दीपस्तंभ मानवतेचा....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Apr-2018
Total Views |

दूरदृष्टी आणि स्वकर्तृत्त्वाचा संयोग
ज्ञानसंपन्न होण्याचा मार्ग निवडला
वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न
संपूर्ण सत्याग्रह अहिंसक
धर्मांतर नव्हे धर्मपरिवर्तन

 
 
 
 
जगात बहुतांश नेतृत्त्व हे वारसाहक्काने किंवा एखाद्या बड्या नेत्याचे बोट धरल्याने निर्माण झालेले आहे. फार कमी नेते असे आहेत की, ज्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून राष्ट्रास नेतृत्त्व दिले आहे. अशा नेत्यांनी आपल्या स्वार्थाचा त्याग करून राष्ट्र निर्मितीस प्राधान्य दिले. असे हे नेतृत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असून हा नेता राष्ट्रासाठी ‘दीपस्तंभ’च आहे. दलित समाजास त्यांचे हक्क मिळवून देतांना देशासाठीच्या घटना निर्मितीत त्यांचे योगदान मोलाचे आहे.
 
बाबासाहेबांचा वामपंथाला विरोध
बाबासाहेब केवळ उच्च विद्वत्तासंपन्न नेते नव्हते. त्यांची दूरदृष्टीही विशाल होती. म्हणूनच स्वातंत्र्यसंग्राम सुरु असताना जगभरातील विचारधारा व समाजमनाचा त्यांनी अभ्यास केला. सामान्य जनतेच्या मनातील सहानुभूतीचा फायदा उठवत, माओवादी आपल्या मनातील दुष्ट विचार वास्तवात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा माओवाद्यांच्या आणि नक्षलवाद्यांच्या उद्देशांची कल्पना बाबासाहेबांना आली होती. कम्युनिस्ट कधीही भारतीय व्यवस्थेला स्थिरता लाभू देणार नाही. याचे त्यांना आकलन झाल्यामुळेच रक्तरंजित क्रांतीला बाबासाहेबांचा विरोध होता.
 
बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक कृती ही नवनिर्मितीच आहे. जेव्हा भारत जाती-पाती, उच्च-नीचतेच्या विषारी पाशात अडकलेला होता, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विपरीत परिस्थितीतही खचून न जाता ज्ञानसंपन्न होण्याचा मार्ग निवडला. कोणत्याही क्रांतीची बीजं ज्ञानात आणि विद्वत्तेत रुजलेली असतात. याचा प्रत्यय बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दलच्या दृढ निश्‍चयातून दिसून येतो. स्पृश्य आणि अस्पृश्य अशा विषारी सामाजिक वातावरणात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांची ज्ञानसंपन्न होण्याची भूक प्रचंड होती. त्यामुळे प्रयत्नपूर्वक शिष्यवृत्ती मिळवून विदेशात त्यांनी शिक्षण घेतले आणि मिळविलेल्या ज्ञानाचा वापर सरकारी चाकरी करून अर्थार्जनासाठी न करता देशातील अस्पृश्य समाजाच्या उध्दारासाठी केला. देशातील विखुरलेला दलित समाज संघटित करून त्यांची शक्ती एकत्र केली. त्यांच्या हक्कासाठी चळवळ उभी केली. बाबासाहेबांनी दलितांचा उध्दार करताना राष्ट्रहितास नेहमीच प्राधान्य दिले.
 
संयमी बाबासाहेब
 
जगात केवळ बाबासाहेब हे एकमेव उदाहरण असेल की, ज्यांनी धर्म परिवर्तनाची घोषणा करून दोन दशकांपेक्षा अधिक कालखंड समाजाची मानसिकता बदलण्याची वाट पाहिली. धर्म परिवर्तन करतांना मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्म त्यांनी स्वीकारला असता तर प्रचंड आर्थिक सहाय्य आणि राजकीय पाठबळ उभे राहिले असते. परंतु बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन करतांनासुध्दा देशहिताचाच विचार केला. या मातीत उगम पावलेला बौध्दधर्म त्यांनी स्वीकारला. त्यातून बाबासाहेबांची संयमी भूमिका तसेच राष्ट्रप्रेम दिसून येते. बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन करताना देखील हिंदू धर्माची कमीतकमी हानी होईल तसेच राष्ट्र एकसंघ कसे राहील याचाच विचार केला. म्हणूनच हिंदू कोड बिल निर्मितीची जबाबदारी त्यांनी पार पाडली असावी. या हिंदू कोड बिलात त्यांनी बौध्द, जैन व शीख यांचा समावेश केला. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध हा हिंदू धर्माला नव्हे तर चुकीच्या चालीरिती तसेच जातीयतेला होता हे स्पष्ट होते. हिंदू समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्याची त्यांची भूमिका होती. वारंवार प्रयत्न करून देखील हिंदू समाजात बदल होत नसल्याने त्यांनी धर्म परिवर्तनाची घोषणा केली. धर्मांतर म्हणजे धर्माला अंतर देणे असून धर्मपरिवर्तन म्हणजे धर्मामध्ये परिवर्तन घडवणे आहे.
 
‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ असा मंत्र बाबासाहेबांनी दिला. मात्र वामपंथीयांनी केवळ संघटन करुन संघर्ष करण्याची भूमिका घेतली. डॉ. बाबासाहेबांचा कम्युनिझमला विरोध योग्यच होता, हे भारत-चीन युध्दाच्या वेळेस चिनी सैन्याचे कम्युनिस्टांनी केलेल्या स्वागतावरून स्पष्ट होते. या प्रकारामुळे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. बाबासाहेबांनी राज्यघटना निर्मितीद्वारे लोकशाहीचा पुरस्कार केला तर कम्युनिस्ट मात्र लोकशाही व्यवस्थेला मानणारे नाहीत. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कम्युनिस्ट विचारधारेला थारा दिला नाही. परंतु आज कम्युनिस्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेवून गैरसमज पसरवून त्यांचे इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एकसंघ, जात-पात, भेदभाव, उच्च-नीचता नसेल असे राष्ट्र अपेक्षित होते. मात्र वामपंथी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात आणि भूमिका त्यांच्या विचार आणि आचारांच्या विरुध्द घेतात हे राष्ट्र विघातक कृत्यच आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संघर्षाचा समावेश होता. संघर्ष करतांना त्यांनी राष्ट्रहित जोपासले. महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष करतांना याची प्रचिती येते. महाड गावाची लोकसंख्या ५०० पेक्षा कमी होती. तर सत्याग्रही २० हजारांपेक्षा अधिक होते. तरीही महाड सत्याग्रहींनी महाड गावकर्‍यांना बोटही लावले नाही. संपूर्ण सत्याग्रह अहिंसक झाला. फलस्वरूप देशभरात झालेली आंदोलने शांततामय झाली. त्यातून बाबासाहेब राष्ट्राबद्दल किती सखोल विचार करीत होते याची प्रचिती येते. परंतु आज देशात होत असलेल्या आंदोलनांची स्थिती बघता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला खरोखर किती कळले? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.
 
ज्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची घटना निर्मितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेव्हा दलित समाजाच्या उध्दारासाठी झटणार्‍या बाबासाहेबांनी देशाच्या, जनतेच्या हक्कांसाठीची जबाबदारी स्वीकारली. बाबासाहेबांचे उद्दिष्ट दलितांना त्यांचे हक्क मिळवून देणे हे होते. मात्र निर्मितीसाठीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी केवळ दलित समाजाचा विचार न करता देशातील तळागाळातील व्यक्तींपासून सर्वांचा विचार करून घटना निर्मिती केली. यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाच्याही हितांपेक्षा, उद्दिष्टांपेक्षा राष्ट्रहितालाच अधिक प्राधान्य दिले असे दिसते. त्यामुळेच बाबासाहेब केवळ समाज आणि चळवळीचे नेते न राहता देशाचे नेतृत्व करणारे महान राष्ट्रपुरुष बनले आणि खर्‍या अर्थाने मानवतेचा दीपस्तंभसुद्धा...!!!
 
 
 
- स्वप्निल चौधरी
 
@@AUTHORINFO_V1@@