बाबासाहेबांची संस्थात्मक बांधणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 
 
शोषित, वंचित, दलित समाजाला आशेचा किरण दाखविणारा मार्गदाता, समस्त भारतीयांच्या जीवनात संविधानाच्या माध्यमातून सर्वांगीण बदलासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा उद्घोष करणारा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या उत्कर्षासाठी सामाजिक, राजकीय शिक्षण, धार्मिक, सांस्कृतिक कामगार क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्था निर्माण केल्या. त्या संस्था आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात करण्यात आला आहे.
 
स्वतंत्र मजूर पक्ष
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी १५ ऑगस्ट १९३६ साली ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या नावाचा राजकीय पक्ष काढला. हा पक्ष केवळ अस्पृश्यांसाठी नव्हता, हे त्या पक्षाच्या नावावरून स्पष्ट होते. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून प्राधान्य दिले ते.. भूमिहीन, गरीब कुळे, शेतकरी आणि कामगारांच्या समस्यांना. १९३६ च्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे १५ उमेदवार आरक्षित जागांवर उभे होते व इतर जागांवरही उमेदवार उभे होते. या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले.
 
शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आता राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक नेते झाले होते. अस्पृश्यांना समान हक्क देऊन समताधिष्ठित जीवन जगण्याचा अधिकार अस्पृश्यवर्गाला मिळावा व अस्पृश्य, दलितवर्गाला कायदेशीर हक्क प्राप्त व्हावा म्हणून देशभराच्या अस्पृश्य नेत्यांना दिल्लीत बोलावून अस्पृश्यांची एखादी अखिल भारतीय संघटना स्थापन करण्याची इच्छा त्यावेळी डॉ. बाबासाहेबांनी व्यक्त केली आणि १८-१९ जुलै १९४२ साली नागूपर मुक्कामी ‘अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ हा राजकीय पक्ष स्थापन झाला. या पक्षाच्या माध्यमातून दलित समाजाच्या राजकीय हक्कांसाठी ते लढा देत होते.
 
भारतीय रिपब्लिकन पक्ष डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी एकूण तीन पक्ष संकल्पित केले. त्यापैकी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’, आणि ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ हे त्यांनी प्रत्यक्ष प्रस्थापित केले. तिसर्‍या पक्षाचे नाव होते ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’(भारतीय रिपब्लिकन पक्ष) परंतु, या पक्षाची बाबासाहेब प्रत्यक्ष स्थापना करू शकले नाहीत. १९३४ आणि १९५२ साली त्यांचा निवडणुकीत झालेला पराभव लक्षात घेता काँग्रेसला पर्याय म्हणून सशक्त विरोधी पक्ष असावा, म्हणून त्यांनी ‘रिपब्लिकन पक्षा’ची संकल्पना मांडली. २९ सप्टेंबर १९५६ रोजी नवी दिल्ली येथे या पक्षाचा आराखडा तयार करुन ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ हा पक्ष विसर्जित करण्याची त्यांनी वाच्यता केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वसमावेशक असा रिपब्लिकन पक्ष स्थापन करायचा होता. त्यासाठी त्यांनी डॉ. राममनोहर लोहिया, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, एस. ए. डांगे, प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. २९ सप्टेंबर १९५६ ला डॉ. राममनोहर लोहियांबरोबर अंतिम बैठक घेण्याचे ठरले होते. परंतु धम्मदीक्षा, नेपाळभर आदी व्यग्र कार्यांमुळे ती भेट झाली नाही. पुढे डॉ. बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. त्याआधी त्यांनी भारतीय जनतेला खुले पत्र लिहून ‘काँग्रेस विरोधी पक्षा’ची आवश्यकता प्रतिपादली होती.
 
धम्मदीक्षेला ज्या दिवशी तिथीनुसार एक वर्ष पूर्ण होणार होते, त्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर १९५७ रोजी लाखो लोकांच्या उपस्थितीत नागपूर येथे ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (भारतीय रिपब्लिकन पक्षाची) स्थापना करण्यात आली. या पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून एन. शिवराज यांची निवड करण्यात आली. १९५७ साली झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे ९ खासदार आणि महाराष्ट्र विधानसभेवर १७ आमदार निवडून आले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी अॅड. आर. डी. भंडारे यांची निवड झाली होती. पुढे या पक्षाचे अनेक गट निर्माण झाले. त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष (नादुरुस्त) व रिपब्लिकन पक्ष (दुरुस्त) अशी दोन शकले झाली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड अध्यक्ष आणि बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सरचिटणीस असताना यांच्या नेतृत्वाखाली १९६४ साली देशव्यापी भूमिहीनांचा लढा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला होता.
६० वर्षांच्या वाटचालीनंतर पक्षाचे अनेक छोटे-मोठे गट झाल्याचे चित्र समोर दिसत आहे. यात प्रामुख्याने ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे नेतृत्व विद्यमान केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले करीत आहेत, तर भारिप बहुजन महासंघाचे नेतृत्व अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर करीत आहेत. रिपब्लिकन सेनेचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर करीत आहेत. त्याचबरोबर अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते आपल्या गटाच्या माध्यमातून काम करीत आहेत. वास्तविक, नोकर्‍यांमधील अनुशेष, खाजगीकरण, जागतिकीकरण यामुळे झालेले शेतमजूर कामगारांचे प्रश्र्न, झोपडपट्टीवासीयांचे प्रश्र्न यांच्या सोडवणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने काम करणे आवश्यक आहे.
 
दि म्युनिसिपल कामगार संघ
कामगार चळवळीतील कम्युनिस्ट कार्यकर्ते दलित कामगारांच्या सामाजिक प्रश्र्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे प्रश्र्न सोडविण्यासाठी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीतील कामगारांची स्वतंत्र संघटना स्थापन करावी. कामगार म्हणून हक्क मिळविण्याआधी माणूस म्हणून प्रथमहक्क मिळाले पाहिजे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ साली ’दि म्युनिसिपल कामगार संघा’ची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब या कामगार संघाचे अध्यक्ष होते, तर सरचिटणीस म्हणून गंगाधरपंत तथा बापूसाहेब सहस्त्रबुद्धे होते, तर सहचिटणीस म्हणून गणपत महादेव जाधव तथा मडकेबुवा होते.
सध्या या ‘म्युनिसिपल कामगार संघा’चे अध्यक्ष म्हणून अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करीत आहेत. मुंबई महानगरपालिकेत ही युनियन कार्यरत आहे. महापालिकेत कामगारांचे विविध प्रश्र्न सोडविण्याचे प्रयत्न चालू असतात. ऑफिसर्स/ इंजिनिअर/लिपीक व चतुर्थश्रेणी कामगारांसाठी कामगार संघाचे काम चालते. ‘म्युनिसिपल कामगार संघा’चे ८ हजार व त्याहून अधिक सभासद आहेत. संघाचे कार्यालय परळ येथे आहे.
 
समता सैनिक दल
१९ मार्च १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला एक परिषद भरवली होती. त्या परिषदेत ‘समता सैनिक दला’ची स्थापना करण्यात आली. चवदार तळ्याचा सत्याग्रह, अस्पृश्य समाजावर होणारा अन्याय, अत्याचार अशा विषमतेच्या वातावरणात गावागावात होणारे हल्ले रोखण्यासाठी, लोकांच्या रक्षणासाठी व दलित चळवळीची ताकद वाढविण्यासाठी व महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी ‘समता सैनिक दला’ची स्थापना डॉ. बाबासाहेबांनी केली. ‘समता सैनिक दल’ या संस्थेच्या मुख्य ध्येय व उद्देशामध्ये म्हटले आहे की, ‘‘वर्ण, धर्म, जाती, लिंग या कार्यावर आधारित विषमता व सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध संघर्ष करणे. तसेच समाजातील दलित, शोषित वर्गाच्या लोकांना शिक्षित करून समता, स्वातंत्र्य आणि न्यायाच्या आधारे समाजाची स्थापना करणे. तरुणांना शारीरिक, नैसर्गिक व मानसिकदृष्ट्या बलवान बनविणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे, ‘समता सैनिक दला’ चा प्रत्येक सैनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिस्त, आचरण, ऐक्य, आणि नीतीमत्तेचा आदर्श कायम ठेवील या नियमांचा घटनेत अंतर्भाव आहे.’’
 
आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून जयंतीनिमित्त होणारे जाहीर कार्यक्रम, बौद्ध धम्मसभा, चैत्यभूमी दादर शिवाजी पार्क येथे ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी येणार्‍या लाखो बांधवांना शिस्तीने दर्शन घेता यावे म्हणून ‘समता सैनिक दला’चे सैनिक गर्दीचे नियोजन करीत असतात. मुंबई व देशात ८ ते १० हजार सैनिक आहेत. दर पाच वर्षांनी दलाचे राष्ट्रीय अधिवेशन भरते. आतापर्यंत १९६७ पासून आठ अधिवेशने झाली. समता सैनिक दलाचे काम भारतीय बौद्ध महासभेच्या अखत्यारीत चालते. समता सैनिक दलाचे कार्यालय मुंबई येथील डॉ. आंबेडकर भवन येथून चालते. सध्या समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफीस प्रमुख म्हणून एस के. भंडारे आहेत.
 
बौद्धजन पंचायत समिती
२५ मे १९४१ रोजी मुंबई येथे खार विभागातील कोकणस्थ कॉलनीतील श्री गणपत विठ्ठल कासारे (लाखणकर) यांच्या अंगणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ’महार जाती पंचायत समिती’ या सामाजिक संस्थेची स्थापना झाली. धर्मांतरानंतर याच समितीचे नामांतर ’बौद्धजन पंचायत समिती’ असे करण्यात आले. आज मुंबईसह वसई-विरार, सफाळे, कर्जत, कसारा, भिवंडी, उरण ते पनवेलपर्यंत समितीच्या ८४८ शाखा आहेत, तर कोकणात रायगड, ठाणे, रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामकाज जोरात सुरू आहे. आज या बौद्धजन पंचायत समितीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजपरिवर्तनाचा विचार घेऊन बौद्ध समाजामध्ये प्रबोधनाचे काम पंचायत समिती करीत आहे. पंचायत समितीच्या रचनेमध्ये सभापती, विश्वस्त, शाखा पदाधिकारी, बौद्धकार्य यांच्या माध्यमातून धम्मसंस्कार समाजोपयोगी उपक्रमप्रशिक्षण शिबीर, शैक्षणिक उपक्रम आहेत. बौद्धजन पंचायत समितीचा कारभार सुरळीत चालावा म्हणून अर्थ समिती, शिक्षण समिती न्यायनिवाडा समिती, जनसंपर्क व प्रसिद्धी समिती, ग्रामविकास समिती, सहकारसंस्था, विवाह मंडळ, आरोग्यविषय अशा विविध उपसमित्या आहेत. बौद्धजन पंचायत समितीच्या उद्देशामध्ये कोकणातील बौद्ध बांधवांचे संघटन करणे, सामाजिक व धार्मिक संस्कारास योग्य वळण लावणे, शिक्षण प्रसार करणे, बौद्धिक विकास घडविण्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कोकणात व मुंबई परिसरात समितीचे कामचालू आहे. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर कामपाहात आहेत. पंचायत समितीचे सध्याचे कार्यालय भोईवाडा, परळ येथे आहे. हे कार्यालय १९५८ साली बांधण्यात आले. दिवंगत भैय्यासाहेब आंबेडकर यांनी हे बांधले.
 
भारतीय बौद्ध महासभा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, विचार कितीही चांगला असला तरी त्याला संरक्षणाचे कवच नसेल, तर विचारांचे संवर्धन होत नाही. म्हणून बौद्ध धर्माच्या प्रचार अन् प्रसारासाठी अशा संस्थेची गरज लक्षात घेऊन १९५४ साली त्यांनी हिंदू महासभेच्या धर्तीवर ’दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या धाार्मिक संस्थेची स्थापना केली. एका अर्थाने त्यांचा बौद्ध धम्माकडे प्रवास सुरू झाला होता. कार्यकर्त्यांचे देशामध्ये जाळे निर्माण करण्यासाठी बौद्ध महासभेची स्थापना केली. या संस्थेच्या उद्दिष्टामध्ये भारतात बौद्ध धम्माच्या प्रचारास चालना देणे, बौद्ध धम्मउपासनेसाठी बौद्धमंदिरे विहार स्थापन करणे, धार्मिक व वैचारिक विषयावर शाळा, महाविद्यालये स्थापन करणे व सर्व धर्मांच्या तुलनात्मक अध्यापनास प्रोत्साहन देणे आदी विषयांबरोबरच बौद्ध साहित्य प्रकाशित करणे, बौद्ध धम्माच्या प्रसाराकरिता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, परिषद, मेळावे घेणे आदींचा उल्लेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर १९५६ साली त्यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यांच्या माध्यमातून बौद्ध समाजामध्ये बौद्ध धम्मसंस्कार समाजाची समान बांधिलकीने, बौद्ध परिवार धम्ममेळावे घेण्यात आले. चैत्यभूमी येथील स्मारकाचे कामकरण्यात आले. त्याची देखभाल बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली करण्यात येते. सध्या बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नुषा महाउपासक मीराताई आंबेडकर यांची निवड झाली आहे. मीराताई बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध समाजाला सामील करण्यात व बौद्ध धम्माचा प्रचार प्रसाराचे वेगाने कामकरीत आहे. बौद्ध महासभेच्या २२ राज्यांत शाखा आहेत व महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांत कामकाज चालू आहे.
 
पीपल्स एज्युकेशन सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ सुशिक्षितांची फौज तयार करायची नव्हती, तर प्रज्ञा, शील आणि करुणा यांच्या आधारे संस्कारित नागरिक तयार करायचे होते. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांना विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ झाला पाहिजे. म्हणून त्यांनी ८ जुलै १९४५ साली ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. सुरुवातीला कॉलेज मरीन लाईन्स चर्चगेट परिसरातील छावणीत भरत असे. प्रथम १९४६ रोजी मुंबई फोर्ट येथे सिद्धार्थ महाविद्यालयात सुरू करण्यात आले. १९५० साली औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय बांधण्यात आले. या महाविद्यालयाने मराठवाड्यात नव्हे, तर विदर्भातही ज्ञानाची ज्योत पसरू दिली. मुंबईमध्ये बुद्धभवन, आनंदभवन या स्वतंत्र इमारती असून त्यामध्ये आर्ट्‌स, कॉमर्स सायन्सबरोबर विविध मान्यताप्राप्त कोर्सेस चालतात.
 
नोकरी करणार्‍या युवकांना शिक्षण घेता यावे म्हणून सकाळचे कॉलेज चालू करून अनेकांना शिक्षण पूर्ण करता आले. लॉ कॉलेज, मास मीडिया, एमबीए आदी कोर्सेस चालू करण्याबरोबरच संगणक शास्त्रातील विविध कोर्स सध्या शिकविले जातात. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून नवी मुंबई, मुंबई, महाड, दापोली, पंढरपूर येथे संस्थेची मान्यताप्राप्त १० महाविद्यालये, ४ उच्च माध्यमिक शाळा, ३ हॉस्टेल, २ डिप्लोमा इन्स्टिट्यूट आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये समृद्ध ग्रंथालय आहे. अशा विविध संस्था निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या सर्व घटकांना न्याय देण्याचा, त्यांच्या उत्कर्षाचा मार्ग आपणास दाखविला आहे.
 
 
 
- अशोक कांबळे 
 
@@AUTHORINFO_V1@@