दलित चळवळीमध्ये नक्षल्यांची घुसखोरी घातक...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |
 

 
 
 
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजाच्या उत्थानासाठी काम करणार्‍या अनेक व्यक्ती, संस्था या देशामध्ये, समाजात सामाजिक न्यायासाठी काम करत आहेत, संघर्ष करत आहेत, चळवळी उभारत आहेत. या चळवळीमध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे आत्मभान जागृत झालेला समाज हा वेगाने पुढे जात आहे. समाजामध्ये सकारात्मक कार्य सुरू झालेले आहे. त्याबरोबरच हा जागृत झालेला समाज आणि त्याची आक्रमकता याचा लाभ समाजाला होत आहे. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्याचासुद्धा प्रयत्न काही राजकीय- अराजकीय मंडळी घेताना दिसतात. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडूच्या बौद्ध धम्मपरिषदेमध्ये विचार मांडले होते की, ‘‘या देशाला नव्हे, तर विश्वाला बुद्धाच्या विचारांची गरज आह. कार्ल मार्क्सच्या लेनिनच्या विचारांची अजिबात गरज नाही. या विश्वाला बुद्धाचा विचारच तारू शकतो. मार्क्सचा विचार पराभूत करेल,’’ असा विचार परमपूज्य बाबांनी मांडला होता.
मात्र, अलीकडच्या काळामध्ये काय चित्र दिसते? परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत कार्ल मार्क्स विचार, लेनिनचा विचार आणि रक्तरंजित क्रांतीवर विश्वास ठेवणार्‍या माओचा विचार हा समाजामध्ये घुसविण्याचा निंदनीय प्रयत्न काही डाव्या संघटना आणि नक्षलवादी संघटना करताना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना प्रदान करून, लोकशाही राज्यपद्धती दिली. त्या राज्यघटनेवर, लोकशाहीवर विश्वास नसणारा माओवादी विचार हा बाबासाहेबांचा विरोधी विचार आहे. बाबासाहेबांनी नाकारलेला हा विचार दलित समाजावर थोपण्याचा नक्षलवादी संघटना प्रयत्न करताना दिसत आहेत. नक्षलवादी संघटनांची रणनीती पाहिली किंवा त्यांचा जाहीरनामा पाहिला तर दिसते की, त्यांनी दलित आणि मुस्लीम संघटनांना टार्गेट केले आहे. समाजासाठी काम करणार्‍या या संघटनांमध्ये घुसून येनकेनप्रकारे आपल्या रक्तरंजित नक्षलवादी विचारांचा अजेंडा त्यांना राबवायचा आहे. या विचारातून त्यांना या देशामध्ये अराजकता निर्माण करणे, जनतेच्या भावना भडकवून उद्रेक तयार करणे, त्यातून जनतेला सशस्त्र लढाईसाठी सिद्ध करणे, असा दहशतवादी विचार या नक्षली विचारधारेचा आहे. त्यामुळे समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या चळवळीला धोका हा रक्तरंजित क्रांतीची इच्छा बाळगणार्‍या नक्षलवाद्यांपासून आहे. ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाकारून चळवळीला नाकारतात. मात्र, त्याचवेळी चळवळीमध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांचे नाव वापरत आहेत.
 
हा धोका चळवळीने वेळीच ओळखायला हवा. कारण हे बाबासाहेबांचा विचार झुगारणारे आहेत, बाबासाहेबांनीही त्यांच्या विचारांना थारा दिला नव्हताच. त्यामुळे चळवळीचे शोषण करणारे नक्षली विचार चळवळीसाठी घातक आहेत. भविष्यात धोकादायक आहेत. ते एका बाजूला दलित मुस्लीम संघटनांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणे आणि दुसर्‍या बाजूला दलित आणि आदिवासींची हत्या करणे, असे दोन्ही गैरप्रकार नक्षलवाद्यांनी सुरू केले. आतापर्यंत २४ दलितांची हत्या या नक्षलवाद्यांनी केलेली असून हे चळवळीपुढे असणारे मोठे आव्हान आहे. डॉ. बाबासाहेबांचे या मातीवर, या देशावर, या देशाच्या घटनेवर या देशाच्या लोकशाहीवर नितांत प्रेम होते. नेमके त्याविरुद्ध नक्षलवादी काम करताना दिसतात. अशा वृत्तीचा पराभव करणे, त्यांना हद्दपार करणे आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य यावर आधारित असलेल्या सुराज्यासाठी प्रयत्न करणे हे चळवळीपुढील ध्येय असायला हवे. या राज्यामध्ये शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षितांना सामाजिक, आर्थिक उन्नतीबरोबर सन्मान प्राप्त करून देणे गरजेचे आहे. हेच आता दलित चळवळीसमोरील भविष्यातील मोठे आवाहन आहे.
 
 
 
 
- अमर साबळे 
(लेखक राज्यसभेचे खासदार आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@