जाज्ज्वल्य राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |

राष्ट्रहिताची जाण
परिस्थितीजन्य स्थितीचे भान
राष्ट्राची अखंडता जपली
बाबासाहेब खरे राष्ट्रभक्त
 

स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायावर आधारित नवसमाज निर्माण व्हावा, अशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती, म्हणूनच त्यांनी राजकीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यलढ्याला प्राधान्य दिले अन् त्यासाठी एकाकीपणे लढा सुरू ठेवला.अस्पृश्योध्दार देशाच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा होताच, परंतु मानवतेच्या दृष्टीने देखील त्याचे महत्त्व अधिक असल्याने त्यांनी मानवमुक्तीच्या लढ्याला प्राधान्य दिले. परकीय राजवटीतून तुम्ही जसे मुक्त होऊ पाहता तसे स्वदेश बांधवांना सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे तेही तुमच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतील, अशी त्यांची ठाम भूमिका होती.
 
अस्पृश्योध्दार हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे ध्येय असले, तरी त्यांनी राष्ट्रीय हिताकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रनिष्ठा जोपासली. देशाच्या इतिहासात आपली किंवा आपल्या अनुयायांची ‘अराष्ट्रीय’ अशी नोंद होऊ नये म्हणून सतत काळजी घेतली. त्यांच्या राष्ट्रनिष्ठेची साक्ष देणारे अनेक प्रसंग सांगता येतील. हैद्राबाद संस्थानात तेथील जनतेने निजामाविरूध्द उठाव केला होता त्यावेळी तेथील रझाकारी सेनेने अस्पृश्यांनी इस्लाम स्वीकारावा म्हणून अस्पृश्य जनतेवर अन्याय, अत्याचार केले. त्यांची घरेदारे उद्ध्वस्त केली. त्यासंबंधीच्या तक्रारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आल्यावर त्यांनी अस्पृश्यांना राष्ट्रहिताची जाणीव करून देताना असा इशारा दिला होता की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत, कितीही संकटे आली तरी निजामाला साथ देता कामा नये. कारण निजाम हा स्वातंत्र्याचा तसेच मातृभूमीचा शत्रू आहे. त्याला साथ न देता हैद्राबाद संस्थान हिंदी संघराज्यात सामील करण्यासाठी झटावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्रिटीशधार्जिणे होते असा दोषारोप काहींकडून केला जातो. परंतु ते सरकारचे लांगुलचालन करणारे नव्हते, हे त्यांनी अनेकप्रसंगी दाखवून दिले आहे.
 
१९३० च्या पहिल्या गोलमेज परिषदेत ब्रिटिशांनी भारत सोडून त्वरित निघून जावे असे निक्षून सांगणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते. ब्रिटीश सरकारच्या आमंत्रणाने ते गोलमेज परिषदेला गेले; परंतु सरकारविषयी कृतज्ञतेची किंवा बोटचेपेपणाची भूमिका न घेता त्यांनी प्रखर राष्ट्रनिष्ठा दाखवून दिली. सरकारशी संघर्ष येऊ द्यायचा नाही अशा मुत्सद्दीपणाचा त्यांनी अवलंब केला. परंतु नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू असताना ब्रिटीश सरकारने पक्षपाती धोरणाचा अवलंब केल्याचे लक्षात आल्यावर ब्रिटीश गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी चांगलेच खडसावले आहे. ‘उच्चवर्णियांशी संघर्ष सुरू असताना ब्रिटीश सरकारशी सहसा संघर्ष येऊ द्यायचा नाही असे आमचे धोरण असले, तरी सरकारने पक्षपात केल्यास सरकारशी दोन हात करण्यासदेखील आम्ही मागेपुढे पाहणार नाही’. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्हाइसरॉयच्या कार्यकारिणीत गेल्यावर म्हणतात, ‘मी हिंदूविरोधी बोलतो म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ढालीसारखा वापर करता येईल असे सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. 
 
मी तेवढ्याच जोरकसपणे सरकारविरोधी संघर्ष करेल आणि अस्पृश्यांची मुक्तता करेन’. यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर ब्रिटीशधार्जिणे नव्हते, त्यांनी सरकारची मर्जी संपादन करण्याचा कधी प्रयत्न केला नाही किंवा सरकारचा कल पाहून चळवळीत कधी फेरबदल केले नाहीत, हेच दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदूधर्मविषयक लिखाण, भाषणे, मनुस्मृती दहन, केलेले धर्मपरिवर्तन यांच्याआधारे डॉ.आंबेडकर हे हिंदू धर्मद्वेष्टे होते अशी प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. परंतु त्या संदर्भात, हिंदू धर्मात राहूनच माणुसकीचे अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी पराकाष्ठेचे प्रयत्न केले. परंतु ते मिळत नाहीत म्हणून शेवटी त्यांनी धर्म परिवर्तन केले. परंतु त्यामागे सूडाची किंवा बदल्याची भावना नव्हती. धर्म परिवर्तनाविषयी बोलताना एकदा ते म्हणाले होते, ‘मी आणि माझे अनुयायी मुसलमान झालो असतो तर कोट्यवधी रूपये आमच्या समाजाच्या पायावर ओतले गेले असते. माझ्या मनात तसा द्वेष आणि सूड असता तर पाच वर्षाच्या आत मी देशाचे वाटोळे केले असते. परंतु देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वतःच्या समाजाची नोंद होऊ नये अशी माझी इच्छा होती’.
 
स्वातंत्र्य, समता, बंधूता आणि सामाजिक न्यायासाठी व लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी भारतातच उदयास आलेला आणि भारतीय संस्कृतीशी समन्वय साधणारा बौध्द धर्म स्वीकारून त्यांनी राष्ट्रहिताबरोबर संस्कृती संवर्धनाचे महान कार्य केले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात ते हयात असताना त्यांच्यासंबंधी गैरसमज पसरविण्याचे आणि त्यांना अराष्ट्रीय ठरविण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू होते. त्यांच्या महानिर्वाणानंतरदेखील केवळ व्यक्तिद्वेषातून त्यांच्या कार्याकडे जातीय भावनेने पाहण्याची प्रवृत्ती आजही सक्रिय आहेत, हेही तेवढेच खरे ! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा धडा घेवून जगणे आणि या राष्ट्राची अखंडता टिकवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
 
 
 
- निलेश वाणी
 
@@AUTHORINFO_V1@@