शहाणे म्हणतील की, हीसुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. हे असं म्हणणार्‍या या अर्धवटरावांना माझं खुले आव्हान आहे की, त्यांनी बाबासाहेबांचा एक शब्द चुकीचा आहे, कालबाह्य आहे, असं सिद्ध करून दाखवावा. जर ते सिद्ध केलं तर आम्ही स्वत:ला अंधश्रद्धाळू म्हणून घोषित करू आणि या शहाण्यांचे पाय धुवून ते पाणी प्राशन करू. पण, ते शक्य नाही. बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा काळाच्या कसोटीवर खरा ठरला आहे व पुढेही खराच ठरणार आहे. याचं एकमेव कारण म्हणजे, बाबासाहेब हे फक्त प्रकांडपंडित नव्हते, तर ते प्रज्ञावान होते, शिलवान होते. म्हणून तर त्यांच्या समकालीन विरोधकांना त्यांचा धाक वाटत होताच. पण, वर्तमानातल्या व भविष्यातल्या विरोधकांनाही त्यांचा धाक वाटतच राहणार आहे. अशा या पार्श्र्वभूमीवर या आपल्या भविष्यवेत्त्या, जगज्जेत्त्या बाबासाहेबांचे काठमांडूला केलेले ऐतिहासिक भाषणही आपण विसरता कामा नये.
 
बुद्ध की कार्ल मार्क्स या दोघांमध्ये या आपल्या बापाने कार्ल मार्क्सला नाकारले व बुद्धाला स्वीकारले, हे वास्तव आपण कधीही नजरेआड करता कामा नये. बुद्धांच्या तुलनेत मार्क्स हा अत्यंत अर्धवट व उथळ विचारांचा तत्त्वज्ञ ठरतो. त्याने ’दास कपिताल’ लिहिले. पण त्याला भारतातल्या ‘कास्ट कॅपिटल’ची गंधवार्ताही नव्हती. प्रारंभी जगाचे आकर्षण ठरलेला ‘मार्क्सवाद’ आज कालबाह्य होऊन मोडीत निघाला आहे. मार्क्सचा भाबडा आशावाद सांगतो की, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळाला की त्याचे सगळे प्रश्न सुटतात. पण, या तीन गोष्टीत संपून जायला माणूस म्हणजे काही जनावर नव्हे. जनावरांचं ठिक आहे. जनावरांच्या भौतिक गरजा पूर्ण झाल्या की, ते समाधानी होऊन जातात. माणसाचं मात्र तसं नसतं. कारण माणसाला मन असतं, भावना असते, बुद्धी असते. त्याला व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवं असतं. मार्क्स तुम्हाला मार्क्सच्या विरोधात बोलायचं स्वातंत्र्य देत नाही. मार्क्सला श्रमिकांचं राज्य हवं असतं, पण त्यात त्याला व्यक्तिस्वातंत्र्य अभिप्रेत नसतं. मग लोकशाही तर फारच दूरची गोष्ट झाली. मार्क्सला वाटतं, माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या की, समता प्रस्थापित होते. यासाठी तो शस्त्रसुद्धा हातात घ्यायची मुभा देतो. नक्षलवाद हे मार्क्सवादाचंच ओंगळवाणं रूप आहे. बाबासाहेबांनाही स्वातंत्र्य, समता, बंधुता अभिप्रेत होती, पण ती मार्क्सची नव्हे तर बुद्धाची अभिप्रेत होती. रक्ताचा एक थेंबही न सांडता घडणारी रक्तविरहित क्रांती बाबासाहेबांना अपेक्षित होती की, जी त्यांना बुद्ध विचारात आढळली. म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला आणि मार्क्स नाकारला.
 
स्ट्रॅटेजी काहीही असो, पण एक आंबेडकरवादी म्हणून आपण कठोरपणे मार्क्सला, मार्क्सवादाला व मार्क्सवाद्यांना नाकारलं पाहिजे. मार्क्सवाद हा आपला उघड शत्रू जरी नसला तरी तो मित्रसुद्धा होऊ शकत नाही. पण, धार्मिक फॅसिझमची भीती दाखवून ही मार्क्सवादी मंडळी आंबेडकरी माणसांच्या गळ्यात गळा घालू पाहताहेत. पण आपण इतके बावळट असतो की, या लाल सलामवाल्यांनी ’जय भिम’ म्हटलं की आपण लगेच हुरळून जातो. पण जनाधार गमावलेले हे लालभाई बाबासाहेबांचं नाव घेत हळूहळू आपले बालेकिल्ले, आपल्या वस्त्या आणि आपली चळवळ आतून पोखरत चालले आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. एक लालभाई शाहीर सांस्कृतिक चळवळीच्या निमित्ताने डफली घेऊन आपल्या वस्तीत येतो, गाणं गातो आणि दुसर्‍या दिवशी आपल्या डोळ्यासमोर कालपर्यंत ’जय भिम’ म्हणणारं आपलं पोरगं त्याच्या नादी लागून ’लाल सलाम’ म्हणायला लागतं. सुरुवातीला आपल्यालासुद्धा हे खटकतं. पण मग नाईलाजाने म्हणा किंवा तडजोड म्हणा, हळूहळू आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते. मग आपली ही असहायता झाकण्यासाठी आपण ‘लाल सलाम’चं लटकं समर्थन करू लागतो.
 
म्हणजे ‘मार्क्सवाद’ हा गरीबांच्या, श्रमिकांच्या बाजूचा आहे. तो सुद्धा धर्मवाद मानत नाही. तोसुद्धा मानवमुक्तीचा लढा आहे. बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा झेंडासुद्धा लालच होता. आठवले, कवाडेंना जवळ फिरकूसुद्धा न देणारे बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकरसुद्धा लालभाईंसोबतच असतात, वगैरे, वगैरे. पण मग या सगळ्या लटक्या समर्थनानंतरही, ’बाबासाहेबांच्या काठमांडूच्या भाषणाचं काय करायचं?’ हा प्रश्न उरतोच. बाबासाहेबांचा झेंडा लाल होता, असा दावा करणार्‍यांना मी विचारतो की, ’’तुम्हाला जर कुठे अर्ज करायचा असेल तर त्या अर्जावर तुम्ही तुमचा सध्याचा फोटो लावाल की तुमचा बाल्यावस्थेतला फोटो लावाल?’’ बाबासाहेबांचा त्या काळचा झेंडा लाल होता हे ठीक आहे. पण, नंतर सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्षासाठी त्यांनी या लाल झेंड्याला तिलांजली देऊन निळा झेंडा दिला. मग निळा झेंडा नाकारून लाल झेंडा स्वीकारण्यात काय मतलब आहे? हे असं म्हणणं म्हणजे, आता जरी तुम्ही बौद्ध असलात तरी पूर्वी महारच होता, असं म्हणण्यासारखं आहे. दुसरी बाब म्हणजे, प्रकाश आंबेडकरांची लालभाईंबरोबर मैत्री आहे म्हणून आपणही लालभाईंना स्वीकारावे, हे म्हणणंसुद्धा तकलादूच आहे. इथे आम्हाला प्रकाश आंबेडकरांपेक्षा बाबासाहेब महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी काहीही केलं तरी आम्ही मात्र बाबासाहेबांच्या विचारांनुसार मार्क्सवाद धुडकावूनच लावू. अशाच एका मार्क्सवादी शाहिराचं एक गाणं आहे. त्या गाण्यात तो म्हणतो..., बया पहाटेच्या पारंला, कोणी नव्यानं गाणं गातो, कोणी नव्यानं गाणं गातो, धक्का चावडीला देतो गा माझे माई. माझ्या निढळाच्या घामाला, रोज येई गं नवं फुलं,रोज येई गं नवं फुलं, कशी पेटना ती चूल गं माझे माई. याच चालीवर मी मार्क्सवाद्यांवर कोरडे ओढणारं गाणं लिहिलं होतं. ते असं......,
 
बया पहाटेच्या पारला, कोणी भिमाचं गाणं गातो,
कोणी भिमाचं गाणं गातो,
बुक्का लाल लाल देतो गा माझे माई.
माझ्या निढळाच्या घामाला,
येतो जातीचा गं वास,
येतो जातीचा गं वास,
लाल भाई का उदास गं माझे माई.
प्रश्न भूक भाकरीचे,त्याने गाण्यातून मांडले,
जातीपातीच्या प्रश्नावर,
रक्त आमचे सांडले गं माझे माई.
वर्गभेदाच्या प्रश्नावर,
तो कडाडून लढे,
जातीभेदाच्या प्रश्नावर,
त्याचे गाडे कुठे अडे गं माझे माई.
भिमबॅरिस्टर झाला,
त्याचा वर्ग बदलला,पण बडोद्याच्या चपराश्याने,
नाही वर्ण बदलला गं माझे माई.
इथल्या रोगाचं निदान, करी कोणी मार्क्स बाबा,
पण इथल्या भूमीतला त्यांना, नको माझा भिमबाबा गं माझे माई.
सांग माई सांग त्यांना, नका शिकऊ आम्हा ग्यान,
निळ्या धारेची तलवार,नाही केली आम्ही म्यान गं माझे माई.
या गाण्यातून आंबेडकरी वस्त्यात घुसू पाहणार्‍या मार्क्सवादी शाहिरांना त्यांच्याच भाषेत दिलेलं हे उत्तर आहे. ही आंबेडकरवादी व मार्क्सवादी यांच्यात चाललेली ही सांस्कृतिक लढाईच आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. गेल्या रविवारी उल्हासनगरमध्ये शामदादा गायकवाडांचा ७५ वा वाढदिवस होता. तिथे त्या सचिन माळी व शीतल साठेचा विद्रोही शाहिरी जलसा होता. त्या कार्यक्रमात यांचे हेच उद्योग चालले होते. त्याचं शेवटचं गाणं होतं, ‘येवो बळीचं राजं हो दादा येवो बळीचं राजं.’ या संपूर्ण गाण्यात बळीराजा कसा शोषितांचा, पीडितांचा, शेतकर्‍यांचा, बहुजनांचा राजा आहे, हे शीतल साठे अगदी कंठशोष करून सांगत होत्या. यातली पहिली आक्षेपार्ह बाब म्हणजे आम्ही दलित नाही. दुसरी बाब म्हणजे, आम्ही बहुजनसुद्धा नाही. आम्ही तर रिपब्लिकन आहोत आणि कोण कुठला हा बळीराजा? त्याला का म्हणून आम्ही आपला मानायचं? कसलाही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या या बळीराजाला जर सत्य मानलं तर मग विष्णूचा अवतार असलेल्या वामनालासुद्धा सत्य मानावे लागेल. या असल्या भाकडकथांवर विश्वास ठेऊन कधी क्रांती घडत नसते. क्रांती घडविण्यासाठी ऐतिहासिक दस्ताऐवज समोर ठेवावे लागतात. या संपूर्ण कार्यक्रमात सचिन माळी व शीतल साठेंनी बाबासाहेबांच्या जुन्या लाल झेंड्याचा वारंवार आवर्जून उच्चार केला. पण कुठेही निळ्या झेंड्याचा व ‘रिपब्लिकन’ शब्दाचा उल्लेख केला नाही. उलट कोण कुठला त्या कन्हैय्यालालचं कौतुक करून बौद्ध रसिकांसमोर बौद्धांची येथेच्छ टवाळीसुद्धा केली आणि गंमत म्हणजे, हे सगळं प्रबोधनाच्या नावाखाली. मग आता हे लालभाई खरंच आपले मित्र आहेत की मित्राच्या रूपातले शत्रू आहेत, यावर प्रत्येक रिपब्लिकनने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
 
कन्हैय्यालालचा विषय निघाला म्हणून सांगतो. रिपब्लिकन चळवळ आजतागायत गटातटात विखरून पडल्याने खर्‍या अर्थाने रिपब्लिकन पक्षाचं कणखर नेतृत्व उभंच राहिलं नाही. ते बाळासाहेब ठाकरे आपल्या हयातीत बाबासाहेबांना काय नाही, नाही ते बोलले, ते शौरी बाबासाहेबांना ‘फॉल्स गॉड’ म्हणाले, ते आर.आर. पाटील आंबेडकरी कार्यकर्त्यांना ‘नक्षलवादी’ म्हणाले, काल आलेले राज ठाकरे इंदू मिल स्मारकाची तोंड वेंगाडून नक्कल करून गेले, पण या सार्‍यांना सडेतोड जबाब देणारा मायचा लाल रिपब्लिकन चळवळीत कधी दिसलाच नाही. कालपरवा जन्माला आलेला आणि कम्युनिस्टांचा ‘पेड वर्कर’ असलेला तो कन्हैय्यालाल जातीअंताच्या नावाखाली बौद्धांची बदनामी करून गेला. या सर्व प्रकारामुळे रिपब्लिकन चळवळ म्हणजे षंढांची फौज आहे की काय, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडला असतानाच या कन्हैय्यालालचे दात घशात घालणारा एक रिपब्लिकन मात्र खंबीरपणे उभा राहिला आणि बाबासाहेबांची कूस वांझ नाही, याची खात्री देऊन गेला. लालभाई कन्हैय्यालालचे थोबाड बंद करणार्‍या या रिपब्लिकनचे नाव आहे, हर्षवर्धन ढोके. या हर्षवर्धनने या कन्हैय्यालालला आमने सामने चर्चा करण्याचे आव्हानच देऊन टाकले आहे. कन्हैय्यालालला हर्षवर्धनने जे हिंदीतून पत्र लिहिले आहे त्याचा मराठीत केलेला स्वैर अनुवाद मी आपल्या माहितीसाठी खालीलप्रमाणे देतो आहे.हर्षवर्धन या पत्रात म्हणतो की, “कन्हैय्याकुमार, आंबेडकरांचे नाव घेऊन मनोरंजन करणं बंद कर. डिबेटमध्ये मला पराभूत करून दाखव. मी माझ्या संपूर्ण टीमसहित कम्युनिस्टांसोबत राहीन.’’ याच पत्रात हर्षवर्धन पुढे म्हणतो.... “मी तुझे औरंगाबादचे भाषण ऐकले. त्यात तू म्हणालास की, हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मामध्येसुद्धा जाती आहेत. माझं मिशन जातींना नष्ट करून या देशात समता प्रस्थापित करण्याचे आहे. तुझ्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. Class (वर्ग) चा प्रश्न संविधानामुळे समाप्त झाला आहे. श्रमिकांच्या कल्याणाचे कायदे अस्तित्वात आल्याने आता त्यासाठी कम्युनिस्टांची गरज नाही. आता कम्युनिस्टांनी आपली बुडती नाव वाचविण्यासाठी तुझ्या तोंडी कास्टचा मुद्दा घालून त्यांनी तुला ‘पेड वर्कर’ पोपट बनविले आहे. तू स्वतः हिंदू धर्मातल्या जातीचा असून स्वत:ची जात नष्ट करू शकत नाही आणि तू बौद्धांना सांगतो आहेस की, बौद्ध धर्मात कास्ट प्रॉब्लेमआहे म्हणून. बौद्ध धर्म जातीपातीविरहित धर्म आहे. प्रथमस्वत:ची कन्सेप्ट क्लिअर कर. आता राहता राहिला मुद्दा, जात व आर.एस.एस.च्या विरोधातल्या तुझ्या मनोरंजक बाता. मला सांग आर.एस.एसचा कास्टचा पाया नष्ट करण्यासाठी तुझ्याकडे काय योजना आहेत? तू या देशातून जातीचा विनाश कसा करू शकणार आहेस? आणि म्हणून बाबासाहेबांचं नाव घेऊन तुझ्या बकवास स्पिचद्वारे कम्युनिस्टांच्या भाकर्‍या भाजणं बंद कर. ‘रिपब्लिक इंडिया विरुद्ध कम्युनिस्ट इंडिया’ यावर डिबेट करण्याचे मी तुला आव्हान देत आहे. माझ्यासमोर बसून तू कास्ट कशी नष्ट करणार? या देशात तू कोणती समता आणू इच्छितो? या विषयावर डिबेट करून मला हरव. जर तू असे केलेस तर मी माझ्या सहकार्‍यांसोबत आयुष्यभर तुझी गुलामी करू.’’
 
मला माहीत आहे की, मी हर्षवर्धनचे अभिनंदन केल्याबरोबर आपल्यातलेच काही अतृप्त आत्मे संतापून माझ्यावर बाष्कळ आरोपांच्या फैरी झाडतील. पण, अशा आरोपांना मी भीक घालत नाही. आज कन्हैय्या जरी कम्युनिस्ट असला तरी खर्‍या अर्थाने तो हिंदूच असल्याने हिंदू मीडिया त्याला भरभरून प्रसिद्धी देतो आहे. रिपब्लिकन माणसाची दखल मीडियाकडून यासाठी घेतली जात नाही, कारण या गटतटवाल्यांनी सवंग राजकारण करून रिपब्लिकनचा दराराच नष्ट करून टाकला आहे. ज्या दिवशी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष भारतीय राजकारणात दखलपात्र होईल, त्यावेळी हा संपूर्ण मीडिया झक मारत आपल्या पाठी फिरणार आहे. पण, यासाठी आपल्याला फक्त महाराष्ट्रभर नव्हे, तर संपूर्ण देशभर रिपब्लिकन पक्षाची सूत्रबद्ध बांधणी करून तो सशक्त, सबळ व समर्थ करावा लागेल. तोपर्यंत ’रिपब्लिकन इंडिया’ विरुद्ध ‘कम्युनिस्ट इंडिया’ ही लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे.
 
 
 
- विवेक मोरे 
 
@@AUTHORINFO_V1@@